
>> दिलीप जोशी
लता मंगेशकर, वसंत प्रभू आणि पी. सावळाराम या त्रयींची कित्येक मधुर गीतं आजही रेडिओवर लागतात. कार्यक्रमांमध्ये गायिली जातात. आज या तिघांपैकी कोणीही नाही, पण त्यांनी निर्माण केलेली संगीतमय लेणी आजही मोहक वाटतात.
एक हृद्य गाणं 1950 च्या दशकापासून मराठी मनात रुजलं आहे. लतादीदींच्या स्वरातल्या या गीताचं संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी आणि शब्द आहेत पी. सावळाराम यांचे. याच ‘गंगा-जमुना डोळय़ात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ असं सासरी जाणाऱ्या एका नववधूला तिची आई साश्रुनयनांनी सांगतेय. पुणे स्टेशनवर असाच एक प्रसंग घडत असताना तिथे असलेल्या पी. सावळाराम यांना एकदम या गीताचे बोल स्फुरले आणि एक अजरामर गाणं निर्माण झालं.
निवृत्तीनाथ पाटील या कोल्हापूरच्या तरुणाला तरुण वयापासूनच कविता करण्याचा छंद होता. तिथल्या राजाराम कालेजमध्ये शिकत असताना लाभलेला कवी माधव ज्युलियन यांचा सहवास आणि वि. स. खांडेकरांसारख्या दिग्गज लेखकाचं करवीर नगरीतलं वास्तव्य हा निवृत्तीनाथाच्या काव्यप्रतिभेला स्फूर्ती देणारा काळ होता. नंतरच्या काळात अनेक चित्रपट गीतं आणि भावगीतं सहजतेने लिहिणारे आणि ‘जनकवी’ असं यथार्थ बिरुद लाभलेले निवृत्तीनाथ गीतलेखन क्षेत्रात गाजले ते मात्र पी. सावळाराम या नावाने. त्यांची वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली पहिली काही गीतं ‘निवृत्ती पाटील’ याच नावाने आली, परंतु त्याच नावाचे दुसरे एक कलाकार नागपूरला होते. त्यामुळे त्यांनी वि. स. पागे यांच्या सल्ल्यावरून ‘सावळाराम’ हे कविनाम घेतले आणि ‘सावळाराम पाटील’ असं न लिहिता, त्या काळच्या सिनेपरंपरेनुसार व्ही. शांताराम, सी. रामचंद्र या नावांप्रमाणे पडद्यावर ‘गीतकार पी. सावळाराम’ असं नाव येऊ लागलं. त्याच नावाने त्यांना अमाप प्रसिद्धी दिली. मात्र त्या काळात अशा प्रतिभावंतांना अगदीच बेताचं मानधन मिळत असे. त्यामुळे रेशनिंग कार्यालयातली नोकरी सांभाळून पी. सावळाराम काव्यलेखन करू लागले.
ठाण्यातील भास्कर कॉलनीच्या आसपास ते अनेकदा दिसायचे, सहज गप्पांमध्ये सामील व्हायचे. उपप्राचार्य असलेल्या माझ्या मावसभावाकडे जायचो तेव्हा सावळाराम यांची काही वेळा भेट व्हायची. आम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करतो म्हटल्यावर ‘आम्हालाही दुर्बिणीतून आकाश दाखवा’ असं एकदा ते म्हणाले. तो योग काही आला नाही, पण संगीतकार वसंत प्रभू यांच्याविषयी त्यांची मुलाखत घेण्याची संधी मात्र लाभली. त्यांच्याच घरी एका सकाळी सुमारे दीड तास आमच्या गप्पागोष्टी रंगल्या. पुरेसं ‘होमवर्क’ करून गेल्याने मला जनकवी सांगत असलेले जुने संदर्भ समजत होते. माझे वडीलही कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचेच विद्यार्थी असल्याने त्यांनीही सांगितलेल्या काही आठवणी जनकवींना सांगितल्या. वसंत प्रभूंविषयी ते भरूभरून बोलत राहिले. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ हे गीत लिहून झाल्यावर ते फोनवरून लता मंगेशकर यांना वाचून दाखवताच त्या कशा भावविवश झाल्या ती आठवण सावळाराम यांनी सांगितली. बोलता बोलता ते म्हणाले, “लोकांना माझी गाणी आवडली. कारण मी सोप्या शब्दांत लिहिलं. ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’. बघ, किती साधेसोपे शब्द आहेत. कुणीही गुणगुणावेत असे. तुला गंमत सांगतो, एकदा माडगूळकर मला गमतीने म्हणाले, सावळय़ा, मी एवढा मोठा कवी, पण माझी पत्नी तू लिहिलेली गाणी गुणगुणते रे!” खरं तर ही सावळाराम ‘जनकवी’ असल्याची पावतीच होती. माडगूळकरांना सावळारामांविषयी आदर होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विनंती करून त्यांनी पी. सावळाराम यांना ठाणे शहराचं अध्यक्ष केलं. नगराध्यक्ष झालेला मराठीतला बहुधा एकच कवी असेल. अनेक कवी आमदार झाले, पण नगराध्यक्षपदाचा मान पी. सावळाराम यांनाच मिळाला. त्यांच्या या संभाषणाची नोंद डिक्टाफोनवरच्या ‘मायक्रो कॅसेट’मध्ये केली. आज त्या चिमुकल्या कॅसेटवरून आवाज ‘डिजिटाइज’ करण्याची यंत्रणा मिळणं कठीण. अशा अनेक ध्वनिमुद्रित मुलाखतीचं संचित तसंच राहणार की काय? असं वाटतं.
पी. सावळाराम यांच्या भावगीतांवर आणि चित्रपट गीतांवर नजर टाकली तर विविध संगीतकार आणि गायक-गायिकांनी स्वर-सूरबद्ध केलेली त्यांची अनेक गाणी गतकाळ सजीव करतील. ‘उठी गोविंदा उठी गोपाळा’, ‘कृष्णा मिळाली कोयनेला’, ‘अपुरे माझे स्वप्न राहिले’, ‘ओळख पहिली गाली हसते’, ‘असावे घर ते अपुले छान’, ‘कोकीळ कुहूकुहू बोले’, ‘गा रे कोकिळा गा’, ‘गोडगोजिरी लाजलाजिरी’, ‘घट डोईवर घट कमरेवर’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘धागा धागा अखंड विणू या’… ही यादी खूपच मोठी आहे. यातलं प्रत्येक गाणं सुश्राव्य, सुमधुर आहे. पी. सावळाराम यांनी भक्तिगीत, प्रेमगीत, भावगीत अशा अनेक काव्यरचना केल्या. त्या तीन-चार दशकं तर सर्वतोमुखी झाल्या. त्यांची शं. ना. नवरे यांनी घेतलेली दूरदर्शनवरची मुलाखत मला आठवते. ती शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या काळात ‘व्हिडीओ’ करणं सोपी गोष्ट नसल्याने तसं चित्रण किती उपलब्ध आहे, ठाऊक नाही. कदाचित त्यांच्या काव्याच्या सीडी असतीलही. खरं तर हे सगळं शोधून एखाद्या जतनालय किंवा संचितालयात (अर्काइव्हमध्ये) ग्रंथित करायला हवं. या सगळय़ा मोठय़ा माणसांचं कर्तृत्व हे अवघ्या महाराष्ट्राचं संचित आहे.
❚ [email protected]


























































