दिल्ली डायरी – ‘संतोष’विरोधात असंतोष आणि भाजपचा पाडाव!

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव दारुण आहे. त्यामागील अनेक कारणांपैकी एक लिंगायत ही हक्काची व्होट बँक भाजपने गमावली आहे. अर्थात त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते येडियुरप्पा यांच्यातील अंतर्गत संघर्षाकडे बोट दाखविले जात आहे. संतोष यांच्याविरुद्ध उफाळून आलेला ‘असंतोष’ हे भाजपच्या पराभवाचे एक मोठे कारण ठरले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसी विजयाचे व भाजपच्या पराभवाचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले जात आहे. त्यात मतांचे ध्रुवीकरण हा महत्त्वाचा मुद्दा. पंतप्रधानांनी या निवडणुकीत थेट बजरंगबली हनुमानालाच प्रचाराचा मुद्दा बनविल्याने त्याचा आपसूक फायदा काँगेसला झाला. कॉंग्रेस की धर्मनिरपेक्ष जनता दल? अशा संभ्रमात काठावर असलेल्या मुस्लिम मतदारांनी कॉंग्रेसला काwल दिला. इतकेच नाही तर हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाच्या नादात भाजपने आपली हक्काची लिंगायत व्होट बॅंकही गमावली. काँग्रेस लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीही करणार नाही, हे माहीत असूनही लिंगायत समाजाने कॉंग्रेसला भरभरून मतदान केले. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे सर्वात मोठे नेते येडियुरप्पा व भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यातील संघर्ष. भाजपमध्ये संघटन सरचिटणीस हे पद अध्यक्षांपेक्षाही अधिक ‘पॉवरफूल’ असते. त्यात संतोष हे मोदींचे ‘येस मॅन’. संतोष यांच्या नथीतून मोदींनी येडियुरप्पांच्या नेतृत्वाचा पोपट मारला खरा. मात्र त्यातून कर्नाटकसारखे महत्त्वाचे राज्य गमवावे लागले.

कर्नाटकातून येडियुरप्पांचे उच्चाटन करून नवे नेतृत्व तयार करायचे हा मनसुबा डोक्यात ठेवूनच भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी पावले उचलली. त्यांनी आपले ब्लू आईड् बॉय तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांना प्रमोट करण्याखेरीज कर्नाटकात विशेष काम केले नाही. येडियुरप्पांना पर्याय म्हणून बसवराज बोम्मई यांच्यासारखे डमी लिंगायत नेतृत्वाला तयार करण्यात आले. बोम्मई मुख्यमंत्री व नेता म्हणून अगदीच कुचकामी ठरले. त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागली. शिवाय बोम्मईबरोबरच नलीन कातील नावाच्या भाजप प्रदेशाध्यक्षाने उरलीसुरली कसर भरून काढली. कर्नाटकात भाजप तेथील सरकारच्या कामगिरीवर जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. केंद्रीय सरकारकडेही ‘मन की बात’शिवाय सांगण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरणाची चाल रचण्यात आली. भाजपचा हा डाव ओळखून काँग्रेस नेते परमेश्वरा यांनी चलाखीने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात करून एका फटक्यात मुस्लिम मते काँग्रेसकडे वळविण्यात यश मिळवले. पंतप्रधानांनी विकासकामांऐवजी प्रत्येक प्रचार सभेत ‘बजरंगबली की जय’चाच नारा दिला. मात्र बजरंगबली काँग्रेसला ‘प्रसन्न’ झाले! आसामबरोबरच त्रिपुरात योग्य वेळी नेतृत्वबदल केल्यामुळे बी. एल. संतोष यांची कार्यपद्धती वाखाणली गेली होती. मात्र कर्नाटकच्या पराभवाने संतोष यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची इभ्रत धुळीस मिळाली आहे. नड्डा यांच्या सध्याच्या टीमसोबतच भाजप लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने तूर्तास तरी संतोष यांच्या खुर्चीला धोका नसला तरी संतोष यांच्याविरुद्धचा असंतोष कानडी मतदारांनी दाखवून दिला आहे.

खरगेंचे बल्ले बल्ले!
अवघे ऐंशी वयोमान असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटक या स्वतःच्या राज्यात कॉंग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. खरगेंसोबतच्या तीन सदस्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. राज्यसभा सदस्य सय्यद नासीर हुसेन, गुरुदीप सप्पल व प्रणब झा या तीन विश्वासू सहकाऱयांकडे तेथील जबाबदारी होती. स्वतःची प्रतिमा ‘कन्नड धरतीपुत्र’ अशी करून खरगे यांनी ‘पंतप्रधान मोदींना आव्हान देणारा आपल्या राज्यातला नेता’ अशी प्रतिमा जनमानसांत निर्माण केली. त्याचाही फायदा कॉंग्रेसला झाला. परमेश्वरा यांना सांगून बजरंग दलाचा मुद्दा खरगेंनी रेटून पुढे नेला. त्याचा मुस्लिम व्होट बॅंक कॉंग्रेसकडे वळण्यात मोठा हातभार लागला. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांचे खासदार म्हणून झालेले निलंबन वगैरे असले भावनिक मुद्दे खरगेंनी जाणीवपूर्वक पुढे येऊ दिले नाहीत. खरगेंच्या कानडी भाषणांचे हिंदी व इंग्रजीत अनुवाद करून शहरी भागातही त्याचा जोरदार प्रचार प्रसार करण्यात आला. या सगळ्यामुळे मल्लिकार्जुन खरगे हे केवळ डमी अध्यक्ष नाहीत, ते पॉवरफूल अध्यक्ष आहेत, हा मेसेज संपूर्ण काँग्रेसमध्ये गेला आहे. हिमाचल जिंकल्यानंतर कर्नाटकचा विजय हा खरगेंचे दिल्लीतील राजकीय वजन वाढविणार आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यात आता खरगेंची महत्त्वाची भूमिका असणार आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेले मागासवर्गीय समाजाचे खरगे हे विरोधकांचे यापुढचे महत्त्वाचे नेते असतील हे निसंशय.

‘बिचारे शिवकुमार
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदीपदासाठी सिद्धरामय्या यांच्यावरच काँग्रेस हायकमांडने भरवसा ठेवल्याने मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिवकुमार यांचा भ्रमनिरास झाला आहे. ‘मॅनेजमेंट गुरू’ अशी शिवकुमार यांची ओळख आहे. गुजरातमध्ये अमित शहा यांनी अत्यंत प्रतिष्ठsच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांना निसटत्या मताने का होईना, विजयी करून अमितभाईंना धोबीपछाड देणारे हेच ते शिवकुमार! त्यामुळे कर्नाटकात बहुमताने सरकार आल्यानंतर तुलनेने तरुण असलेल्या शिवकुमार यांना संधी मिळेल असे वाटत असतानाच अमित शहा यांनी जुना हिशेब चुकता करण्यासाठी शिवकुमार यांच्याशी कायमच पंगा असलेले कर्नाटकातले वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीणकुमार सूद यांची सीबीआय संचालकपदी नेमणूक केली आणि शिवकुमार तसेच काँगेसची काsंडी केली. ईडीसह अनेक तपास यंत्रणा अगोदरच शिवकुमार यांची चौकशी करत आहेत. त्यांच्यावरचे खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सहा महिन्यांतच मुख्यमंत्री बदलण्याची किंवा त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होण्याचीही नामुष्की होती. ही नामुष्की टाळत शिवकुमार यांना दादापुता करत सध्या तरी कॉंग्रेसने बाजी पलटवली आहे. सूद यांच्याकडे कर्नाटकातील अनेक रहस्ये आहेत असे म्हटले जाते. पुढेमागे दिल्लीच्या पोतडीतून ती बाहेर काढली जातीलच. या सगळ्या झमेल्यात बिचारे शिवकुमार हे मुख्यमंत्री होता होता राहिले!