सा रम्या नगरी – प्राचीन महाराष्ट्राची राजधानी पैठण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

आजचे पैठण गाव हे जुन्या प्रतिष्ठान नगरीवर स्थापित आहे. त्यामुळे प्राचीन नगरीचे अवशेष सहजासहजी दिसत नाहीत, परंतु प्राचीन काळापासून या ठिकाणी एक वैभवशाली नगर होते याचे भौतिक, लिखित आणि मौखिक पुरावे मुबलक प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्या स्मरणात सातवाहन आणि पैठण यांचा अतूट संबंध जपला आहे. या स्थळाचे माहात्म्य फक्त ऐतिहासिकच नाही, तर आध्यात्मिक आणि धार्मिकसुद्धा आहे. एक अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, विद्येचे माहेरघर, जैनांचे अतिशय क्षेत्र अशी या स्थानाची प्रसिद्धी आहे.

महाराष्ट्रातील आद्य राजघराणे सातवाहन यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले पैठण हे शहर आज संभाजीनगर जिह्यातील गोदावरी नदीच्या काठी एका तीव्र वळणावर वसलेले आहे. ते संभाजीनगर शहरापासून 60 किमी दक्षिणेला आहे. आजचे पैठण गाव हे जुन्या प्रतिष्ठान नगरीवर स्थापित आहे. त्यामुळे प्राचीन नगरीचे अवशेष सहजासहजी दिसत नाहीत, परंतु प्राचीन काळापासून या ठिकाणी एक वैभवशाली नगर होते याचे भौतिक, लिखित आणि मौखिक पुरावे मुबलक प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्या स्मरणात सातवाहन आणि पैठण यांचा अतूट संबंध जपला आहे. या स्थळाचे माहात्म्य फक्त ऐतिहासिकच नाही, तर आध्यात्मिक आणि धार्मिकसुद्धा आहे. एक अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, विद्येचे माहेरघर, जैनांचे अतिशय क्षेत्र अशी या स्थानाची प्रसिद्धी आहे. ज्ञानेश्वर, चक्रधर, एकनाथ अशा थोर व्यक्तींच्या सहवासाने ही नगरी पावन झाली आहे. पैठणीचे जनक असलेले हे नगर आजही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगीन माणसाच्या अस्तित्वापासून या परिसरात मानव वस्ती करून होता असे येथील सर्वेक्षण तसेच उत्खनन सूचित करतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात तसेच 1937, 1965, 1996 आणि 1999 या काळात केलेल्या सर्वेक्षणात आणि उत्खननात अश्मयुग, ताम्रपाषाणयुग, आद्य ऐतिहासिक काळ आणि मध्ययुग या विविध काळातील मानवाच्या वस्तीचे अवशेष पैठण परिसरात आढळून आलेले आहेत. ‘पालथी नगरी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भागात तसेच सोन टेकडी या परिसरात ही उत्खनने झाली. याबरोबरच हत्ती आणि बैल यांची अश्मीभूत हाडे या परिसरातून प्राप्त झाली आहेत. ताम्रपाषाणयुगीन वस्तीचे पुरावे इथे सापडल्यामुळे नाशिक, जोर्वे, इनामगाव, नेवासा, आपेगाव या ठिकाणी असलेल्या आद्य शेतकरी वसाहतींसारखी वसाहत इथे इ.स. पूर्व 1700-1600 या काळात म्हणजे आजपासून जवळजवळ 3600 वर्षांपूर्वी होती. त्यानंतर या परिसराचा सर्वात समृद्ध कालखंड सुरू झाला तो म्हणजे आद्य ऐतिहासिक काळात. साधारण इ.स.पूर्व 7व्या शतकापासून येथील वसाहतीचे स्पष्ट पुरावे दिसू लागतात. त्यानंतर सम्राट अशोकाच्या लेखात ‘पेतेनिक’ या नावाने या भागाचा उल्लेख आढळतो. मूलक या जनपदाची राजधानी म्हणूनही पैठण प्रसिद्ध होते, पण इथल्या वैभवाचे खऱया अर्थाने जनक होते ते म्हणजे सातवाहन राजे.

सातवाहन किंवा शालिवाहन नावाने प्रसिद्ध असलेले हे महाराष्ट्रातील राजघराणे एकेकाळी हिंदुस्थानचा पश्चिम ते पूर्व किनारा या संपूर्ण प्रदेशात राज्य करत होते. ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ म्हणजे ज्यांचे घोडे तीनही समुद्राचे पाणी पितात, म्हणजे ज्यांचे साम्राज्य तीनही समुद्रांना स्पर्श करते एवढे मोठे होते, असा त्यांचा नाशिक येथील लेखात उल्लेख आला आहे. काही विद्वानांच्या मते जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर नहपान या शक राजाने केलेल्या पराभवामुळे सातवाहन राजांनी आपले राज्य पूर्व दिशेकडे वाढवले आणि आंध्र प्रदेश त्यांच्या साम्राज्यात आणला. त्या वेळेस त्यांची राजधानी पैठण बनली असावी. प्राचीन काळापासून दक्षिणापथामधून मध्य आणि उत्तर हिंदुस्थानात जाणाऱया व्यापारी मार्गावरचे पैठण हे प्रमुख केंद्र होते. सातवाहन काळात हा व्यापार अजूनच भरभराटीला आला. ‘पेरिप्लस ऑफ द इरिथ्रीयन सी’, टोलेमीचे ‘जिओग्राफी’ अशा इ.स.च्या 1ल्या – 2ऱया शतकातील ग्रीक ग्रंथांमधून पैठणचे उल्लेख पाहायला मिळतात. ‘पेरिप्लस’मध्ये असा उल्लेख आहे की, पैठण येथे व्यापारी मालाची देवाणघेवाण करतात आणि तिथून माल भडोचला रवाना होतो. पैठणपासून भडोचला सुमारे 20 दिवसांत पोचता येते. भडोच हे बंदर इ.स. च्या पहिल्या शतकातसुद्धा एक अतिशय महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी पेंद्र होते. तेथून युरोपशी समुद्री मार्गाने मोठय़ा प्रमाणात व्यापार चालत असे. व्यापारासाठी लागणारा माल हिंदुस्थानातील इतर शहरांमधून येत असे, ज्यामध्ये पैठण हे एक अतिशय महत्त्वाचे पेंद्र होते. म्हणूनच ‘पेरिप्लस ऑफ द इरिथ्रीयन सी’ या ग्रंथात त्याचा आवर्जून उल्लेख आहे आणि त्याचे भडोचपासून अंतर दिले आहे. टोलेमी त्याच्या ग्रंथात असे सांगतो की, पैठण हे सातवाहन राजा पुळुमावी याचे राजधानीचे शहर होते. हा राजा वासिष्टीपुत्र पुळुमावी असावा असा अंदाज केलेला आहे. या राजाने त्याच्या काळातील सागरी व्यापाराचे निदर्शक असे जहाजाचे चित्र असलेले नाणे पाडले होते.

इ.स.पूर्व दुसऱया – 1ल्या शतकातील पैठणच्या श्रीमंत लोकांनी संभाजीनगरजवळील पितळखोरा या ठिकाणी असलेल्या लेणीसमूहात दाने दिली होती असे तेथील शिलालेख सांगतात. पैठणच्या गंधिक पुलातील मित्रदेव, राजवैद्य वत्सिपुत्र मगील, त्याची मुलगी दत्ता, मुलगा दत्तक आणि इतर काही लोक यांनी इथे विविध प्रकारची दाने दिल्याचे शिलालेख आढळतात. यातील बरेचसे लेख हे विहाराच्या खोल्यांच्या दानांचे आहेत. सातवाहनांच्या नंतर चालुक्य, राष्ट्रपूट आणि यादव राजांच्या काळातही पैठण हे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र होते हे त्यांच्या ताम्रपट आणि शिलालेखांतून स्पष्ट होते. यादव काळातील लेखांमधून पैठण येथे असलेल्या अनेक मंदिरांचे उल्लेख आले आहेत.

सातवाहन काळात या नगराने ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेतला होता, त्यामध्ये इतर अनेक शहरांचा समावेश होता. येथून व्यापारी माल घेऊन उज्जैन आणि तसेच पुढे जाऊन उत्तरेतील इतर नगरात देत असत. काही व्यापारी पश्चिम किनाऱयावरील बंदरांमध्ये हा माल नेत असत. कल्याण, सोपारा, चौल, भडोच या बंदरांमधून हा माल युरोपातील देशांमध्ये जात असे. यामध्ये तलम वस्त्र्ाs, गोमेद आणि इतर रत्नांपासून बनवलेली विविध प्रकारची आभूषणे, हस्तिदंती वस्तू, काळी मिरी आणि मसाल्याचे इतर पदार्थ, सुगंधी द्रव्ये, काचेच्या वस्तू, प्राणी, पक्षी इ. गोष्टी होत्या. ज्या गोष्टी परदेशातून आयात होत होत्या त्यामध्ये मुख्यतः तांबे, जास्त इ. धातूंची भांडी आणि उंची मद्य यांचा समावेश होता. हे मद्य ज्या भांडय़ातून येत असे त्याला अम्पह्रा असे म्हणत. पैठणमध्ये रोममधून आलेल्या अनेक वस्तू उत्खननात तसेच सर्वेक्षणात सापडल्या आहेत. श्री. बाळासाहेब पाटील हे पैठणमधले रहिवासी अशा प्रकारच्या अनेक वस्तू गोळा करत असत. त्यांच्या संग्रहात रोमन पद्धतीच्या बाहुल्या, मण्यांचे विविध प्रकार, रोमन सोन्याची आणि चांदीची नाणी, हस्तिदंती बांगडय़ा, मातीच्या अनेक प्रकारच्या वस्तू, ताम्रपाषाणयुगीन खापरे आणि मौर्यकालीन उत्तर हिंदुस्थानात सापडणारी काळ्या रंगाची झिलईयुक्त खापरे, पाय असलेले पाटे-वरवंटे इ. आणि अशा असंख्य वस्तू आहेत. या सर्वांवरून पैठणच्या समृद्ध काळातील लोकांचे भौतिक जीवन कसे होते याची कल्पना येते.

पैठण हे पुढे जाऊन फार मोठे प्रशासकीय केंद्रही बनलेले आपल्याला आढळते. या नगराची कहाणी अजून संपलेली नाही. पुढच्या भागात पैठणची इतर वैशिष्टय़े पाहू.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत.)
– [email protected]