
>>डॉ. विशाखा गारखेडकर
बिनधास्त शैलीचे संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर संगीताच्या चाली चोरल्याचे अनेक आरोप झाले, पण कोणताही प्रतिवाद न करता आपले काम करत राहणाऱ्या बप्पीदांनी अनेकांना आपल्या चालीवर थिरकावले. संगीत डिस्कोमय करणारे बप्पीदा माणूस म्हणून उत्तम होते. केवळ विरंगुळा म्हणून त्यांच्या गाण्याकडे कायम पाहिले गेले. आपल्या चालीवर अनेकांना नाचवणाऱया बप्पीदा यांचे निधन बिनधास्त शैलीतील संगीताला पूर्णविराम देणारे आहे.
नाचावेसे कुणाला वाटत नाही? नाचायचे अंग नसले तरीही थकवा घालवायला एखादा ठेकाही पुरेसा होतो. आपण एकदा तरी नाचून बघावे असे प्रत्येकाला आतून वाटत असते. आताची पिढी बिनधास्त नाचते. समोर कोण आहे याची पर्वा करत नाही, पण 1980च्या दशकातील पिढीला एकांतातही आपल्या ठेक्यावर नाचायला भाग पाडले ते एका अवलियाने. हा अवलिया तसा बेफाम. अंगावर किलोभर सोने घेऊन मिरवणारा, डोळ्यांवर वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे गॉगल्स घालणारा, केस घनदाट नसतानाही लांब केस ठेवणारा, अंगावरचे कपडे चित्रविचित्र डिझाईनचे. बरे, हिंदी पण धड जमत नव्हती. बोलताना त्या हिंदी भाषेवर बंगाली भाषेचा प्रचंड प्रभाव जाणवायचा, पण ऐकताना तो हवाहवासा वाटायचा. या अवलियाचे नाव होते बप्पी लहरी ऊर्फ बप्पीदा!
या माणसाने आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या पिढीला आपल्या ठेक्यावर नाचवले. कुणी बिनधास्त तर कुणी एकटय़ाने नाचले. त्या गाण्याच्या चालीच अशा असायच्या की, न नाचणारी व्यक्तीसुद्धा कंबर हलवायची. नाचले की मनावरील ताण हलका होतो, बरे वाटते. ताण घेणाऱ्या असंख्य लोकांना बंद दाराआड नाचवले ते बप्पीदा यांनी. त्यांनी नृत्याचे सगळे ठोकताळेच तोडून मोडून काढले. त्यांच्या संगीतात काय जादू होती याची कल्पना नाही. कुणी त्यांना चाली चोरणारा संगीतकार म्हटले, कुणी त्यांच्या राहणीमानाची खिल्ली उडवली. मात्र कशाचीही तमा न बाळगता हा माणूस संगीत देत गेला. संगीताची रूढ वहिवाट ते कधी चालले नाहीत. त्यांच्या स्वभावातही ते नव्हते. पश्चिम बंगालच्या असलेल्या बप्पीदा यांना नवनवीन प्रयोग करण्याची सवय असल्याने ते शोध घ्यायचे. त्या शोधातून पाश्चिमात्य संगीत ते ऐकू लागले. त्याला आपल्या हिंदुस्थानातील संगीताची जोड देऊन नवीन फ्यूजन करायचे. कुणी त्याला डिस्को संगीत म्हणायचे, कुणी डिस्को थेक म्हणायचे. बप्पी लहरी यांना टाळून 80 ते 90 च्या दशकातील चित्रपट कोणाला करता आले नाहीत, तेवढा प्रभाव त्यांनी टाकला होता.
प्रत्येक दशकात त्या त्या क्षेत्रात काही व्यक्ती आपला प्रभाव पाडत नवा ट्रेंड निर्माण करत असतात. कुणी त्यांना ट्रेंड सेटर म्हणतात. बप्पीदा यांनी 80 च्या दशकात स्वत:चा डिस्को ट्रेंड सेट केला. त्यांच्या या ट्रेंडला जोड मिळाली ती मिथुन चक्रवर्तींची! मिथुन हा काही अभिनयातील बापमाणूस नव्हता. तरीही तो तेव्हाच्या महाविद्यालयीन तरुणींच्या गळय़ातील ताईत झाला होता. डिस्को डान्सर म्हणून तो तुफान पॉप्युलर होत होता. पडद्यावर तो नाचायचा तेव्हा पिटातला प्रेक्षक त्याच्यावर फिदा होऊन जायचा. मिथुनच्या या नाचात सर्वाधिक हातभार लागला होता तो बप्पीदांच्या संगीताचा.
पाश्चिमात्य संगीताचे बीज बॉलीवूडमध्ये आर. डी. बर्मन यांनी पेरले, पण बप्पीदा यांनी त्याला वेगळा तडका मारून ते गाणे लोकप्रिय केले. मिथुन आणि बप्पीदा ही जोडी हिट ठरली. बप्पीदा केवळ संगीत देऊन थांबले नाहीत तर स्वत: गाऊन त्यांनी ती ही हौस फेडून घेतली. त्यांच्या बंगाली उच्चारातील हिंदी गाणे ऐकताना वेगळा आनंद मिळत होता. मूळ पश्चिम बंगालच्या असलेल्या बप्पीदा यांना संगीताचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला होता. आलोकेश लहरी हे त्यांचे मूळ नाव. हॉलीवूडमधल्या त्यांना आवडणारा गायक गळ्यात सोन्याची साखळी घालायचा म्हणून भविष्यात आपणही सोन्याचे दागिने घालून मिरवू असे त्यांनी ठरवले आणि पैसा हाती आल्यावर रग्गड दागिने घातले. संगीतात आणि जगण्यात त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली.
बप्पीदा यांनी हिंदीसोबत अनेक प्रादेशिक भाषेतील पाच हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले. काही गाणी स्वत: गायली. एका वर्षात 33 चित्रपटांत 180 गाणी रेकॉर्ड करण्याची गिनीज बुकात नोंद केली. यार बीना चैन कहां रे (साहेब), रात बाकी बात बाकी (नमक हलाल), तम्मा तम्मा दोगे तम्मा (थानेदार), पग घुंगरू बांधे मीरा नाचे (नमक हलाल), नैनो मे सपना सपनो में सजना (हिम्मतवाला), याद आ रहा है तेरा प्यार (डिस्को डान्सर), आज रपट जाये तो हमे ना उठईयो (नमक हलाल), दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे (शराबी), जिमी जिमी आजा आजा (डिस्को डान्सर), दिल धक धक करने लगा (बेटा), तुने मारी एन्ट्री दिल में बजने लगी घंटीयाँ (गुंडे), ऊलाला ऊलाला तुहै मेरी फॅन्टसी (डर्टी) यासारखी गाणी ऐकली की, आपोआप नाचायचा मूड होतो. नाचण्यासाठी शास्त्रीय संगीत कामी येत नाही, ते ऐकायला कानसेन असावे लागते. त्याचा अभ्यास असावा लागतो. बप्पीदा यांची गाणी अभ्यासण्यासारखी अथवा कानसेन निर्माण करणारी नव्हती, तर ती केवळ थिरकायला भाग पाडणारी होती. ही गाणी ऐकताना चालीची चोरी केली आहे का याच्याशी पिटातल्यांना काय देणे घेणे? ही गाणी तथाकथित इलाईट क्लाससाठी नव्हतीच तसा दावाही बप्पीदांनी केला नाही. ती होती पिटातल्या क्लाससाठी. बप्पीदा यांनी अगदीच थिल्लर गाणी दिलीत असे नाही. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविद ना कहेना’, ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ हे गाणे ऐकून बघा. मग त्यातील स्वर आणि संगीताची ताकद कळेल. बप्पीदांनी दिलेल्या ओरिजनल संगीताची (शराबी, नमक हलाल आदी) चर्चा मात्र झाली नाही. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच होता. एका चौकटीत बांधून टाकले की, इतर चर्चा आपसूक बाजूला पडतात. म्हणूनच त्या संगीतकारांइतकी प्रतिष्ठा त्यांना मिळाली नाही.
बप्पीदांची सद्दी संपली, म्हातारे झाले असे म्हणणाऱ्यांनाही बप्पीदांनी ‘गुंडे’ अथवा ‘द डर्टी’ पिक्चर चित्रपटातील गाणी देत ‘शेर अभी जिंदा है’ अशी हाळी दिली’. बप्पीदा आपल्या थाटात जगले आणि फार गाजावाजा न करता गेलेदेखील. मात्र आपल्याला आलेला ताण हलका करण्यासाठी मागे सोडलेल्या चाली सोबतीला ठेवून.




























































