
>> डॉ. अनुराधा रानडे
दान या संकल्पनेला प्राचीन हिंदुस्थानाच्या वाङ्मयात अनन्यासाधारण महत्त्व आहे. उत्तर वैदिक कालखंडापासून गृहदान, सुवर्णदानाचे उल्लेख आहेत. याच काळात भूमिदानासही सुरुवात झाली असावी. विनोबा भावेंनी सुरू केलेली भूदान चळवळ स्वातंत्र्योत्तर काळात लोकप्रिय ठरली. भूमिदान संकल्पना ते भूदान चळवळ हा प्रवास मांडताना या संकल्पनेच्या इतिहासाविषयी माहिती सांगणारा हा पूर्वार्धाचा लेख.
नवाश्मयुगापासून मानवाने जमीन कसून त्यातून धान्योत्पादन करावयास सुरुवात केली. भटक्या शिकारी अवस्थेकडून स्थिर जीवनाच्या मार्गावरील हा पहिला टप्पा ठरला. मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेल्या जमिनी लागवडीयोग्य करून अन्नोत्पादनाद्वारे अन्नसुरक्षा मिळवणे यासाठी हे प्रयत्न होते. अर्थातच भूमीला मोठे महत्त्व आले आणि मानवाची अन्नदात्री म्हणून नंतरच्या काळात तिला देवता स्वरूप प्राप्त झाले.
‘दान’ ही एक उदात्त संकल्पना आहे. आपल्यापाशी असल्या संपत्ती, धनधान्यादी वस्तू गरजवंताला श्रद्धापूर्वक देणे, विनामोबदला, कशाचीही आशाअपेक्षा न ठेवता देणे म्हणजे दान होय. दानधर्म करणे, धर्मादाय देणगी देणे हे जवळपास सर्वच धर्मांचे एक वैशिष्टय़ आहे. दान देण्याच्या क्रियेला प्राचीन हिंदुस्थानी वाङ्मयात अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यात दानांबरोबर दक्षिणेचेही उल्लेख येतात. मात्र दक्षिणा ही पुरोहिताने यज्ञकर्म संपन्न केल्याचा मोबदला म्हणून दिली जाई, तर दान हे गरजवंताला निर्हेतुकपणे केले जाई. अर्थात त्यामागे पुण्यप्राप्ती व्हावी असा हेतू असावा. उत्तर वैदिक कालखंडापासून दान प्रकारांचे म्हणजे गोदान, सुवर्णदान, हत्तीदान, गृहदान वगैरे उल्लेख येतात. याच कालखंडात कधी तरी जमिनीचेही दान दिले गेले असावे. अनाथपिंडकाने जमीन विकत घेऊन ती गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्या निवासस्थानासाठी दान दिल्याची माहिती जेतवन जातकात आलेली आहे.
तिसरी बौद्ध संगिती सम्राट अशोकाच्या आश्रयाने पाटलीपुत्र येथे आयोजित करण्यात आली होती. त्याचे फलित म्हणून बौद्ध धर्मप्रसाराचे कार्य मोठय़ा प्रमाणावर सुरू झाले. देशभरात आणि परदेशातही हजारो धर्मप्रचारक (भिक्षू) पाठवण्यात आले. या भिक्षूंच्या वर्षाकालातील वास्तव्यासाठी विहारांची निर्मिती झाली. त्यांच्या वास्तव्यासाठी विहार, धर्मोपदेशासाठी चैत्यगृह आणि पूजास्थळ म्हणून स्तुप -स्थापत्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या संदर्भात पाहावयाचे गेले तर असे म्हणता येईल की, बेसॉल्ट नामक लाव्हारसाने बनलेल्या डोंगराळ कठीण कातळाच्या खडकाळ डोंगरात कोरीव लेण्यांची निर्मिती झाली. चैत्य, स्तूप, विहार अशा प्रकारच्या कोरीव लेण्या खोदल्या गेल्या आणि जागतिक वारसा ठरेल असे लयनस्थापत्य त्यातून निर्माण झाले. हे लेण्यांच्या निर्मितीबाबत उपलब्ध असलेल्या कोरीव लेखांमधून स्पष्ट होते. त्यात लोकसहभागाचा वाटा फारच मोठा असून समाजातील सर्वच वर्गांनी त्याला हातभार लावलेला दिसून येतो. भिक्षूसंघाच्या वाढीबरोबरच विहार-वसाहतींची संख्या वाढलेली दिसते. त्यांच्या अन्नधान्याच्या सुरक्षेसाठी द्रव्य, इतर वस्तू यांबरोबरच शेतजमिनीचेही दान दिले गेले आणि भूदान प्रथेला एक नवीन आयाम मिळाला. संघांना मिळालेल्या शेतजमिनी ‘भिख्खूहल’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. भूदान देणाऱयाचे शुभचिंतन करून त्यांना पुण्यप्राप्तीचा शुभाशीर्वाद देत असावे असे दिसते. कारण कोरीव लेखांमध्ये दान देण्याचा हेतू ‘पुण्यप्राप्तीसाठी हे दान देत आहे’ असा स्पष्टपणे लिहिलेला दिसतो. बौद्ध संघांना, वैदिक पुरोहितांना दान म्हणून विविध वस्तू, द्रव्य, स्थापत्याची निर्मिती इत्यादींचा लाभ होत असे. मात्र बौद्ध संघांना मिळालेली भूदाने ही सर्वांत आकर्षक आणि प्रिय ठरली. कारण तिच्यातून उत्पन्न हे नैमित्तिक न राहता नित्य स्वरूपाचे असल्याने भूमिप्राप्तीचा लाभ असल्यामुळे भूमिदान हे सर्वश्रेष्ठ ठरले.
प्राचीन काळातील भूमिदान प्रथा मध्ययुगातही चालू राहिली. भूमिदानामुळे प्राप्त होणाऱया पुण्याचा स्मृतींनीही अतिशय गौरव केला. त्यामुळे मध्ययुगात मोठय़ा प्रमाणावर भूमिदान झाले. प्राचीन काळापासून भूमिदान प्रथा पुढेही अखंड चालू राहिली. वेळोवेळी तिचे स्वरूप बदलले. परंतु अनेक राजवटी आल्या आणि गेल्या तरी भूमिदान प्रथा अखंड राहिली. विविध राजवंशांच्या कोरीव लेखांतून (शिलालेख व ताम्रपट) आणि मध्ययुगात कोरीव लेखांबरोबरच दस्तखत केलेल्या कागदपत्रांवरून हे दिसून येते.
सुरुवातीस जरी बौद्ध संघाला भूमिदाने दिली गेली तरी पुढै वैदिक धर्मीयांना विशेषतः पुरोहित, ब्राह्मणांनाही ती दिली गेली. बौद्ध संघाच्या जमिनी ‘भिक्षूहल’ तर ब्राह्मण-पुरोहितांच्या जमिनी ‘ब्रह्मदेय’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. पुढे अनेक ब्राह्मणांना मिळून एखादे ग्राम दान करून तेथे अग्रहार वसवला जाई. सातवाहन ते यादव आणि नंतर आलेल्या मुसलमानी राजवटीच्या काळातही भूमिदान प्रथा चालूच राहिली, मात्र तिचे स्वरूप थोडे बदलले. धर्मादाय जमिनींबरोबरच सेवेच्या मोबदल्यात सरकारी नोकर अथवा विशेष कामगिरीसाठी खासगी व्यक्तींना जेव्हा जमिनी इनाम म्हणून दिल्या त्यातून इनामदारी पद्धत सुरू झाली. वतने देण्यातून वतनदारी पद्धत सुरू झाली. बलुतेदारांनाही जमिनी वतन/बक्षीस दिल्या गेल्या.
भूमिदान हे विविध स्वरूपाचे असे. कधी शेतजमिनीचे तुकडे, कधी फळबागा तर कधी ग्रामदान. यापैकी दस्त दिलेल्या जमिनीचे हक्क बहुधा दानग्रहीकडे सुपूर्द केलेला असतो. शिवाय त्या जमिनीच्या सीमारेषेत असलेल्या निधी, निक्षेप, जल, पाषाणसारख्या आठ प्रकारच्या उत्पन्नाचा मालकीहक्क दानग्रहीकडे दिलेला असे. ग्रामदानाचे स्वरूप मात्र वेगळे होते. ग्रामदान म्हणजे संपूर्ण गावातील जमिनींचे दान नसून गावापासून सरकारकडे जाणारे उत्पन्न दानग्रहीकडे येई, तसेच त्या गावातील देव-ब्राह्मणांना दिलेल्या जमिनी किंवा घरे सोडून उरलेल्या भागावर दानग्रहीचे स्वामित्त्व प्रस्थापित होते. तरीही केवळ सरकारी उत्पन्न सरकारकडे न जाता दानग्रहीकडे तो वाटा येत असे. काही वेळा मात्र तेथील सरकारी जमिनी पडीक असल्यास त्या लागवडयोग्य करणे आणि त्याच्यातून उत्पन्न घेऊन त्याचा उपभोग घेणेही शक्य असे, परंतु ग्रामदानात प्रामुख्याने गावाकडून शासनाला मिळणारे उत्पन्न हेच केवळ दान दिले जाई व तेथील जमिनीवर मालकीहक्क न मिळता दानग्रही उत्पन्नाचा केवळ उपभोग घेऊ शके.
हिंदुस्थानात जमीनवाटपाचे स्वरूप म्हणजे पूर्वापार चालत आले आहे. राज्यकर्ते आपल्या ताब्यातील सरकारी जमिनी कारणपरत्वे दान करीत अर्थातच वेळेला पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याच्या आणि शेतमालाचे उत्पादन वाढवून वाढत्या लोकसंख्येचा मेळ घालण्याच्या दृष्टीने भूदानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र जमिनीच्या त्यातील उत्पन्नांच्या लोभापोटी अनेकदा तंटेही झालेले दिसतात. याचे एक प्रातिनिधिक उदाहरण पाहावयाचे झाले तर उत्तर कोकणातील बिंब राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. केळवे माहीम येथे त्यांनी राजधानी बसवली. नवराजधानी निर्माण करताना त्यांनी अनेक कुळे, व्यावसायिक इतर प्रांतातून आणले होते. त्यांचे राजपुरोहित श्रीमान पुरुषोत्तमपंत कावळे हे पैठणहून आमंत्रित करण्यात आले. या नवीन प्रदेशात त्यांनी वस्ती करावी म्हणून त्यांना कित्येक गावांचे उत्पन्न आणि इतर अनेक विशेषाधिकार वृत्ती म्हणून दान दिले गेले. पुढील 100 वर्षांतच या गावांच्या उत्पन्नावरून तंटा निर्माण झाला आणि कोणी एका देव देसला ठाकूर याने या जमिनीच्या मालकीवर हक्क सांगितला आणि त्यावरून झालेला न्यायालयीन वाद आणि निवाडय़ात अस्सल दानपत्राच्या आणि शिलालेखांच्या आधारे पुरुषोत्तम पंत कावळे यांच्या वंशजाचा विजय झाला. यासंबंधी 15 व्या शतकाच्या सुरुवातीचे संपूर्ण निवाडापत्र उपलब्ध आहे.
छत्रपती शिवरायांना वतन म्हणून जमिनी देणे मान्य नव्हते. मात्र धर्मादाय भूमिदान होत राहिले. ब्रिटिश कालखंडात मात्र पारंपरिक शेतजमिनीचे स्वरूप बदलले. भूमिदान मिळवलेल्या दानग्रहींचे परंपरागत भोगवटा हक्क सिद्ध झाले नाही. ब्रिटिश राजवटीतील शेतसारा वसुलीच्या नवीन पद्धती, जमीनदार-सावकार वर्गाचे शोषण, शेतीचे व्यापारीकरण, आधुनिक उद्योगधंदे यामुळे पारंपरिक हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाली.
स्वातंत्र्योत्तर काळात जमीन आणि शेतीसंबंधी समस्यांच्या उपाययोजना करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने अनेक प्रयत्न केले. त्यासंबंधी अनेक नियम, कायदे करण्यात आले. अशा परिस्थितीत गांधी हत्येनंतर त्यांच्या सर्वोदयी विचारांच्या प्रेरणेतून त्यांच्sा पट्टशिष्य, खंदे पुरस्कर्ते विनोबा भावे यांनी एक मोठे आंदोलन सुरू केले. ते म्हणजे भूदान चळवळ.
(लेखिका डोंबिवली येथील पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि इतिहास विभागप्रमुख आहेत. महाराष्ट्रातील भूमिदान परंपरा हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)




























































