
>> ज्ञानेश पेंढारकर
चतुरस्र शास्त्रीय गायक आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-नट, संगीतभूषण पं. राम मराठे हे जसे उत्तम गवैये आणि उत्तम कलावंत होते तसेच उत्तम व्यक्तीदेखील होते. सर्वांशी हसतखेळत वागणे हे त्यांचे वैशिष्टय़. रंगमंचावर गातानाही रामभाऊ कधीच गाण्याच्या आहारी गेले नाहीत. ठरलेले, शिस्तपूर्ण गाणेच ते गात. गळा फिरतो म्हणून तो कधीही त्यांनी वाकडा तिकडा फिरवला नाही. कारण सांगून तालमीला कधीही दांडी मारली नाही. वेळप्रसंगी डोक्यावर नाटकाचे सामानही उचलले. अतिशय साधी राहणी होती त्यांची… पं. राम मराठे यांच्या 23 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या जन्मशताब्दीनिमित्त…
वरील शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हा लेख रामभाऊंवर आहे की वाद्यावर?
प्रश्न बरोबर आहे. शीर्षक वाचून कोणाचाही गैरसमज होणे साहजिक आहे. तेव्हा या शीर्षकाचा उलगडा करतो आणि पंडित रामभाऊंना या लेखाद्वारे शब्द सुमनांजली वाहतो.
गोष्ट मे 1958 सालची. मध्यरात्री एक वाजता साहित्य संघाच्या ओपन एअर रंगमंचावर रेकॉर्डिंग चालू होते. रामभाऊ एक बंदिश गात होते. साथीला गोविंदराव पटवर्धन, दामूअण्णा पार्सेकर, तंबोऱयाला आ.दे. पाटील, शंकर घाणेकर आणि रामभाऊंबरोबर माझे वडील भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णादेखील गात होते. ते रेकॉर्डिंग होते ‘दुरिताचे तिमिर जावो’ या नाटकातील नांदीचे. रामभाऊ नटबिहाग रागातील ‘डमरू डमडम बाजे’ ही चीज गात होते आणि त्यांच्या आलापादरम्यान अण्णा बिभास रागात ‘दुरिताचे तिमिर जावो’ ही ओळ गात होते. सर्वांना मिळून एकच माईक. अण्णा गाता गाता रेकॉर्डिंग करत होते.
1958 मेपर्यंत प्रयोगात अण्णा ही चीज नांदी म्हणून गात असत. याच वर्षी ललितकलादर्शच्या सुवर्ण महोत्सवात 5 जानेवारीला रामभाऊंचे गाणे झाले. त्यात ते अडाणा रागातील एक चीज गायले. जणू काही ललितकला त्यांच्या मुखातून वदली ‘आये मोरे दरबार’. ही चीज गाताना रामभाऊंनी वझे बुवांची अप्रतिम नक्कल केली होती. जणू काही वझे बुवांची अनुज्ञा घेऊनच ललितकलेच्या दरबारात रंगभूमीच्या सेवेसाठी मी सज्ज आहे, असे रामभाऊंनी सुचवले.
पुढे अशी घटना घडली की, एप्रिल 1958 रोजी अण्णांनी सोनी कंपनीचा टेपरेकॉर्डर विकत घेतला, तर 5 मे रोजी वझे बुवांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्राम्हणसभा, गिरगाव येथे रामभाऊंचे गाणे ऐकण्याचा योग अण्णांना आला. त्या बैठकीत रामभाऊ नटबिहाग आणि त्याची जोड ‘डमरू डमडम बाजे’ ही चीज गायले होते. ती चीज ऐकताच अण्णांनी तिथेच ठरवून टाकले की, ‘दुरिताचे तिमिर जावो’ या नाटकातील नांदी ‘डमरू डमडम बाजे’ ही स्वत: न गाता रामभाऊंच्या आवाजात रेकॉर्ड करायची. त्याप्रमाणे ती रेकॉर्ड झाली आणि मे1958 पासून ते 2002 पर्यंत ती हजारो प्रयोगांत वाजत होती.
योगायोग असा की, शंकराची नांदी म्हणत रामभाऊ ललितकलेत आले आणि ललितकलेच्या विद्याधर गोखले लिखित ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकात त्यांनाच प्रत्यक्ष शंकराची भूमिका करण्याचा योगही आला. आपल्या अभिनयाने आणि सप्तसुरांच्या झंकारांनी ललितकलादर्शची विजयी पताका थेट कोलकाता ते चेन्नई, गोवा ते दिल्ली, कोकण ते ग्वाल्हेरपर्यंत झळाळून टाकली. साधारण 14 ऑगस्ट 1966 ते 1984 पर्यंत हजार ते दीड हजार प्रयोग रामभाऊंनी केले असावेत. साक्षात शंकर कसे दिसत असतील तर रामभाउंढसारखे आणि गात कसे असतील तर तेही रामभाऊंसारखेच, असे रसिक प्रेक्षक आणि समीक्षक म्हणू लागले.
या नाटकाचे पहिले तीन प्रयोग बिर्ला मातोश्री येथे एकाच दिवशी झाले होते, पण या तीनही प्रयोगांचे मानधन रामभाऊंनी घेतले नाही.कारण ज्या संस्थेला सिद्धारूढस्वामी, केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर,भालचंद्र पेंढारकर आणि वझे बुवा अशी परंपरा लाभलेली आहे, त्या संस्थेने मला मानाने बोलवून घेतले हेच माझे मानधन असे सांगून रामभाऊंनी पहिल्या तीन प्रयोगांचे मानधन घेतले नाही.
रामभाऊंनी ललितकलेच्या तीन नाटकांत कामे केली-
1. जय जय गौरीशंकर
2. मंदारमाला, 3. रंगात रंगला श्रीरंग
तर ललितकलेच्या पाच नाटकांसाठी त्यांनी नांदी गायल्या आहेत.
जाता जाता अजून एक आठवण. अण्णांच्या एकसष्ठीनिमित्त साहित्य संघात झालेल्या समारंभात ‘जय जय गौरीशंकर’ नाटकाचा प्रयोग होता. अंगात दोनपर्यंत ताप असतानासुद्धा रामभाऊ ठाण्यावरून गिरगावात आले. कोणालाही तापाबाबत सांगायचे नाही अशी घरच्यांना तंबी दिली होती, पण नांदी गाताना रामभाऊंचा स्पर्श अण्णांना झाला तेव्हा रामभाऊंना ताप आहे याची जाणीव अण्णांना झाली. कारण त्यांचे संपूर्ण शरीर तापाने धगधगत होते, पण कुठेही नखरे नाहीत, ना त्याची कामातील आणि गायनातील ऊर्जा कमी झालेली. प्रयोगानंतर मानधन अण्णांच्या हाती देऊन रामभाऊ इतकेच म्हणाले की, आज तुमचा दिवस आहे, आज मी मानधन घेणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे. तसेच माझ्यामुळे ललितकलेचा प्रयोग रद्द होणे हे मला पटत नाही.
रामभाऊंवर लिहिण्याइतका मी मोठा नाही, पण जे अण्णा त्यांच्याबद्दल बोलत ते इथे नमूद करतो. रंगमंचावर गाताना रामभाऊ कधीच गाण्याच्या आहारी गेले नाहीत. ठरलेले, शिस्तपूर्ण गाणेच ते गात. गळा फिरतो म्हणून तो कधीही त्यांनी वाकडा तिकडा फिरवला नाही. चोख पाठांतर हा आणखी एक गुण. शिवाय कारण सांगून तालमीला कधीही दांडी मारली नाही. वेळप्रसंगी डोक्यावर नाटकाचे सामानही उचलले. सर्वांशी हसत खेळत वागणे, दौऱयात कधीही त्रास दिला नाही की हेच का, तेच का, मला हेच हवे, तेच हवे वगैरे केले नाही. कितीही मोठा कार्पाम आला आणि अगोदर नाटकाची तारीख घेतली असेल तर रामभाऊंनी कधीच प्रयोग रद्द केला नाही. अतिशय साधी राहणी होती त्यांची.
उत्तम खवैये, उत्तम रसौये, उत्तम गवैये आणि एक उत्तम अशी व्यक्ती म्हणजे रामभाऊ… पं. राम मरा”s!
त्यांच्या जन्मशताब्दीसाठी माझी ही अल्प साहित्यसेवा!
❚ [email protected]
(लेखक नाटय़क्षेत्रात कार्यरत आहेत)




























































