
>> प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे
दासबोधाच्या दास्यभक्ती समासात दास्यभक्तीचा अर्थ सापडतो. भौतिकातलं वैभक वाढवणं म्हणजे दास्यभक्ती असं समर्थ सांगतात. आपल्या वाय़ाला आलेली सर्व कर्तव्य पार पाडावीत पण सद्गुरूंपासून दूर जाऊ नये ही शिकवण देणाऱया समर्थांचा समाधी दिवस माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी. सांप्रदायिकता जपत 300 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली ही दासनवमीची परंपरा केकळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर साजरी केली जाते.
समर्थ रामदासस्वामी यांचा निर्वाणदिन माघ वद्य 9 (7 मार्च) या दिवशी सज्जनगड, मठ-मंदिर येथे ‘दासनवमी’ स्वरूपात साजरा होत असून त्या उत्सवात प्रतिपदा ते नवमी या काळात व्याख्याने, प्रवचने, भजने, कीर्तने, दासबोध पारायण इ. कार्यक्रमांचे नियोजन केलेले असते. त्या सर्वांतून समर्थांच्या भक्तिमार्गावरील वाटचालीला पूरक, पोषक, मार्गदर्शक असा ‘बोध’ प्रकट केलेला असतो. ‘नवविधाभक्तीपंथे। रामरूप अनुभवी’ असा उल्लेख दासबोधाच्या आरतीतही आहे. त्यामुळे नवविधा भक्तीतील तिसरी भक्ती म्हणून समर्थांनी ‘स्मरण’विषयक समास लिहिला आहे. (द.4 था स. 3रा) श्रवणभक्तीत गुरुमंत्राचा अनुग्रह प्राप्त व्हावा असे विषय असून कीर्तनभक्तीत देव-भक्त (श्रोता) यांचा संबंध सांगून समर्थांनी भक्तिपंथाचा सहजोपदेश त्यातील कथा (आख्यान) सांगून प्रतिपादिलेला असतो. या दोन्ही भक्ती स्मरणोपासनेसाठी उपकारक असून स्मरणोपासनेने ईश्वरदर्शन घेऊन येऊ शकते, हा अध्यात्म विचार प्रकट केला गेला आहे. त्याविषयीचा मागोवा इथे घेतला आहे.
नामस्मरण सर्वकाळी करावे
अध्यात्मप्रांती ईश्वर पाहावयाचा असेल तर सर्वच संप्रदायातील सद्गुरू, सत्पुरुष, संत यांनी नामस्मरण हीच साधना सांगितली आहे. साधना, उपासना ही नित्यनियमितपणे केली जावी असाच उपदेश त्यांनी केलेला असतो. समर्थ रामदास स्वामी यांनीदेखील त्याचप्रकारे बोध केला आहे. ते सांगतात की, ‘स्मरण देवाचे करावे। अखंड नाम जपत जावे। नामस्मरणे पावावे समाधान।। (ओवी 2). नामस्मरण केव्हा केव्हा करावे? तर ते सांगतात की, ‘नित्यनेम प्रातःकाळी। माध्यान्हकाळी, सायंकाळी। नामस्मरण सर्वकाळी करीत जावे।। (ओवी 3). तसेच ‘चालता बोलता धंदा करता। खाता जेविता सुखी होता। नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये।।’ (ओवी 7) संपत्ती असो की विपत्ती असो, कोणत्याही कालगतीत ‘नाम विसरू नये’ असेही ते सांगतात.
नाममाहात्म्य कोणते?
रामदासस्वामी यांनी अहर्निशी नामस्मरण का सांगितले आहे? तर त्यांना नामाचे माहात्म्य सांगायचे असून साधकांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी तत्त्वेही नमूद केली आहेत. कोणती म्हणाल? तर दुष्ट कर्मे (वाटमारी) करणाऱया वाल्या कोळय़ालादेखील नारदमहर्षींकडून उपदेश केला गेला, तेव्हा त्यांनी ‘रामनाम’ हाच मंत्र दिला होता. त्या मंत्राच्या स्मरणाने त्याच्या प्रवृत्तीत एवढे परिवर्तन झाले की, तो वारुळातून बाहेर आला (अंगावर चढलेले वारूळ झटकून) तेव्हा तो ऋषी म्हणूनच प्रकट झाला. त्याने रामचरित्र लिहिले.
नामस्मरण केल्याने काय काय होते हे सांगताना समर्थ म्हणतात, ‘नामे संकटे नासती। नामे विघ्न निवारती। नामस्मरणे पाविजेती। उत्तम पदे।। (ओवी 12) नामस्मरणाने भूतबाधा, चेडे, चेटकेही नाहीसे होतात. रामनामाने पाषाण तरले हेही खरे आहे. पण आजही ते खरे आहे कसे म्हणाल? तर पाषाणहृदयी कठोरपणाने वागणारी माणसे रामनामाच्या उपासनेने कारुण्य जाणून पीडितांना सहाय्यही करण्यास पुढे सरसावतात हे समाजातही आपण पाहतो. ‘सहस्रनामामध्ये कोणी एक। म्हणता होतसे होतसे सार्थक। नामस्मरता पुण्यश्लोक। होईजे स्वये।। (ओवी 20) अशी ग्वाहीदेखील समर्थांनी दिली आहे. याचा अर्थ व्यापक आहे. कसा म्हणाल? तर देवाची सहस्रनामे जरी असली तरी त्यातील एक म्हणजे जे नाम सद्गुरूकडून मिळते त्याचा जप केला तर त्यायोगे ईश्वरदर्शन होऊ शकते. कारण त्या नामात श्रीसद्गुरूंनी आपल्या कृपादृष्टीची शक्ती प्रदान केलेली असते. म्हणूनच गुरुमुखाने किंवा गुरुप्रदत्त नाम हेच ‘सबीज’ नाम म्हणून सांगितले गेले आहे. म्हणूनच अनुग्रह होऊन नाममंत्रप्राप्ती होणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
चहुवर्णी नामाधिकार
रामनामच केवळ नव्हे, तर सद्गुरूंकडून जे नाम मिळाले असेल त्यात ईश्वर पाहण्याची शक्ती अहर्निशी स्मरणोपासना केल्याने येते असेच अध्यात्मशास्त्र्ा सांगते. देवाच्या नामात जसा भेद नाही, तसाच आणखी एक विचार इथे समर्थांनी सांगितला आहे. कोणता म्हणाल? तर नामाचा अधिकार केवळ कुणा वर्णापुरता मर्यादित नाही. तर समर्थ सांगतात की, ‘चतुर्वणी नामाधिकार। नामी नाही लहान थोर। जडमूढ पैलपार। पावती नामे।। (ओवी 24) सुमारे 400 वर्षांपूर्वी सांगितलेला हा विचार आजही त्यांच्या पुरोगामी विचारांचाच पाठपुरावा करणारा आहे असेच म्हणता येईल! शेवटी समर्थांनी सांगितले आहे की, ‘नामस्मरे निरंतर। ते जाणोन पुण्यशरीर। महादोषांचे गिरिवर। रामनामे नासती।। ‘नाम अखंड स्मरावे। रूप मनी आठवावे’ हेच अध्यात्मतत्त्व सांगून समासाची समाप्ती केली आहे. थोर साक्षात्कारी संत डॉ. रा. द. तथा श्रीगुरुदेव रानडे यांनी आपल्या ‘ध्यानगीता’वरील संकलनात ‘नामे ध्यान’ ध्याने दर्शन’ हाच सिद्धांत सांगितला आहे.




























































