ठसा – अनंत काळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरील सेवानिवृत्त वृत्तनिवेदक, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले अनंत काळे यांनी घेतलेली अचानक एक्झिट दुःखद आणि अविश्वसनीय म्हणावी लागेल. अनंतराव म्हणजे आकाशवाणीचा गोड आवाज, तोच आज काळाच्या प्रवाहात लुप्त झाला आहे. या शहराशी त्यांचा चाळीसेक वर्षांपेक्षा अधिक काळाचा स्नेह, मित्रपरिवाराशी कमालीची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा जडलेला होता. एक सज्जन, सुहृद माणूस असा त्यांचा परिवारात नावलौकिक होता.

अनंतराव अडीअडचणीच्या वेळी सगळय़ांना मदत करणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. 2013 साली सेवानिवृत्त झाल्यावर ते विविध उपक्रमांत व्यस्त तर होतेच, पण त्याच सेवेत साडेतीन वर्षे ज्ञानवाणी, संभाजीनगर एफएम रेडिओ केंद्राचे संचालक म्हणून काम बघत होते. अलीकडच्या काळात काळे परिवाराने पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. तसे ते आपल्या मित्रपरिवारात खासगी गप्पांमध्ये सांगत असत. पुण्यात स्थायिक होण्याचा परिवाराचा निर्णय असला तरी अनंतरावांचा जीव मात्र संभाजीनगर शहर आणि शहरातील मित्रपरिवारात होता. मे महिन्यातील 24 तारखेस ते पुण्यात स्थायिक होण्यास निघाले. एवढेच नव्हे तर जवळच्या आप्तस्वकीय व परिवारास भेटून गेले, तशा पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर टाकून शहरातील मित्रपरिवाराचा निरोप घेतला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत अनंतरावांनी या जगातूनच कायमचे स्थलांतर केले. धारूर येथे 22 सप्टेंबर 1953 रोजी जन्म झालेल्या अनंत काळे यांनी 69 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आई सुभद्राबाई काळे अशिक्षित असल्या तरी त्यांना वाचन, काव्य लेखनाची उत्तम जाण होती. तोच वाङ्मयाचा संस्कार भगवान आणि अनंत काळे यांच्या व्यक्तिमत्त्वात आला.

अनंतरावांचे मोठे बंधू प्रा. भगवान काळे जालना येथील महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत. जालन्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याचे भगवानरावांनी मोठे कार्य केले. विविध विषयांवर त्यांची ग्रंथसंपदा संकेत प्रकाशनने प्रसिद्ध केली. बंधू भगवानराव हे अनंतरावांचे कायम श्रद्धेचे स्थान राहिले. काळे बंधूंचे बंधूप्रेम, साहित्यनिष्ठा, वाचनाची आवड विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यविषयक उपक्रमांत सहभाग कायम सोबतच होता. संकेत प्रकाशन, संकेत हस्तलिखित आणि त्याचसोबत विश्वसंकेत दिवाळी अंक प्रकाशनातील 34-35 वर्षांचे सातत्य, त्यांचे अखंड परिश्रम त्यांच्या मित्रपरिवारास माहीत आहे. पदराला खार लावून त्यांनी प्रतिवर्षीचा दिवाळी अंक 2022पर्यंत नेटाने प्रसिद्ध केला.

अनंतराव 1968 सालापासून पत्रकारितेत होते. एम. ए. मराठी, बी. जे. पदवी, पत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्राचा डिप्लोमा हे त्यांनी छंद म्हणून केले. विविध लहान-मोठय़ा दैनिकांत, वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात त्यांनी कामाचा अनुभव तर घेतलाच, पण त्यांचे अक्षरही सुवाच्च असल्याने छंद म्हणून त्यांनी अनेक हस्तलिखिते निर्माण केली. बोंबाबोंब, स्वप्नसुधा या हस्तलिखितांनंतर 1975 पासून संकेत हे अभिनव हस्तलिखित अनेक वर्षे सुरू ठेवले. आकाशवाणीचे ‘उद्घोष’ हे भित्तिपत्रक संपादित केले. 79-80च्या सुमारास मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्ताविष्कार आणि वृत्तसाधना नियतकालिकाचे संपादन केले. काळे हे संग्राहक होते. या संग्रहालयात त्यांनी विविध दैनिकांचे पहिले अंक, रविवार पुरवण्या, विविध विशेषांक, स्मरणिका व विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या संग्रहात विविध वृत्तपत्रांच्या 80 वर्षांपूर्वीच्या पुरवण्या, वर्गवारीप्रमाणे तारखावार बुक बाईंड करून ठेवल्या आहेत. यातील वृत्तपत्रे ही महाराष्ट्राबाहेरची व देशाबाहेरची आहेत. त्याचप्रमाणे टपाल तिकीट, दुर्मिळ नाणी असाही त्यांनी जपून ठेवलेला मौलिक ठेवा आजही जाणकार अभ्यासकांसाठी खास महत्त्वाचा आहे. स्वतःच्या प्रकाशन संस्थेतून लेखक म्हणून त्यांनी आपली पुस्तके तर प्रकाशित केलीच, त्याचसोबत अन्य लेखकांची सत्तरेक पुस्तकेही प्रकाशित केली. कवितालेखन, चारोळी, काव्य, विविध विषयांवर लेखन ते सातत्याने करीत असत. पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्यांच्या संवेदनाशील मनास पचणारा नसला तरी ते नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यास तयारही झाले, पण त्यातच त्यांची झालेली एक्झिट धक्कादायक होय.