आरोग्य – नवीन वर्षाचे स्वागत; आरोग्याची काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  डॉ. छाया वजा

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आपल्या देशात त्याचा शिरकाव होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घ्यावी लागेल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्टी, विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच सहलीचा बेत आखला जात असताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. या काळात कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, हातांची स्वच्छता राखावी, बुस्टर डोस घेतला नसेल अशा नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. लसीकरण झालेले असले तरी काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनाचा पुन्हा शिरकाव – गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचा तज्ञांचा सल्ला

बरेच जण सुट्टय़ांचा आनंद घेण्यासाठी सहलीला जातात. काही जण परदेशवारी करत सुट्टय़ांचा आनंद लुटतात. जर तुम्हीही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात जाण्याची योजना आखली असेल, तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगणे फार गरजेचे आहे. जगभरात अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा संसर्ग होत आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोरोनाचा उद्रेक होत असलेल्या देशांमध्ये जाणे टाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

सहलीला जाताना सोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, पोटासंबंधी समस्या यांसारख्या आजारांवरील औषधे सोबत बाळगावी. दिवसेंदिवस नवीन व्हेरिएंट येत आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

आजारी असल्यास घरी विलगीकरणात रहा. तसेच कोरोनाची लक्षणे आढळून असल्यास गर्दी टाळा. वयोवृद्ध, मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य खबरदारी घ्या तसेच कोरोनाला रोखण्यासाठी उघडय़ावर थुंकणे टाळा. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अतिशय संसर्गजन्य आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरतो. तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनचा BF.7 सबव्हेरिएंट संक्रमित एक व्यक्ती सुमारे 18 लोकांना संक्रमित करू शकते. म्हणूनच आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांमध्ये ओमायक्रॉनचा BF.7 सबव्हेरिएंट (Omicron BF.7) सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते.

सतत वाहणारे नाक, खोकला, घसादुखी, घसा खवखवणे, छातीत गच्च वाटणे आणि वेदना तसेच खोकला अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका. लक्षणे दिसत असतील तर तुम्ही स्वतःला क्वारंटाइन करून घ्या आणि कोविड चाचणी करा. तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा.
(लेखिका अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय, मुंबई येथे जनरल फिजिशियन आहेत)