जीवन रसायन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी, [email protected]

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या संशोधनाचं मूलतत्त्व म्हणजे देशात स्वतःचं तंत्रज्ञान निर्माण करून ते जागतिक कसोटय़ांवर उत्तम सिद्ध होईल असंच लक्ष्य ठेवणे! आपल्या देशात अमाप बुद्धिमत्ता आहे. तरुण वर्ग संशोधनासाठी उत्सुक आहे. नित्यनव्या संशोधनासाठी तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळालं तर अद्भुत किमया घडू शकते असं सरांचं अनुभवसिद्ध प्रतिपादन आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ, पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी 28 मे रोजी वयाची सात दशकं पूर्ण करीत आहेत. सत्तरीच्या घरातही त्यांचा संशोधन, अध्यापन आणि विज्ञान प्रसारातला उत्साह तीळमात्र ओसरलेला नाही. मुंबईतील एकेकाळच्या ‘यूडीसीटी’ या संस्थेत शिक्षण घेऊन तेथेच अनेक वर्षे अध्ययन करून आणि या संस्थेचे संचालक असताना संस्थेला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा (आयसीटी) प्राप्त करून देऊन त्यांनी या संस्थेला जागतिक मानांकनात उच्च स्थानी नेऊन ठेवलं आहे. निवृत्तीनंतर जोशीसर सध्या अनेक ठिकाणी मानद अध्यापक म्हणून कार्यरत असून ते मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

सातारा जिल्हय़ातील मसूर या छोटय़ाशा गावात त्यांचं बालपण गेलं. घरची परिस्थिती बेताचीच, पण शिक्षणाचा ध्यास असलेल्या ज्येष्ठराज यांनी चिकाटीने आपली ध्येयसाधना सुरू ठेवली. त्याच सुमारास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने कराड येथे पहिलं विज्ञान महाविद्यालय सुरू झालं आणि तेथे त्यांना शिक्षण घेता आलं.

ज्ञान आणि विज्ञानाची आस निर्माण झाली आणि समाजातील तरुणाईत रुजली तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं सरांना खात्रीपूर्वक वाटतं. ही गोष्ट केवळ तात्त्विक पातळीवर व्यक्त करून ते स्वस्थ बसत नाहीत तर त्यासाठी सतत कार्यशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 100 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली आहे. त्यापैकी एका विद्यार्थ्याची गुणवत्ता जाणून त्याला सरांकडे नेण्याचं मला सुचलं याचं आता खूप बरं वाटतं.

डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या संशोधनाचं मूलतत्त्व म्हणजे देशात स्वतःचं तंत्रज्ञान निर्माण करून ते जागतिक कसोटय़ांवर उत्तम सिद्ध होईल असंच लक्ष्य ठेवणे! आपल्या देशात अमाप बुद्धिमत्ता आहे. तरुण वर्ग संशोधनासाठी उत्सुक आहे. नित्यनव्या संशोधनासाठी तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळालं तर अद्भुत किमया घडू शकते असं सरांचं अनुभवसिद्ध प्रतिपादन आहे.

यापैकी मोजक्या गोष्टी सांगायच्या तर सरांच्याच ‘आयसीटी’ म्हणजे ‘इन्स्टिटय़ूट ऑन केमिकल टेक्नॉलॉजी’ या संस्थेबद्दलचं एक उदाहरण घेऊ. या संस्थेच्या स्वयंपाकगृहासाठी पूर्वी दरमहा 24 गॅस सिलिंडरची गरज भासायची. जोशीसरांनी त्यांच्या कल्पक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने असा एक ‘कुकर’ बनवला की कमीत कमी गॅस वापरून आणि अन्नघटकातील जीवनसत्त्वे अबाधित राखून चविष्ट स्वयंपाक तयार होऊ लागला. याच वेळी गॅस सिलिंडरची बचत होऊन केवळ आठ सिलिंडर पुरेसे ठरू लागले. आता या संशोधनाचा फायदा इतर अनेक नामांकित संस्थांनाही होत असतो. सरांच्या मते असं संशोधन व्यक्तिगत फायद्याचं ठरतंच, पण ते राष्ट्रीय संपत्तीही वाढवतं. व्यक्तीने समष्टीचा विचार, विधायकतेने कसा करावा याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दुसरी गोष्ट सरांच्या व्यक्तिगत जीवनातली. एका कंपनीसाठी परदेशातून ‘हायड्रोजनेटर’ नावाचं संयंत्र आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली, परंतु त्या संयंत्राची किंमत त्या कंपनीला परवडणारी नव्हती. तेव्हा कंपनीने ‘हायड्रोजनेटर’चं केवळ तंत्रज्ञान आणावं असं सुचवलं. मात्र त्या तंत्रज्ञानाचीच किंमत एकूण किमतीच्या नव्वद टक्क्यांहून अधिक होती! ज्ञान किंवा ‘नॉलेज’ यालाच खरी ‘किंमत’ असते हे जाणवलेल्या सरांनी स्वतःचं एका ‘हायड्रोजनेटर’चा आराखडा तयार केला. हे संयंत्र त्या परदेशी संयंत्रापेक्षा अधिक सक्षम तर होतंच, पण त्याची किंमतही परदेशी हायड्रोजनेटरच्या किमतीच्या 10 पटीने कमी होती! अशा पद्धतीच्या अनेक संयंत्रांना आता परदेशातही मागणी असून परदेशी उद्योजक ते पाहून प्रभावित होतात हे सरांच्या संशोधनाचं मोठं यश आहे.

वैज्ञानिक संशोधनातून सर्वंकष संपन्नतेकडे कसं जाता येईल या विषयावर जोशीसर देशभर व्याख्यानं देतात. देशातील गरिबी दूर करायची तर उत्तम संशोधन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला प्रगतिपथावर कशी नेऊ शकते, ते अनेक उदाहरणांसह स्पष्ट करतात. सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपाचं हे व्याख्यान श्रोत्यांना स्फूर्तिदायक वाटतं. सकारात्मक विचारांनी नवी आव्हानं पेलून त्यावर मात करण्याची ऊर्जा संशोधनकार्यात कशी उपयुक्त ठरते याची जाणीव अशा व्याख्यानांमधून होते. देशापुढची गरिबीची समस्या दूर करायची असेल तर ‘जय विज्ञान’शिवाय पर्याय नाही असं सरांचं ठाम मत आहे.

मितभाषी, शांत स्वभावाचे डॉ. ज्येष्ठराज जोशीसर, सामान्यातला सामान्य माणसाशी आपुलकीने संवाद साधतात. विख्यात शास्त्रज्ञ असल्याचा अहंभाव त्यात कुठेही नसतो. सरांच्या या अपूर्व यशात त्यांच्या पत्नी ऋतुजा यांचाही मोलाचा वाटा आहे. आता या वयात ‘लिव्ह टू गिव्ह’ म्हणजे समाजाचं ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांची कृतिशील धारणा आहे.