>> दुर्गेश आखाडे
आज कोविडमुळे रंगभूमीवर ब्लॅक आऊट आला आहे. काही वर्षांपूर्वी वीज नसताना पेट्रोमॅक्सच्या दिव्यांवर रंगभूमीला झळाळी आणण्याचे काम त्या काळातील कलाकारांनी केले होते. तीच ताकद आजच्या कलाकार आणि कलेत ठासून भरली आहे. त्यामुळे कोविडच्या धोक्याची घंटा दूर होताच पुन्हा एकदा रंगभूमीवर तिसरी घंटा वाजेल. गावात वीज नसताना पेट्रोमेक्सच्या दिव्यांवर ज्यांनी पारावरच्या रंगभूमीला झळाळी आणली त्या प्रकाशझोतातून पारावरच्या एका रंगभूषाकाराला व्यावसायिक रंगभूमीवरचा मार्ग सापडला त्या रत्नागिरीतील पाली गावच्या कृष्णकांत लिंगायत यांची प्रेरणादायी कहाणी.
1965-67 या काळात पेट्रोमॅक्सच्या दिव्यांवरच नाटकाचे प्रयोग रंगायचे. पेट्रोमॅक्सचे दिवे म्हणजे पूर्वी आपल्या गावात लाइट नसताना वापरली जाणारी गॅसबत्ती होय. नाटकाच्या प्रयोगात वापरली जाणारी गॅसबत्ती विशिष्ट प्रकारची असायची की तिच्या दिव्याचा प्रकाशझोत जमिनीच्या दिशेला असायचा. त्या गॅसबत्तीच्या प्रकाशझोतात कलाकारांचे मुखवटे उठावदार करण्याची किमया आपल्या बोटांनी साकारणारे, रंगभूषा करून आपलं पोट भरणारे नाही हे ओळखून हॉटेलात वेटरचे काम मिळते का ते पाहण्यासाठी मुंबई गाठणाऱया रत्नागिरीच्या पाली गावातील कृष्णकांत लिंगायत यांनी त्यांच्या मेकअपच्या कलेनेच रोजगार दिला. पारावरच्या नाटकातून थेट मायानगरीत व्यावसायिक रंगभूमीवर रंगभूषाकार आणि छोटय़ा छोटय़ा भूमिका त्याही नटवर्य प्रभाकर पणशीकर, डॉ. काशीनाथ घाणेकर, रमेश देव यांच्यासारख्या मातब्बर अभिनेत्यांसोबतच्या त्यांनी साकारल्या होत्या. त्या भूमिका लांबीरुंदीने छोटय़ा असल्या तरी कृष्णकांत लिंगायत यांच्यासाठी त्या मोठय़ाचं होत्या. त्याकाळात वीज नसतानाही पेट्रोमॅक्सच्या दिव्यांनी रंगभूमीवरचा ब्लॅकआऊट घालवणाऱया काळातील…पारापासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत…कपडेपटवालापासून रंगभूषाकार असा प्रवास करणाऱया कृष्णा लिंगायत यांच्या आयुष्यात कलेने रंग भरले.
पारावरच्या रंगभूमीला एक इतिहास आहे. या रंगभूमीने केवळ नाटय़रसिकांचे मनोरंजन केले नाही तर कलेची आवड असणाऱयांसाठी ही रंगभूमी एक कार्यशाळा ठरली. तेव्हा रत्नागिरीतील सोहोनी पेंटर म्हणजेच बाळ सोहोनी यांचे सहाय्यक म्हणून कृष्णकांत लिंगायत काम करू लागले. श्रीराम नाटय़मंदिरामध्ये त्यावेळी नाटकांचे प्रयोग व्हायचे. बाळ सोहोनी यांची काही खास माणसं होती जी गॅसबत्तीवर प्रकाशयोजना करायची. त्या गॅसबत्तीवर नाटकाचे प्रयोग रंगायचे. पेट्रोमेक्सच्या त्या बत्तीला पुठ्ठे लावून रंगभूमीवर ब्लॅक ऑऊट केला जायचा. गॅसबत्तीवरची प्रकाशयोजना हीसुद्धा त्या काळात कला होती. प्रयोगाला रसिकांची तुडुंब गर्दी असायची. त्याकाळात कृष्णकांत लिंगायत हे रंगभूषाकाराची जबाबदारी सांभाळत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने कलेला आवर घालावा लागला. पोटापाण्यासाठी मुंबई गाठायची ठरवून त्यांनी मळलेल्या पायवाटेवरून सुरुवात केली असताच त्यांना कलेनेच व्यावसायिक रंगभूमीचा मार्ग दाखवला. पडेल ते काम करायचे या भावनेतूनच त्यांनी सुरुवातीला कपडेपटाची जबाबदारी स्वीकारली. कलाकारांच्या कपडय़ांची इस्त्र्ााr करून देणे हे त्यांचे काम होते. रमेश देव यांच्या एका नाटकात त्यांनी रंगभूषाकार म्हणून जबाबदारी चोख पार पाडलेली. ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी तू माझ्यासोबतही नाटकात रंगभूषाकाराचे काम कर असे सांगितले. त्या दिवसापासून कृष्णकांत लिंगायत नाटय़संपदा संस्थेमध्ये सहभागी झाले. पुढे 30 वर्षे त्यांनी नाटय़संपदामध्ये सेवा केली. मुंबईत राहायला खोली देण्यापासून पुढे लग्नकार्यापर्यंत प्रभाकर पणशीकरांनी कृष्णकांत लिंगायत यांना मदत केली. रंगभूषा करत असताना बदली खेळाडूप्रमाणे त्यांच्या वाटय़ाला छोटय़ामोठय़ा भूमिका आल्या. एखादा कलाकार आला नाही तर ती भूमिका कृष्णकांत लिंगायत करू लागले. ‘कटय़ार काळजात घुसली’मधला सदाशिव, ‘तो मी नव्हेच’मधला वेटर तर कधी पट्टेवाला, ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये डॉ.काशीनाथ घाणेकर यांनी साकारलेल्या लाल्याला पकडायला येणारा गुंड, ‘मला काही सांगायचंय’मधला शिपाई, ‘इथे ओशाळला मृत्यू’मधला सरदार, अभिनेते रमेश देव यांच्या ‘माझा कुणा म्हणू मी’ अशा नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. ष्णमुखानंदमध्ये ‘तो मी नव्हेच’ या नाटकाच्या प्रयोगावेळी कृष्णकांत लिंगायत यांची छोटीशी भूमिका आणि रंगभूषा पाहून आचार्य अत्रे यांनीही त्यांच्या खास शैलीत कृष्णकांत लिंगायत यांचे कौतुक केले होते. तू कपडेपटाची कामे कसली करतोस, तू मेकअपमन म्हणूनच काम कर, असा सल्ला आचार्य अत्र्यांनी कृष्णकांत लिंगायत यांना दिला होता. रंगभूमीवर काम करताना प्रभाकर पणशीकरांची सोबत त्यांनी कधी सोडली नाही. रंगभूषा आणि छोटय़ा छोटय़ा भूमिका करत त्यांनी रंगभूमीवर आपला उदरनिर्वाहाचा, रोजगाराचा मार्ग निवडला. गावातील लोक जेव्हा नाटकाच्या प्रयोगाला येत त्यावेळी कृष्णकांत लिंगायत यांचे गावच्या माणसाने केलेले कौतुक त्यांच्या अंगावर मूठभर मांस वाढवायचे. प्रकृतीच्या कारणामुळे व्यावसायिक रंगभूमीवरून पुन्हा गावी परतल्यावर रत्नागिरीतही त्यांनी नाटय़चळवळ सुरूच ठेवली. काही नाटकांमध्ये रंगभूषाकार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. ‘तुझ्याचसाठी जगतो जीवन’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे.
‘…आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या नावाने मराठी रंगभूमी गाजवली. डॉ. काशीनाथ घाणेकरांसोबत काम करण्याचा कृष्णकांत लिंगायत यांचा अनुभव विलक्षण आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर, डॉ. काशीनाथ घाणेकर आणि रमेश देव यांच्याकडून खूप काही शिकल्यानंतर कृष्णा लिंगायत यांनी पुन्हा गावातील पारावरच्या रंगभूमीला आपला अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. 1981 साली पुन्हा कृष्णा लिंगायत यांनी रत्नागिरीच्या पारावरच्या नाटकात रंगभूषाकार म्हणून काम सुरू केले. तीन नाटकांचे लिखाणही त्यांनी केले असून काही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. वयाच्या 78व्या वर्षीही कृष्णकांत लिंगायत यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.





























































