विद्यापीठ कसे निवडावे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> मंजुषा कुलकर्णी-खेडकर
विद्यापीठ निवडताना आपल्या मित्राने किंवा एखाद्या नातेवाईकाने कुठे अर्ज केला आहे यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती याचा नीट आढावा घेऊनच विद्यापीठ निवडावे. त्यामुळे व्यवस्थित विद्यापीठ निवडले जाऊन पुढचा होणारा नाहक मनस्ताप आणि त्रास वाचू शकेल. आजच्या भागात आपण विद्यापीठ कसे निवडावे हे पाहूया. विद्यापीठ निवडताना या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची मदत घेतलेली उत्तम, पण नेमके कुठले मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत आणि कशाला किती महत्त्व द्यायचे हे या लेखात पाहूया.
टय़ुशन फी – अमेरिकेतील विद्यापीठे पब्लिक आणि खासगी अशा दोन प्रकारांमध्ये विभागलेली आहेत. पब्लिक विद्यापीठांची फी कमी तर खासगी विद्यापीठांची फी जास्त असते. विद्यापीठ निवडण्यापूर्वी तिथे फी किती आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या वेबसाईटवर याची माहिती दिलेली असते. फी जास्त म्हणजे विद्यापीठ चांगले हा चुकीचा गैरसमज आहे. आपल्या बजेटनुसार विद्यापीठ निवडले पाहिजे. स्वस्त आहे म्हणून कुठलेही विद्यापीठ न निवडता विद्यापीठाचा दर्जा आणि कमीत कमी फी यांचा योग्य तो मेळ घातला गेला पाहिजे.
संशोधनाचा दर्जा – अर्ज करताना त्या विद्यापीठात कुठले संशोधन सुरू आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. विद्यापीठात प्रत्येक विभागाच्या वेबसाईटवर याबद्दलची माहिती असते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्या विभागाला ई-मेल करून माहिती घेता येते. तिथले प्राध्यापक कुठले संशोधन करत आहेत, त्या त्या विभागात संशोधनावर किती खर्च केला जातो हे पाहूनच त्या विद्यापीठात अर्ज करणे महत्त्वाचे आहे. जितका खर्च संशोधनावर जास्त तेवढे विद्यापीठ चांगले आहे असे ढोबळमानाने ठरवायला हरकत नाही.
प्राध्यापकांचा दर्जा – आपल्याला कोण शिकवणार आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्राध्यापकाचे संपूर्ण प्रोफाईल विद्यापीठाने दिलेली असते. त्यांनी कुठले संशोधन केले आहे किंवा करत आहेत हेदेखील दिलेले असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये किती रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेले आहेत हेदेखील नमूद केलेले असते. या सर्वांचा नीट अभ्यास करायला हवा.
रँकिंग – कुठलाही विद्यार्थी विद्यापीठाला अर्ज करताना ‘रँकिंग’ हा एकच निकष लावतो. स्वतःच्या गरजा काय आहेत हे आधी जाणून घ्यायला हवे, त्यात हे विद्यापीठ बसते का याचा आधी सारासार विचार करूनच विद्यापीठ निवडायला हवे. रँकिंग ठरवताना बरेचसे निकष ठरलेले असतात. त्या सर्वांचा विचार करून विद्यापीठाचे रँकिंग ठरवले जाते. ते सर्व निकष आपल्याला विद्यापीठ निवडताना लागू होत आहेत का याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. रँकिंगला अवास्तव महत्त्व न देता आपल्या गरजेनुसार अर्ज करावेत. बरेचसे रँकिंग इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यापैकी यूएस न्यूज रँकिंग विश्वासार्ह मानायला हरकत नाही.
प्रवेशासाठी असलेल्या अटी (Admission Requirements) – या अटी जाणून घेतल्या की, आपला जीआई स्कोअर आणि इतर गोष्टींसह आपण पात्र आहोत की नाही हे कळू शकते. विद्यापीठांनी गेल्या वर्षी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आणि अन्य माहिती वेबसाईटवर दिलेली असते. शिवाय तिथे शिकणाऱया विद्यार्थ्यांकडूनही माहिती मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे फक्त टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षेवर प्रवेश देणारी विद्यापीठे शक्यतोवर टाळावीत. यातली जास्तीत जास्त विद्यापीठे ही दर्जाहीन असतात. विशेषतः एमएस (कुठलाही इंजिनीअरिंग विषय) किंवा एमबीए पदवी देणारी.
विद्यापीठाकडून स्वीकृतीची टक्केवारी (Acceptance Rate) – किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा याबाबतीत प्रत्येक विद्यापीठाची पॉलिसी ठरलेली असते. थोडक्यात 100 अर्जांमागे किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा हे विद्यापीठ ठरवते. जिथे हा रेट जास्त असतो तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थात त्या विद्यापीठाच्या असलेल्या अटींची पूर्तता केल्यावर.
हवामान – अमेरिकेतील हवामान हे प्रत्येक राज्यानुसार बदलते. विद्यापीठ ठरवताना हवामान हा खूप महत्त्वाचा घटक नसला तरी जर थंड वातावरण मानवत नसेल तर तिथे न गेलेले उत्तम.
लोकेशन – विद्यापीठ कुठल्या भागात आहे हे बघणे आवश्यक असले तरी केवळ यावरूनच विद्यापीठाची निवड करू नये. विद्यापीठ काय गुणवत्तेचे आहे हे विद्यापीठ कुठे वसलेले आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकेशन पाहणे गरजेचे असले तरी त्यावरून विद्यापीठाची निवड करण्यापेक्षा बाकी वर सांगितलेले काही घटकसुद्धा आहेत की नाही हे पाहिले पाहिजे.
थोडक्यात, विद्यापीठ निवडताना आपल्या मित्राने किंवा एखाद्या नातेवाईकाने कुठे अर्ज केला आहे यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती याचा नीट आढावा घेऊनच विद्यापीठ निवडावे. त्यामुळे व्यवस्थित विद्यापीठ निवडले जाऊन पुढचा होणारा नाहक मनःस्ताप आणि त्रास वाचू शकेल.