सुंदर मी होणार : जाड भुवयांसाठी मायक्रोब्लेडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मृणाल घनकुटे

सुंदर आणि जाड भुवया चेहऱयाचे सौंदर्य वाढवतात. साधारणपणे, बहुतेक महिला त्यांच्या भुवया सेट करण्यासाठी दर महिन्याला पार्लर किंवा ब्युटी सलूनमध्ये जातात. भुवयांचा आकार बदलून त्यांना पातळ किंवा जाड करण्यासाठी थ्रेडिंग केले जाते. यादरम्यान खूप वेदना होतात. या गोष्टीपासून कायमची सुटका करू शकता.

जर तुमच्या भुवया पातळ आणि विरळ असतील तर तुम्ही मायक्रोब्लेडिंगच्या प्रक्रियेसह त्यांना नीट आकार देऊन काळे, दाट करू शकता. मायक्रोब्लेडिंग उपचार हे भुवया सेट करण्याशी संबंधित उपचार पद्धती आहे ज्यामध्ये त्वचेखाली नैसर्गिक केस निर्माण केले जातात व तुमच्या भुवया इच्छित आकारात सेट करू शकता.

थ्रेडिंगपेक्षा कमी वेदनादायक आहे हे त्याचे वैशिष्टय़ आहे, मात्र तुम्हाला काही खबरदारी नक्कीच घ्यावी लागेल. या थेरपीचा वापर प्रभावीपणे कसा करायचा याबद्दल मुलुंड येथील यवाना एस्थेटिक क्लिनिकच्या तज्ञ डॉ. माधुरी अगरवाल यांनी माहिती दिली.

नेमकी उपचार पद्धती काय?

मायक्रोब्लेडिंग हे भुवयांना आकार देण्याचे एक तंत्र आहे. या पद्धतीत पेनसारखे उपकरण वापरले जाते ज्यामध्ये निब ब्लेड असते व लहान सुया बसवल्या जातात. या सुयांच्या त्वचेच्या पृष्ठभागावर व्रॅच करते आणि भुवयाभोवतीच्या एपिडर्मिसच्या थराला चांगला आकार देते. विशेष म्हणजे ही उपचार पद्धती अतिशय टिकाऊ आहे.

प्रभाव किती काळ टिकतो?
मायक्रोब्लेडिंगची क्षमता जीवनशैलीवर आणि त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. साधारणपणे, 1 ते 3 वर्षांपर्यंत भुवयांमध्ये टचअपची आवश्यकता नसते, पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला 1 वर्षानंतर भुवया परत सेट कराव्या लागतील. सामान्य त्वचा असलेल्या महिलांच्या भुवयांवर मायक्रोब्लेडिंग 18 महिन्यांपर्यंत टिकू शकतो.

किती सुरक्षित आहे?

मायक्रोब्लेडिंग हा एक सुरक्षित आणि सोपा उपचार आहे, ज्यासाठी खूप कमी वेळ लागतो. प्रथम भुवयांचा हलका मसाज केला जातो आणि नंतर उपचार सुरू होतात. यादरम्यान, तुम्हाला ब्लेडचा आवाज नक्कीच ऐकू येईल, पण जास्त वेदना जाणवणार नाहीत. भुवयांचा आकार बदलण्यासाठी मायक्रोब्लेडिंग हा एक चांगला पर्याय आहे. हे खूप लोकप्रिय आहे आणि महिलांची पहिली पसंती आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

– मायक्रोब्लेडिंग करण्यापूर्वी आठवडाभर सूर्यप्रकाशात जाणे टाळा. – हे उपचार घेण्यापूर्वी आठवडाभर थ्रेडिंग किंवा मेण लावू नका. – सुमारे एक महिना अगोदर रेटिनॉल किंवा व्हिटॅमिन ए असलेली उत्पादने वापरणे थांबवा. फेशियल करणं टाळा. – हे उपचार करण्यापूर्वी 24 तासांच्या आत ऑस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन घेऊ नका. – मायक्रोब्लेडिंग घेण्यापूर्वी भुवया रंगवू नका. – हे उपचार घेतल्यानंतर 48 तास धूम्रपान करू नका किंवा मद्यपान करू नका.