लेख – शिक्षक प्रशिक्षण : पुनर्विचाराची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे, शिक्षणातूनच जबाबदार शिक्षक, आदर्श विद्यार्थी निश्चित घडू शकतील. मात्र शिक्षक प्रशिक्षण ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही, हे चुकीचे आहे. आपल्यांकडे शिक्षणाच्या समस्या व प्रशिक्षण वेगवेगळय़ा मार्गाने जात आहे. प्रशिक्षणाच्या उपक्रमाला जोपर्यंत शाळा न्याय देणार नाही, तोपर्यंत शिक्षक प्रशिक्षण कागदोपत्रीच राहील. प्रशिक्षण जर याच पद्धतीचे ठेवायचे असेल तर त्याचा फार्स कशासाठी? त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

शिक्षकांना हमखास नोकरी देण्याचा परवाना अडचणीत आला आहे. संख्या घटल्याबरोबरच अध्यापक महाविद्यालयातील जागासुद्धा कमी झाल्या आणि त्यामुळे काही महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, काही बंद पडली आहेत. विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीची हमी नाही. भरतीसाठी पवित्र पोर्टल, पण त्याच्या पवित्र असण्याबद्दल शंका आहे. A wrong teacher spoils the class, but wrong teaching agency spoils the nation. असे म्हटले जाते ते खरंच आहे. आपल्यांकडे शिक्षणाच्या समस्या व प्रशिक्षण वेगवेगळय़ा मार्गाने जात आहे. प्रशिक्षणाच्या उपक्रमाला जोपर्यंत शाळा न्याय देणार नाही, तोपर्यंत शिक्षक प्रशिक्षण कागदोपत्रीच राहील. प्रशिक्षण जर याच पद्धतीचे ठेवायचे असेल तर त्याचा फार्स कशासाठी? त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी प्रशिक्षण महाविद्यालये म्हणजे जणू ‘केबीसी’चा कोरा चेक म्हणून वाटली गेली. भलत्याच निकषांवर प्रशिक्षणार्थी निवडले गेले. नंतर ते मूळ कळपातसुद्धा सामील झाले. देणगीच्या कुबडय़ांनी अनेक जण शैक्षणिक क्षेत्रात आले. शिक्षण व्यवसायापेक्षा धंदा बनला व तो चालविण्याचा परवाना म्हणजे प्रशिक्षण ठरले. मुळात आपल्याकडे शेवटचा पर्याय म्हणून प्रशिक्षणाकडे पाहिले जाते. कुठेच नोकरी नाही म्हणून शेवटी प्रशिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी करण्यासाठी अध्यापनात रस नसलेले अध्यापनात आले. आरामदायी, जास्त सुट्टी असलेली नोकरी अशा प्रकारे त्याकडे पाहिलं गेलं. शिक्षण क्षेत्रात हे ‘प्रशिक्षित’ परवानेधारक अपघात घडवत आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर होत आहे. प्रशिक्षणाची अट शिथिल केली तर किती जणांना ते घ्यावंसं वाटेल?

प्रशिक्षणातून विद्यार्थी तावून सुलाखून निघाला पाहिजे, सुखावून नव्हे. प्रशिक्षणाशिवाय प्रभुत्व येत नाही. प्रभुत्व नसेल तर अपघात अटळ आहेत. प्रशिक्षण महाविद्यालयात शिकलेल्या अनेक गोष्टी काही शिक्षक खुंटीला टांगून ठेवतात. शाळा तपासणीच्या दिवशीच फक्त त्या अमलात आणल्या जातात, अशाही काही शाळा आहेत. शिक्षण अधिकाऱयांची भेट, तपासणी असो नसो, काही शाळा अतिशय चांगल्या चालतात. प्रशिक्षणातून आनंददायी प्रशिक्षण पाझरायला हवं. शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावं असा हवाहवासा अनुभव वाटला पाहिजे. प्रशिक्षणामुळे शिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. प्रशिक्षणातून नवीन दृष्टी मिळायला हवी. प्रशिक्षणातून भावी आयुष्याची शिदोरी शिक्षकांना मिळायला हवी. मरगळ टाळण्यासाठी प्रशिक्षण हे सातत्याने हवे. प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक कार्य करून देणाऱया काही संस्था निघाल्या आहेत. पैसे देऊन ते प्रात्यक्षिक कार्य करून देतात. मग अध्यापनाचा दर्जा कसा सुधारणार? सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण यामुळे अध्ययन, अध्यापनाचा दर्जा सुधारतो. सेवांतर्गत प्रशिक्षण भारावून टाकणारे असेल तर दिल्लीच्या सरकारी शिक्षणाचा कायापालट होतो. महाराष्ट्रातही काही सरकारी शाळेत पालकांच्या प्रवेशासाठी रांगा लागतात हे निश्चितच आशादायक आहे. पूर्वीचे शिक्षक आठवतात, ते त्यांच्या आशय, विषय प्रभुत्व यामुळे. इतिहास तोंडपाठ असणारे, कविता चालीवर म्हणणारे, पाढे तोंडपाठ असणारे, त्या वेळेस आशय हेच प्रशिक्षण होते. शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास प्रशिक्षणाचा दर्जा आपोआप सुधारेल.

प्रशिक्षणातून कौशल्ये विकसित होणार नसतील, दृष्टी मिळणार नसेल तर अध्यापन निरस व कंटाळवाणे होते. काही ठिकाणी वर्षभर विद्यार्थी न येता निकाल 100 टक्के लागतो कसा? अंतर्गत गुण किती व कसे दिले जातात, हे आधी तपासा. प्रात्यक्षिक, हजेरी, समितीच्या अटी, पात्र प्राचार्य, प्राध्यापक हे तपासा व मग अभ्यासक्रम चार वर्षांचा करा. आहे ते नीट चालवा, त्यात नावीन्य आणा. गाडी शिकण्यासाठी प्रशिक्षण घ्यावंसं वाटतं तसं अध्यापन करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावंसं वाटलं पाहिजे.

प्रशिक्षण नीरस व कंटाळवाणे होत असेल तर शिक्षकांचे प्रशिक्षणाप्रति औदासीन्य वाढणार. शिक्षणात आदर्श, प्रशिक्षणात वास्तव या दोन्हीचा समन्वय साधून शैक्षणिक समस्यांची उकल शिक्षकाकडून अपेक्षित आहे. व्यासपीठावरून केवळ आदर्श परिस्थिती विचारात घेऊन व्याख्यान देण्याने शैक्षणिक प्रश्नांची उकल होत नसेल तर ते प्रशिक्षण आपलेसे वाटत नाही. पाच नाजूक बोटांत प्रचंड सामर्थ्य आहे. हे शिक्षकांना कळले पाहिजे, तरच ते विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होईल. ‘टीचिंग विदाऊट टीयर्स’ हे शेवटी महत्त्वाचे आहे. शिक्षण व प्रशिक्षण यांच्या मिलाफाने अध्यापन हवेहवेसे वाटणारे इंद्रधनुष्य वाटले पाहिजे, पण थैली अर्पण करून वशिल्याने आलेल्यांना या इंद्रधनुष्याची पर्वा काय असणार? सेवापूर्व प्रशिक्षण ही बाब ‘विनाअनुदान’ उघडल्यापासून गांभीर्याने राहिलेली नाही. ज्यांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेतले होते त्यांच्या रांगेत गोदामात पाठ घेतलेल्यांनाही बसवले गेले हे दुःख आहे. आज शासकीय प्रशिक्षण महाविद्यालये बंद होत आहेत. कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिरात नाही. अनेक शासकीय अध्यापक महाविद्यालयांत प्राचार्य नाहीत, प्राध्यापक नाहीत. एक वर्षाचे प्रशिक्षण ठीक होतं, ज्यामध्ये सर्व प्रकारचे कार्य ठीक करून घेतलं जायचं. विनाअनुदान उघडल्यापासून प्रवेश व नोंदणी पूर्ती करणारी महाविद्यालये उघडली गेली. 15 ऑगस्टला मानवंदना करून उघडणारी महाविद्यालये होळीच्या आधीच बंद झाली. शिक्षकांची गरज पाहिलीच गेली नाही, अनेकांना आशेचा पासपोर्ट दिला गेला, पण उड्डाण झालंच नाही.

प्रशिक्षण महाविद्यालयासाठी शिक्षक निवडताना शिक्षण निवड प्रक्रियाच चुकीच्या मार्गाने जात आहे. शिक्षक निवड प्रक्रिया प्रशिक्षणापूर्वीच योग्य व्हावी. शिक्षक होण्याची किंमत व वेळ वाढली आहे. शिक्षण प्रशिक्षण यासाठीची किंमत मोजून अनेक जण विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी रांगेत उभे आहेत. अध्यापन पदविका अभ्यासक्रमासाठी बारावीनंतर प्रवेश घेता येता. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला की, शिक्षण सेवेत येण्यास विद्यार्थी पात्र ठरतो. या काळात त्याच्या किशोरवयीन अवस्थेतून प्रौढत्वाकडे प्रवास सुरू असतो. त्यामुळे बालमानस समजून घेऊन अध्यापन करण्याची समजही त्याच्यात येत नाही. यांसह अनेक गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने चार वर्षे कालावधीचा एकात्मिक अध्यापन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. विद्यार्थी व प्रशिक्षण महाविद्यालय त्यास कसा प्रतिसाद देतात त्यावरच पुढील शिक्षणाची दिशा ठरेल.