मधुमेहींना संजीवनी देणारा लढवय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

आपल्या शारीरिक कमतरतांवर मात करून जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी मधुमेहाविषयी संशोधन केले. दुर्दैवाने हिंदुस्थान हा मधुमेहाची जागतिक राजधानी झाला असून या पार्श्वभूमीवर डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी मधुमेहमुक्त हिंदुस्थान अभियान हाती घेतले आहे. मधुमेहींना नवसंजीवनी देणारा लढवय्या, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्याविषयी…

जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हे काही व्यक्तींचे खरे बळ असते आणि या बळाच्या जोरावर त्या व्यक्ती अनेक असाध्य ध्येयांपर्यंत यशस्वीपणे पोहोचू शकतात. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे जीवनही असेच सकारात्मक ऊर्जेने भरलेले असून आपल्या चैतन्यदायी विचारांना कृतीची जोड देत मधुमेह विषयात ते उत्तुंग कार्य करीत आहेत.

‘संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही’, यावर डॉ. रवींद्र नांदेडकर यांचा दृढविश्वास असून त्याच्याच आधारे त्यांनी जीवनातील विविध संघर्षांवर मात केली आहे. जन्मतःच दोन्ही डोळ्यांमध्ये हाय मायोपियामुळे त्यांना दृष्टिदोषाचा सामना करावा लागला. तसेच लहान वयात हाडाचा टीबी झाल्याचे चुकीचे निदान होऊन त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांमुळे अस्थिव्यंगदेखील निर्माण झाले. आयुर्वेदाच्या उपचारांनी त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली आणि डॉ. नांदेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन आयुर्वेदासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

एखाद्या लढवय्याप्रमाणे आपल्या शारीरिक कमतरतांना सामोरे जात डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी आपले शिक्षण सुरू ठेवत एम.फार्म, पीएच. डी., एम.डी. (ए.एम.), नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्सचा डिप्लोमा, संगीतामध्ये बी.ए., एलएलबी आणि कॉम्प्युटर ऑप्लिकेशनचा डिप्लोमा करून विविध क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या मातोश्री अनुसया आणि वडील यशवंत यांनी त्यांना केलेली सोबत, त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांना दिलेला पाठिंबा खूप मोलाचा ठरला. मधुमेहामुळे वडिलांना उद्भवलेल्या आरोग्यविषयक विविध समस्या त्यांनी अगदी जवळून पाहिल्या. मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जाणिवेतून याच क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्धार डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी केला. आपल्या संपूर्ण जीवनात आईवडिलांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत रहावेत या उद्देशाने डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी अनुयश (अनु-सया आणि यश-वंत) या नावाने आपले मधुमेहाविषयीचे संशोधन आणि आपले जीवन समजाला समर्पित केले आहे.

मधुमेही व्यक्तींच्या कल्याणासाठी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान कार्य करीत असून डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी 2006 मध्ये या संस्थेची स्थापना केली. समाजामध्ये मधुमेहाविषयी जागृती करणे आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मधुमेहासंदर्भात योग्य ती मदत सातत्याने करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे. मधुमेह हा चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा आजार असून दुर्दैवाने हिंदुस्थान हा मधुमेहाची जागतिक राजधानी झाला आहे. मधुमेह ही मानवजातीला भेडसावणारी सगळ्यात गंभीर आरोग्य समस्या आहे. मधुमेहासंदर्भात 27 वर्षांचा दीर्घ संशोधन अनुभव असलेल्या डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हिंदुस्थानात अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे कार्य विस्तारले आहे.

2006 या वर्षापासून जवळपास प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मधुमेहाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येत आहेत. डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी स्वतः घेतलेल्या मोफत मधुमेह तपासणी आणि उपचार शिबिरांची संख्या इतकी झाली आहे की त्यातून एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाले आहे, असे म्हणता येईल. मधुमेहाच्या पूर्वावस्थेतील रुग्ण, मधुमेहाने ग्रासलेले रुग्ण तसेच मधुमेहामुळे आरोग्यविषयक अन्य गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण म्हणजेच मधुमेहाशी संबंधित सगळ्या प्रकारच्या रुग्णांना डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे उपक्रम एक आश्वासक आधार वाटतात. अनुयश आरोग्य प्रतिष्ठानने हाती घेतलेले मधुमेहमुक्त हिंदुस्थान अभियान हे केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कार्यरत नाही, तर मधुमेह नसलेल्या व्यक्तींना मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठीदेखील या अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी आयुर्वेदात केलेले महत्त्वपूर्ण संशोधन केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग समाजासाठी करून देण्याचे ठरवले. त्यासाठीच अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मधुमेहासंदर्भात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी सुरू केलेल्या मधुमेहमुक्त हिंदुस्थान अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून संस्थेतर्फे पहिल्या वर्षी महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये मोफत रक्त शर्करा तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे हे अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या कार्याचे मुख्य केंद्र आहे. पुण्यासह अन्य जिल्ह्यांमधील विविध स्थानिक संस्थांच्या सहकार्याने मधुमेह तपासणी आणि उपचार शिबिरेदेखील नियमितपणे आयोजित केले जातात.

अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे 7 एप्रिल 2017 रोजी मोफत रक्त शर्करा तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाच राज्यांमध्ये 119 केंद्रांच्या माध्यमातून 18 हजार 732 रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करून मागील विश्वविक्रम मोडीत काढला, तर 14 नोव्हेंबर 2017 रोजी म्हणजे जागतिक मधुमेहदिनी 16 राज्यांमध्ये विविध ठिकाणी 200 हून अधिक केंद्रातून 50 हजारांहून अधिक लोकांची मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. आजपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानात राबवल्या गेलेल्या या चेक-अप कॅम्पच्या निमित्ताने डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी स्वतः केलेल्या मार्गदर्शनामुळे मधुमेहाकडे बघण्याचा रुग्णांचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला आहे. मुख्यतः खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवासुविधा पोहोचू न शकलेल्या हिंदुस्थानातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना डॉ. नांदेडकर यांच्या कॅम्पमुळे नवसंजीवनी मिळाली आहे.

[email protected]