
>> महेंद्र पाटील
परवा कितीतरी वर्षांनी आपण समोरासमोर आलो…एकाच आभाळाखाली…आणि तू समोर आल्यावर पुन्हा मला आठवण झाली काही जुन्या क्षणांची..जेव्हा अशाच आभाळाखाली तू आणि मी होतो… चांदण्यांनी गर्दी केलेली रात्र होती…आणि आपण मात्र अबोल शांत काही क्षण एकमेकांना पाहण्यात निघून गेले ….कुणीच काही बोलत नव्हतं …मी आकाशाकडे पाहत होतो तेव्हा तू हळूच विचारलं… काय करताय.. मी म्हणालो चांदण्यांशी बोलतोय…त्यावर तू म्हणालीस चांदण्या बोलतात का तुमच्याशी. तेव्हा मी म्हणालो, हो बोलतात..जेव्हा आपलं हक्काचं असं कुणी नसतं ना तेव्हा चांदण्याच बोलतात आपल्याशी…आणि असं बोलता बोलता आपला संवाद सुरू झाला, आपण बोलत गेलो…रात्र पुढे पुढे सरकत गेली…त्या क्षणी वाटलं..कुणीतरी आहे आपल्या मनाशी बोलणारं, आपल्या मनातील गोष्टी समजून घेणारं… मग हळूहळू चांदण्याशी सलगी कमी झाली…आणि आपल्या गप्पा सुरू झाल्या…तसे आपण खूप दूर दूर होतो, कधीतरीच समोर यायचो…त्यामुळे दूर दूर असताना आपण एकाच आकाशातील चांदण्या पाहत एकमेकांशी संवाद साधयचो…आणि समोर आल्यावर आपण एकाच आभाळाच्या परिघात असताना कधी कधी निःशब्द व्हायचो…आपल्या वतीने चांदण्याच बोलायच्या, मग आपल्या मनाशी… काळ पुढे सरकत गेला…गोष्ट पुढे सरकत गेली… एक रात्र अशी आली की त्याच आभाळाच्या परिघात मी असताना तू माझ्यापासून दूर झाली… पुन्हा मी चांदण्याशी बोलू लागलो … माझ्या आभाळात मी तुला शोधायचो नेहमीच….पण तू तुझ्या आभाळात मला कधी शोधलं का ? कधी शोधशील का ? तुझ्याही मनात तीच हुरहूर असेल का ….मी चांदण्याकडे पाहत असताना तू त्याच चांदण्या पाहत असशील का, असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घर करायचे..मी कधीतरी येऊन जायचो नकळत तुझ्या अंगणात, तुला त्याची चाहूलसुद्धा लागत नव्हती आणि लागली असेल कधी तरी मला मात्र जाणवली नव्हती …माझं मन अजून तिथेच तुला शोधत होतं…कधीतरी वाटायचं तू या अंगणात यावीस आणि माझ्यासोबत पुन्हा त्याच आकाशातील त्याच चांदण्या पाहाव्यात…पण तू कधी आलीच नाहीस…आता तुझी, माझी आणि चांदण्याची एकत्र भेट होईल ही आशासुद्धा गेल्या काही वर्षात धूसर होत चालली होती…पण अचानक तू परवा समोर आलीस…तू समोर होतीस…मीही होतो..रात्रसुद्धा होती…आणि त्याच चांदण्यासुद्धा होत्या…पण अंगण मात्र वेगळं होतं….माझ्या वेडय़ा मनात पुन्हा नवे आशेचे अंकुर फुटले आणि आजचा हा क्षण कसा असेल …पुन्हा समोर आल्यावर किती बोलू आणि काय बोलू असे विचार मनात येत असताना तू समोर आलीस आणि तुला पाहिल्यावर जाणवलं सगळं काही जुनं असलं तरी तू तशी नव्हतीस…तू त्या नवीन अंगणात जुनी ओळख विसरलीस….माझी मात्र धांदल उडाली …जुने क्षण शोधता शोधता…..तेही कुठे सापडत नव्हते….निदान त्यांना पाहून तरी तुला जुनी ओळख आठवली असती …मी आभाळाकडे पाहू लागलो आणि त्याच चांदण्या शोधू लागलो तोवर आभाळ भरून आलेलं….त्या ढगांच्या गर्दीत चांदण्या हरवल्या होत्या…आणि माणसांच्या गर्दीत तू हरवली होतीस….मी मात्र एकाकी एकटाच त्या आभाळाकडे पाहत सगळे जुने क्षण आठवून त्यांची गर्दी माझ्याभोवती गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिलो…हळूहळू जाणीव होऊ लागली…ज्या आपण आपलं आभाळ म्हणायचो ते आपलं राहिलं नव्हतं… आता तुझं आभाळ वेगळं आणि माझं आभाळ वेगळं वाटू लागलं होतं मला…तू इतकी दूर गेली होतीस त्या क्षणाला की ….मी विचार केला..आपल्या मनात इतकी वर्षं जपलेलं आभाळ हे माझं नव्हतंच कधी…पण तू जराही जाणीव होऊ दिली नाहीस मला….पण त्या दिवशी त्या परक्या अंगणात, आभाळही परकं वाटू लागलं मला …आणि मी माझ्या मनाचं सांत्वन करून परतीच्या वाटेवर चालू लागलो…आणि मनात एक सत्य कोरून..ती रात्र माझी नव्हतीच … ते क्षितिज माझं नव्हतंच, ते अंगण माझं नव्हतं …ते आभाळ माझं नव्हतंच.































































