लेख – प्रत्येक क्षेत्रात यंत्रमानवाचे वाढते आव्हान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश कोळी

मानवाने जेव्हा यंत्रमानव तयार केला तेव्हा तो विचारी सेवक असेल असा विचार त्यामागे होता; परंतु काही वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली की, यंत्रमानव प्रत्येक क्षेत्रात मानवाला आव्हान देऊ लागला आहे. आगामी काळात यंत्रमानव अनेक क्षेत्रांत मानवाला मागे टाकतील आणि मानवाला बेरोजगार करतील, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नसेल. मानवी जीवनावर प्रभुत्व मिळवीत असलेल्या तंत्रज्ञानाविषयी आपल्याला माहिती असायला हवी.

‘हे आहेत रोबोटिक वकील… डॉक्टर आणि आर्किटेक्ट,’ अशी कुणी कुणाची ओळख करून दिली तर आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱया व्यवसायांचे भवितव्यसुद्धा यंत्रमानव हेच आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मजूर म्हणून यंत्रमानवांचा वापर सुरू झाला तेव्हा ते केवळ हातावरचे पोट असलेल्यांचे, शिक्षण नसणाऱयाचेच काम हिसकावतील असे मानले जात होते. परंतु आजमितीस 2021 मध्ये जगातील मोठमोठय़ा कंपन्यांचे सीईओ, प्रसिद्ध रुग्णालयांचे डॉक्टर आणि मोठमोठे वकीलही धास्तावले आहेत, कारण ते जे काम करतात ते जवळजवळ जसेच्या तसे अत्याधुनिक यंत्रे अर्थात यंत्रमानव करू लागतील अशी धास्ती त्यांना आहे.

अर्थात, एखाद्या रुग्णाला कोणते उपचार द्यायचे आहेत हे अजूनसुद्धा रोबोटिक डॉक्टर ठरवू शकत नाहीत. अशा गोष्टी आजदेखील अनुभवी ‘मानवी डॉक्टर’च ठरवू शकतो; परंतु तज्ञांचा अंदाज असा आहे की, हे यापुढे फार काळ चालणार नाही. काही वर्षांतच वकील, डॉक्टर आणि आर्किटेक्ट जे काम करतात ती सर्व कामे यंत्रमानव करू लागतील. याचे कारण म्हणजे, आजमितीस ज्या पेशांमध्ये तंत्रज्ञानाबरोबर व्यावसायिक विचार करणाऱया मेंदूची गरज असते, अशा पेशांमधील लोकांनाही धोका जाणवू लागला आहे. दुसऱया शब्दांत सांगायचे झाल्यास, त्यांच्याही अस्तित्वावर टांगती तलवार आहेच.

गेल्या वर्षी पत्रकारांच्या एका मोठय़ा समूहाने अशी शंका असलेल्या विविध क्षेत्रांचा धांडोळा घेतला होता. हे सर्व तज्ञ पत्रकार असोसिएटेड प्रेस (एपी) या अमेरिकी वृत्तसंस्थेचे होते. सखोल सर्वेक्षण, बातचित तसेच पुराव्यांच्या आधारे ही मंडळी या निष्कर्षाप्रत आली की, यांत्रिक मेंदूचे अर्थात सुधारित यंत्रमानवाचे आव्हान समोर उभे नाही असे एकही क्षेत्र नाही. एपीच्या पत्रकारांनी जगातील वीस देशांच्या आधारावर अहवाल तयार केला होता. तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या बाबतीत सर्वांत पुढारलेले मानले जाणारे हे वीस देश आहेत. एपीच्या या पत्रकारांनी या देशांमधील तंत्रज्ञानातील तज्ञ, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ आदींशी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्या आधारावर ज्या निष्कर्षाप्रत पोहोचले ते घाबरवून टाकणारे आहेत. त्यांच्या मते, गेल्या चार-पाच वर्षांत ज्या नोकऱया बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत, त्या केवळ कमी कौशल्याची गरज असणाऱया नोकऱया नाहीत. त्यात बऱयापैकी कौशल्याची गरज लागणाऱया नोकऱयाही आहेत. या नोकऱया मिळविणे ही विशेषतः मध्यमवर्गीय लोकांची तीव्र इच्छा असते.

हैराण करणारी बाब अशी की, या सर्व रोजगारांवर यंत्रमानव एका झटक्यात नव्हे तर हळूहळू, सहजतेने कब्जा केला आहे. एखाद्याचा पर्सनल सेक्रेटरी यंत्रमानव असू शकतो अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी आपल्याला करता आली नसती; परंतु पर्सनल सेक्रेटरीचे काम किंवा त्याचे पद केवळ यांत्रिक पद्धतीने नोंदी करणे आणि कामांचा क्रम तयार करणे एवढे असत नाही. तर त्यात विचार, उपक्रमशीलता आणि तत्कालीन बुद्धीचाही समावेश असतो. हे सर्व बदल रातोरात झालेले नाहीत. अर्थतज्ञ आणि भविष्यावर नजर ठेवणारे तज्ञ जाणतात. ही धास्ती अनाठायी नसून, ते वास्तवात एक मोठे आव्हान आणि चिंता आहे.

ऑक्सफर्डमधील विद्वान कार्ल बॅनेटिक फ्रे आणि मायकल ए. ऑसब्रोन यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की, आगामी दहा वर्षांत संगणकाशी संबंधित निम्म्याहून अधिक नोकऱयांवर यंत्रमानव कब्जा करतील. हे खरोखर भयावह चित्र आहे. परंतु याबाबत काही करता येत नाही, कारण ऑटोमेशन म्हणजेच स्वचालन ही परिवर्तनाची अनिवार्य अट आहे. कारखाने, दुकाने, मॉल अशी सर्व ठिकाणे या परिवर्तनासाठी तयार झाली आहेत. जी ठिकाणे अद्याप या बदलासाठी तयार झालेली नाहीत, त्यांना तयार व्हावेच लागेल.

आश्चर्यजनक बाब अशी की, काही वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी अत्यंत कमी ज्ञान आणि कौशल्याची गरज असेल, अशाच ठिकाणी यंत्रमानवाचा धोका जाणवू लागला होता; परंतु आता याउलट असे वाटू लागले आहे की, ज्या कामांमध्ये ज्ञान आणि कौशल्याची कमीत कमी गरज असेल अशीच कामे मानवासाठी उरतील. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी असे मानले जात होते की, वकील किंवा आर्किटेक्ट यांचे काम कोणतेही यंत्र करू शकणार नाही. कारण वकील खटल्याची मांडणी करताना सातत्यपूर्ण विचार करीत असतात आणि पहिल्यापासून जी वाट तयार झालेली आहे, त्या वाटेवरून न जाता आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून नवनवीन वाटा तयार करतात. आपल्या तर्काला सातत्याने नवा आकार ते देत असतात. परंतु आता असे वाटू लागले आहे की, असे पेशे कितीतरी अधिक पटींनी धोक्यात आहेत. कारण यंत्रे अधिक विचार करणारी असल्याचे तर सिद्ध झाले आहेच; शिवाय विचार करण्याचा वेग आणि कल्पनाशक्तीही त्यांना अधिक लाभली आहे. म्हणजेच रोबोटिक वकील केवळ पहिल्यापासून निश्चित केलेल्या प्रश्नांचीच उत्तरे शोधेल असे नव्हे, तर तातडीने समोर येणारे प्रश्न सोडविण्यासदेखील सक्षम असेल आणि मानवाने दिलेल्या उत्तरांपेक्षा त्याची उत्तरे अधिक अचूक असतील. त्याचप्रमाणे हे काम मानवाने केलेल्या कामापेक्षा कितीतरी कमी वेळात होईल.

डॉक्टरांच्या बाबतीतसुद्धा हीच बाब समोर आली आहे. डॉक्टरी पेशासुद्धा अशा प्रकारच्या नव्या आव्हानांचा मुकाबला करीत आहे. रेडियोलॉजिस्ट जे काम करीत असे, ते काम आता त्याला मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण यंत्रमानव अर्थात संगणक हे काम त्याच्यापेक्षा अधिक जलद करून अचूक निष्कर्ष काढू शकतात. एकापेक्षा एक सरस सॉफ्टवेअर तयार झाली आहेत आणि परिस्थितीचे आकलन या सॉफ्टवेअरना मानवापेक्षा अधिक चांगले असते. आजाराचे निदानही यंत्रे मानवापेक्षा अधिक सक्षमतेने करू लागली आहेत. संगणकाने विचारलेले प्रश्न लोकांना अधिक सोपे आणि अधिक समजणारे वाटत आहेत.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)