
>> प्रज्ञा सदावर्ते
आपले भावविश्व आणि जाणिवांना मांडणारी अस्सल कविता कधीही बांध असल्यागत वागत नाही. ती खळाळत वाहणारी नदी असते, कधी कोसळणारा धबधबा, कधी शांत संयमी डोह होऊन तर कधी थेट उधाणलेला सागर होऊन भेटते. म्हणूनच ती वेगळी, तरीही आपली जवळची होऊन जाते. सरल तरल भावभावनांचा कप्पा उघडावा अगदी तशाच नाशिक येथील पत्रकार, कवी, गीतकार प्रशांत भरवीरकर यांच्या पहिल्या ‘वर्तमानाच्या लिपीत’ या काव्यसंग्रहातील कविता आहेत. हा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने वाचकांसमोर आणला आहे. वास्तवाशी झगडणं, भावविश्वाचं मोहोळ, जगातून हरवत चाललेलं माणूसपण आणि त्यातून येणारी अस्वस्थता असं पानापानांत भेटत जातं.
हा संग्रह वर्तमानाच्या लिपीत, पावसाची भिजकी गोष्ट, कृष्णबाधा आणि हिरवळीचा अलवार मुलुख या चार विभागांत विभागलेला आहे. त्याला प्रस्तावना डॉ. राहुल पाटील यांची असून, संग्रहाविषयी वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे काwतुकाचे शब्दही यात आहेत.
आजीने दिलेला झोका
आभाळापर्यंत जायचा
मग आभाळातला चंद्र हेवा करत झोक्याकडे पाहायचा
या पहिल्याच ‘झोका’ कवितेतून भावनेचे आभाळ भेटून जाते. लेकीसाठी दीड खणाच्या घरात झोका बांधता येत नाही हे वडिलांचे दुःख कळते. दुसऱया ‘आई’ कवितेत ‘कान्हा जवळचा की आई, असं भांडण रोज चालतं मनात’ हे सांगताना आठवणींच्या झरोक्यातून प्रसंग आठवता आठवता आईची सरशी होते. ‘उद्या कुणी पाहिलाय रे, आज मस्त जगून घेऊ’ हा आशावाद भैरवी कवितेतून साद घालतो. सगळं काही कळत असतानाही केवळ उदासीमुळे जगण्याचा गेलेला तोल सावरायची भाषा या कवितेतून उमगते.
वर्तमानाच्या लिपीत विभागातील कविता वास्तवाचे भान देतात. यात स्वतःला शोधण्याचा प्रवास, स्वतःची प्रतिमाही आहे. ‘वेगळा’ या कवितेत ‘वेगळ्या सळसळत्या कानांचा, अबोल शांत पानांचा’ ही रूपपं जास्त बोलकी होऊन वेगळेपण अधोरेखित करतात. ‘आता पानगळ वाढते आहे, कवेत घ्या सारी हिर्वी बोली’ असं सांगताना पानगळ आणि त्यापलीकडे असलेल्या आयुष्याची जाणीव होते. हे कोण आहेत ही कविता हरवलेली माणुसकी, अशांततेनं घेरलेलं गावकुस, काहींच्या हव्यासाच्या आगीत होरपळलेल्या वस्त्या दाखवते. तेव्हाची हसती-खेळती घरं शोधायला, विचार करायला भाग पाडते. काय काय हरवलंय याची प्रखरता अंगावर येते.
‘पावसाची भिजकी गोष्ट’मधला पाऊस वेगळा आहे. वास्तवातला, वर्तमानाला भूतकाळाशी जोडत मनात कायम निथळणारा आहे. अनेक वर्षे अनेक घटनांमधून मनात झिरपून कागदावर उतरल्यासारखा तो भासतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातला त्याच्याशी असलेला संवाद जाणवतो. म्हणूनच ‘काचेच्या आतही पाऊस ऐकू येतो रे, फक्त कान हवा ऐकणारा’ ही कविता दाद घेऊन जाते.
‘कृष्णबाधा’मधून कृष्णाची वेगवेगळी मनात घर केलेली रूपे भेटतात. तो पूर्णपुरुष आहे अगदी आपल्यातलाच एक हे मनोमन पटते. कृष्ण-राधेवरची निस्सिम भक्ती, त्याच्याचमुळे मोहून टाकणाऱया त्या गोकुळाच्या अंगणाचं वेड, ओढ जाणवते. ते पूर्णपुरुष रूप, तो खोडकर कान्हा, यमुनेपल्याडचा श्रीकृष्ण असा किती प्रकारे सात्विक भावनांचा हा सागर कागदावर भेटतो. यात काही अल्पाक्षरी कविता, गवळणी असून त्याही वेगळेपण दाखवतात.
परतुनि ये रे कृष्णा
द्वारकेला रमला रे
अन् आठव गोकुळ
गोप-गोपिका राधा रे
हिरवळीचा अलवार मुलुखही तसाच देखणा आहे. त्यातील ती, तिचं असणं हे मांडण्यासोबतच हिरवळ, एकटी दुपार, फरफट, संगत, चंद्राचा घाव, श्यामरंगी अशा कवितांमधून तरल भावना व्यक्त केलेल्या आहेत.
या संग्रहाचे लेखन वैशिष्टय़े म्हणजे अनेक कविता वाचता वाचताच दृश्यरूपात पोहचतात अन् त्यामुळे ती जास्त उजळून निघते, आकळतेही. भावांकुराचा तजेलदार बहर तो हाच याची खात्री देणारा हा काव्यसंग्रह आहे.
वर्तमानाच्या लिपीत
कवी ः प्रशांत भरवीरकर
प्रकाशक ः ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठs ः 96, मूल्य ः रुपये 125/-





























































