उमेद : ‘देणे समाजाचे’ , सामाजिक संस्थांना नवचेतना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ममता क्षेमकल्याणी

मुंबईतील विलेपार्ले येथे नुकतेच ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांना झाली आणि या संस्थांना मुंबईकरांच्या दातृत्वाची प्रचीती आली. कोविडमुळे 19 मुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताणाच्या परिस्थितीत सामाजिक संस्थांना नवचेतना मिळाली. त्याविषयी…

‘सामाजिक प्रश्न’ ही अशी एक व्यापक संकल्पना आहे की, जिच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा समावेश होणे स्वाभाविक आहे. समाज सुधारकांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्न हातात घेऊन त्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्याअनेक व्यक्ती आणि संस्था आहेत. ज्येष्ठ समाजसेवकांच्या कार्याने प्रेरित होऊन ऐन तरुण वयात उत्तम पगाराची नोकरी सोडून सामाजिक संस्था उभी करणारे तरुणदेखील या भूमीत आहेत. बदलत्या काळाबरोबर सामाजिक प्रश्नांचे स्वरूप आणि व्याप्तीदेखील बदलते आहे.

कौटुंबिक हिंसाचार, आरोग्य, शिक्षण, बालसंगोपन, रुग्णसेवा, मानसोपचार क्षेत्रातील प्रश्नांबाबत अनेक लोकांच्या मनात एक प्रकारची आस्था असते आणि अनेकांना अशा सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते, पण नेमकी कोणती संस्था योग्य आहे, कोणती संस्था कुठल्या क्षेत्रात काम करते, तिथे काम करणाऱ्याव्यक्तींचा उद्देश काय आहे, असे असंख्य प्रश्न देणगीदारांच्या मनात येणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. शिवाय सामाजिक काम करणाऱ्यासंस्थांना प्रत्यक्ष भेट देणे कोणत्याच अर्थाने शक्य होत नाही. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘देणे समाजाचे’ हे प्रदर्शन पाहिल्यावर नक्कीच मिळतात.

पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला आणि गेली सतरा वर्षे चालू असलेला ‘देणे समाजाचे’ हा महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना एकाच छताखाली आणणारा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख आर्टिस्ट्री, पुणे प्रस्तुत ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून देणे, त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. 2005 ते 2021 या कालावधीत जवळपास 200 सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि जवळपास साडेआठ कोटीपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळाली आहे. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली 17 वर्षे पुण्यामध्ये व्रतस्थपणे राबवला जातो.

देणगीदार आणि सामाजिक संस्था यांमध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम 2019पासून मुंबईमध्येही आयोजित केला जातो. यंदाच्या या प्रदर्शनात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या 24 सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आले. या सर्व संस्था निवडताना अतिशय काटेकोरपणे निवडल्या जातात, जेणेकरून योग्य अशा संस्थांना मदत मिळेल.

मुंबईतील विलेपार्ले येथे नुकत्याच आयोजित केलेल्या प्रदर्शनात नगर, संभाजीनगर, बीड, डहाणू, वाडा, लातूर, पुणे, बदलापूर, मेळघाट, ठाणे, शिरूर, चिखलगाव (दापोली), अकोला, यवतमाळ, कर्जत (नगर), पंढरपूर, जळगाव अशा विविध ठिकाणच्या सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. सैनिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्याअनाथ युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या, मेळघाटातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱया, विविध प्रकारच्या आजारी व्यक्तींचे स्व-मदत गट असलेल्या, विशेष मुलांना आधार देणाऱया, रुग्णोपयोगी साहित्य मोफत उपलब्ध करून देणाऱ्यासंस्था अशा विविध प्रश्नांवर काम करणाऱ्यासंस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

अनाथ युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणाऱ्याआणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारी व्यक्ती म्हणून घडविणाऱ्यानगर येथील ‘युवान’ संस्थेचे संदीप कुसळकर यांनी सांगितले की, पुण्यानंतर ‘युवान’ संस्थेचे कार्य मुंबईपर्यंत पोहोचविण्यात ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे तळागाळातील अनाथ, ऊसतोडणी मजूर आणि अपंग युवकांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी कार्य करणाऱ्या‘युवान’ या संस्थेच्या कार्यावर विपरीत परिणाम झाला, परंतु नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘देणे समाजाचे’ प्रदर्शनामुळे ‘युवान’ कार्य प्रथमच मुंबईकरांपर्यंत पोहोचले. ‘युवान’ला अनेक स्वयंसेवक मिळाले आणि काहीसा आर्थिक हातभारही या प्रदर्शनामुळे लागला.

महिला आणि लहान मुलांचे प्रश्न, अनाथ मुले, वृद्ध, ग्रामीण विकास, विशेष मुले, आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या मुलांचे प्रश्न, अंध, अपंग, दुष्काळग्रस्त भागाचे प्रश्न, धान्य बँक अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातील संस्था काम करतात आणि त्यांचा परिचय सर्वसामान्य लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून झाला. या प्रत्येक संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या स्टॉलवर सविस्तर माहिती दिली.

मुंबईतील प्रदर्शनात सहभागी झालेल्या बीड येथील इन्फंट इंडिया या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष दत्ता बारगजे यांनी सांगितले की, दरवर्षी सातत्याने आयोजित होत असलेल्या ‘देणे सामाजाचे’ या उपक्रमात आम्ही 5 वर्षे आवर्जून सहभागी होत आहोत. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक वातावरणात तर या उपक्रमाचा आम्हाला खूप आधार वाटला. मुंबईकरांनी आम्हाला केलेली आर्थिक मदत हा सध्याच्या परिस्थितीत मिळालेला मदतीचा मोठा हात आहे. आमची संस्था एचआयव्हीसह जगणाऱ्याअनाथ बालकांचे संगोपन करते आणि इतर अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करते.

समाजात उत्तम काम करणाऱ्याअनेक लोकांशी एकाच वेळी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी असते. हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येते. मात्र या संस्थांना देणगी देणे बंधनकारक नसते. आर्थिक किंवा वस्तू, कपडे, सेवा, विशेष काwशल्य अशी इतर स्वरूपाची मदत करण्यासाठीदेखील लोक या प्रदर्शनामुळे पुढे येतात. त्यामुळे ‘देणे समाजाचे’च्या माध्यमातून सामाजिक संस्थांना खऱ्यानवचेतना मिळाली. ‘समाजाचे’च्या माध्यमातून सामाजिक संस्थांना खऱ्यानवचेतना मिळाली, असे म्हणता येईल. आता येत्या 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे ठाण्यातील हे पहिलेच वर्ष असून ठाणेकरांना सामाजिक संस्थांना मदत करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

[email protected]