ठसा : दासू वैद्य

943

>> प्रशांत गौतम

मराठीतील आघाडीचे कवी, गीतकार दासू वैद्य यांच्या ‘मेळा’ या पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन 4 ऑगस्टला संभाजीनगरात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते झाले. 1987 पासून दासू वैद्य यांचा लेखनप्रवास सुरू झाला. मूळ कविता हा पिंड कायम ठेवत पथनाटय़, एकांकिका, नभोनाटय़, मराठी चित्रपटासाठी गीतलेखन, मालिकांसाठी शीर्षक गीत, बालसाहित्य असा प्रवास आजपर्यंत बहुआयामी होत गेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी आणि नाटक या विषयात एकाच वेळी पदवी संपादन करून आपली दोन्ही क्षेत्रांतील आघाडी कायम ठेवली. दोन्ही क्षेत्र त्यांच्यासाठी एकमेकांना पूरकच असल्याने समांतर प्रवास सुरू राहिला. पॉप्युलर प्रकाशनाने ‘तूर्तास’, ‘तत्पूर्वी’ या महत्त्वाच्या कवितासंग्रहानंतर कवितेचा हा बालकविता संग्रह प्रकाशित केला. तर ‘भुई।़।़’ हा बाल कवितासंग्रह साकेत प्रकाशनाने, तर ‘आजूबाजूला’ हा ललित लेख संग्रह जनशक्ती प्रकाशनाने प्रकाशित केला. नावावर असलेल्या पाचही संग्रहांनी आपली वेगळी छाप पाडली. अनेक मानसन्मान, पुरस्कार प्राप्त होत गेले. त्यांनी मोजकेच गद्यलेखन केले. निवडक दैनिकात सदर लेखनही प्रकाशित झाले. मध्यंतरी ‘यमक आणि गमक’ या शीर्षकाचे सदर लेखन एका प्रथितयश दैनिकाने वर्षभर चालवले. दैनिकाच्या रविवार पुरवणीत लेखनाचा दर्जा कायम ठेवून सातत्याने प्रयोगशील लिहिणे हे सोपे नाही. संग्रहातील निवडक लेखन ग्रंथबद्ध होताना निवडीची कसोटी लागते, ती त्यांनी लावली. प्रस्तुत ‘मेळा’ संग्रहातील अठ्ठावीस लेखातील दोन लेख वगळता बाकी सर्व लेख प्रकाशित सदर लेखनातील आहेत. सदर प्रसिद्ध होत असतानाच साहित्य क्षेत्रात जाणकारांमध्ये आणखी नवीन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. तोच हा ‘मेळा’ ललित लेखसंग्रह, ज्याला सुभाष अवचट यांचे मुखपृष्ठ आणि महेश एलकुंचवार यांचे ब्लर्ब लाभले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या