आला उन्हाळा मेकअप सांभाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट  

उन्हाळ्यात आपली त्वचा अतिरिक्त तेलकट, चिकट व निर्जीव होते. तसेच उष्णतेमुळे त्वचेचा दाहदेखील होतो. अशा वेळेस प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपली त्वचा सुंदर, निरोगी, टवटवीत असावी.

मेकअप करताना लक्षात ठेवायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतू, त्वचेचा पोत आणि चेहऱ्याची ठेवण. कारण ऋतूप्रमाणे मेकअप केला तर तो व्यवस्थित राहतो. उन्हाळ्यात ड्राय मेकअपला प्राधान्य द्यावं.

उन्हाळा म्हटलं की, घाम येणं स्वाभाविकच आहे. उन्हाळय़ात कोणतंही क्रीम वापरण्याची तयारी अनेकांची नसते, पण त्वचेचा पोत जाणून घेऊन योग्य ती क्रीम वापरल्यास कोणताही दुष्परिणाम नक्कीच होत नाही. उलट कोरडी त्वचा असणाऱयांनी नेहमी सनस्क्रीन, मॉश्चरायझर लावणे गरजेचे आहे. नाहीतर चेहऱयावरील पिगमेंटेशनचे मार्क वाढत जाऊन त्वचा खराब दिसते. यालाच बटरफ्लाय मार्क्स म्हणतात. तुमची त्वचा जास्त तेलकट असल्यास उन्हाळ्यात तुम्ही ऑइल फ्री, जेलबेस मॉइश्चरायझर तसेच सनस्क्रीन वापरू शकता.

उन्हाळय़ात पिंपल्स किंवा अँकनेचा त्रास जास्त सहन करावा लागतो. यासाठी चेहरा तीन-चार वेळा धुवा. तसेच बाहेरील वातावरणातून घरी आल्यावर क्लींजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करावा. घरच्या घरी चेहरा साफ करण्यासाठी किंवा चेहऱयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुळशीची पावडर, कपिला, मंजिष्ठा, आंबेहळद यांची पावडर गुलाब पाण्यातून किंवा कोरफडीच्या जेलमध्ये भिजवून चेहऱयावर लावू शकता. तसेच पूर्ण मास्क  सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊ शकता. उन्हाळय़ात ग्रीन टी, काकडीचा रस, कच्चे दूध मिसळलेले बर्फाचे तुकडे चेहऱयावर लावल्यास त्वचेवरील जळजळ कमी होऊन त्वचेला आराम मिळतो व घाम येणंही कमी होतं. तसेच रक्ताभिसरण वाढवून त्वचा सैलही पडत नाही. तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारून मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते. उन्हाळय़ात टोनर म्हणून तुम्ही घरच्या घरी कोरफडीचा रस, काकडीचा रस, गुलाब पाणी हे वापरल्यामुळे त्वचा टवटवीत होते व त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.

उन्हाळय़ात घामाघूम होऊन केलेला मेकअप खराब होतो किंवा केलेल्या मेकअप घामामुळे पसरतो आणि आपली सगळी मेहनत वाया जाते. उन्हाळय़ामध्ये मेकअपच्या काही प्रमुख समस्या आहेत. त्या म्हणजे घामाने चिंब भिजलेला चेहरा, तेलकट झालेले कपाळ, चिपचिपित चिकट झालेली लिपस्टिक किंवा अस्ताव्यस्त पसरलेला मस्कारा किंवा आयलायनर. अशा वेळेस या उन्हाळय़ात मेकअप करणं नकोस होतं. मग मेकअप करू नये असंही वाटतं, पण अनेक ठिकाणी प्रेझेंटेबल दिसण्यासाठी मेकअप ही गरज असू शकते. अशा वेळेस स्वेट फफ मेकअप करावा. यामुळे वातावरणातील आर्द्रता कितीही वाढली तरीही आपला चेहरा नैसर्गिकरीत्या ताजातवाना आणि सुंदर दिसू शकतो.

अशा प्रकारे जर मेकअप करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यात आणि त्याचा योग्य वेळी योग्य वापर केलात, तर तुमचा उन्हाळाही ठंडा ठंडा कूल असेल.

  • उन्हाळ्यात मेकअपसाठी वॉटर बेस्ट आणि जेलबेस उत्पादने वापरली तर मेकअप जास्त टिकतो.
  • उन्हाळ्यात ड्राय मेकअप करावा तसेच जास्त काळ टिकून राहणारा लाँग लास्टिंग मेकअपचा वापर करावा. तसेच वॉटरप्रूफ मेकअप मटेरियलचा वापर केल्यास  तो पसरणार नाही व खराबही होणार नाही.
  • उन्हाळ्यात अगदी ऑफिसला जायचं असेल किंवा घरगुती फंक्शनसाठी जायचं असेल तर तुम्ही प्रायमरचा वापर करा. तसेच मॉइश्चरायझर सनस्क्रीनही महत्त्वाचं असतं. प्रायमरवर तुम्ही बीबी क्रीम किंवा फाऊंडेशन लावल्यास तुमचा मेकअपचा बेस छान पसरला जातो.
  • उन्हाळ्यात फुल कव्हरेज फाऊंडेशन वापरणं जास्त चांगलं. कारण ते अत्यंत लाइट वेट, ऑइल फ्री फाऊंडेशन असतं. तसंच त्यामध्ये विटामिन ई आणि सिलिकॉन असल्यामुळे ते चेहऱयावर एक समान सहज ब्लेंड होतं.
  • त्यातही जर तुम्हाला फाऊंडेशन वापरायचंच असेल तर तुमच्या त्वचेच्या शेडपेक्षा लाइट शेड तुम्ही निवडलेली जास्त चांगली. उन्हाळय़ात आय मेकअप करताना अगदी हलकी लाइट आयशॅडो तुमच्या डोळ्यांकडे लक्ष वेधून घेईल. तसेच पापण्यांना मस्कारा लावताना तो लाइट स्ट्रोकमध्ये लावावा आणि मस्कारा हा शक्यतो वॉटरप्रूफ असावा. तसेच खालच्या पापण्यांना मस्कारा लावणं टाळावं.
  • उन्हाळ्यात त्वचेप्रमाणे ओठांनादेखील संरक्षण आवश्यक असते. त्यामुळे जास्त एसपीएफ असलेला लिप बाम किंवा लिप ग्लॉस जास्त चांगला. त्यामुळे ओठांची त्वचा खराब होणार नाही.
  • ओठांवर लिपस्टिक लावताना मॅट लिपस्टिकचा वापर करावा. ब्लशऑन किंवा रुज वापरताना ते पावडर स्वरूपातील वापरावं. उन्हाळ्यात नॅचरल मेकअप करण्यावर भर द्या.

 [email protected]