>> प्रकाश निंगणुरकर-देसाई, गुंतवणूक सल्लागार
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे आजकाल लोक आकर्षित होत आहेत. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी. हा एक शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोन आहे.
म्युच्युअल फंडातील एसआयपी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा एक सोयीस्कर आणि पद्धतशीर मार्ग उपलब्ध करून देते. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करून इक्विटी गुंतवणुकीच्या शक्यतेचा फायदा होऊ शकतो. एसआयपी एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी महिन्याला ठरावीक रकमेने सुरुवात करता येते. अगदी 500 रुपयांपासून.
जाणकारांचा सल्ला घ्या
ज्यांनी अगोदरच एसआयपी चालू केले असेल तर ते सद्यपरिस्थितीत निश्चितच फायद्यात आहेत, त्यांनी अजून एखाद्या चांगल्या फंडात एसआयपी घ्यायला हरकत नाही.
तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते.
आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन आणि तुमच्या विशिष्ट गरजांनुसार योग्य पोर्टफोलिओ विकसित करू शकता. गुंतवणूकदार संभाव्यपणे त्यांचे आर्थिक नियोजन साध्य करू शकतात. तुमचा एक निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करू शकतो. चला तर, आजच आपण नवीन एसआयपी चालू करू या.
फायदे कोणते…
एसआयपी गुंतवणूकदारांना शेअर बाजार खाली असताना अधिक युनिट्स आणि बाजार वर असताना कमी युनिट्स खरेदी करता येतात. यामुळे आपल्या फोलिओमध्ये घसरलेल्या किमतीत जादा युनिट्स मिळतात.
शिस्तबद्ध गुंतवणूक करता येते. एसआयपीत गुंतवणूकदार नियमितपणे ठरावीक रक्कम गुंतवत असल्याने आर्थिक शिस्त लागते. त्यामुळे नियमित बचत करण्याची सवय लागते.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपी निवृत्ती नियोजन, मुलांचे शिक्षण किंवा घर खरेदी या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य आहे.
एसआयपी गुंतवणूक ऑनलाइन प्लॅटफॉममुळे सुलभ झाली आहे. गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि ट्रकिंग करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे कुणीही सहजरीतीने बचत जाणून घेऊ शकतो.




























































