
>>प्रतिक राजूरकर
नामिबियातून चित्ते हिंदुस्थानात आणून निश्चितच एक चांगली सुरुवात करण्यात आली आहे, परंतु चित्त्यांच्या पुनर्वसनाच्या अगदी प्राथमिक टप्प्याचे सोहळे करून भविष्यातील आव्हाने मात्र नाकारता येणार नाहीत. कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या वास्तव्याने पर्यावरणाच्या, संवर्धनाच्या जबाबदारीत अधिकच वाढ झाली आहे. भविष्यात चित्त्यांचे योग्य संवर्धन व्हावे.
चित्ते हिंदुस्थानातून नामशेष झाल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रयत्न तत्कालीन सत्ताधीशांकडून होत होते. एका निर्णायक टप्प्यावर चित्ते हिंदुस्थानात येणार अशी शक्यता निर्माण झाल्यावर चित्त्यांचा विषय हा न्यायालयीन विषयात अडकला. अखेर विद्यमान केंद्र सरकारच्या हयातीत न्यायालयीन निर्णय मार्गी लागल्याने चित्त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा मार्ग मोकळा झाला. 17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पुढील काही दिवस चित्त्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात येणार असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल. शेवटचा चित्ता हिंदुस्थानात आढळला तो 1967 सालच्या दरम्यान. त्यानंतर चित्ता हिंदुस्थानात येण्याअगोदर चित्त्यावर ‘चित्ता भी पिता है’ एका शीतपेयाची जाहिरात, तर कधी मोटरसायकलच्या जाहिरातीतून तर कधी दूरदर्शनवर विविध वाहिन्यांच्या माध्यमांतून चित्ता पडद्यावर दिसत होता. त्यामुळे चित्ता हिंदुस्थानात येण्याअगोदर त्यावर आधारित जाहिरातीतून तो अगोदर हिंदुस्थानात आला, परंतु आता ‘हिंदुस्थानात चित्ता भी जीता है’ हे सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे.
कुनो अभयारण्य हे श्योपूर आणि मोरैना जिह्यात येते. अभयारण्याचे नाव हे नदीवर आधारित आहे. श्योपूर जिल्हा हा कुनो अभयारण्यामुळे प्रसिद्ध तर कुपोषणामुळे जगभरात कुप्रसिद्ध आहे. गवताळ प्रदेश, माळराने हा चित्त्यांसाठी उपयुक्त असा अधिवास आहे. कुनो अभयारण्यात अस्वल, बिबट यासारख्या प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. चित्त्यांना कुनो अभयारण्यात आत्मनिर्भर करायचे असल्यास अनेक आव्हाने अस्वल, बिबट यांच्या रूपात तिथे आहेत. चित्ते हिंदुस्थात होते, परंतु जवळजवळ पाच-सहा दशकांनंतर चित्ते हिंदुस्थानात आले आहेत. त्यांच्यासाठी बिबटे, अस्वल यांच्या समक्ष संवर्धन करणे जिवाची बाजी लावण्याचे ठरेल. अनेक तज्ञांच्या मते चित्त्यांना लगेचच अभयारण्यात मोकळे सोडता येणार नाही. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. काही तज्ञांनी चित्त्यांना अनेक दिवस कुंपण घालून ठेवल्यास त्यांच्या भविष्यातील हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे चित्त्यांना वेळेतच कुंपणातून बाहेर काढावे लागणार आहे, अन्यथा चित्त्यांचे संवर्धन हे केवळ कुंपणातील सफारीपुरते मर्यादित ठरेल. बिबटे आणि चित्ता यांच्यात वर्चस्वाची लढाई होण्याची सुद्धा शक्यता असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्या परिस्थितीत बिबटय़ांचे स्थलांतर हाच एकमेव पर्याय ठरेल. कुनो अभयारण्याचा क्षेत्रफळाचा विचार करता भविष्यात चित्त्यांच्या संख्येबाबत खूप मर्यादा आहेत. पुढील 15 वर्षांत चित्त्यांची संख्या वाढवण्याचा व संवर्धनाचा हेतू आहे, परंतु चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांचा कुनो अभयारण्यात मुक्त संचार गरजेचा आहे. कारण बंदिस्त केलेल्या चित्त्यांचे प्रजनन होत नसल्याचा अनेक मान्यवर अभ्यासकांचे निरीक्षण आहे. चित्त्यांचे पुनर्वसन जरी झाले असले तरी त्यांची नैसर्गिक पुनर्स्थापना होणे गरजेचे आहे.
चित्ता संवर्धन, चित्त्याला बघायला येणाऱया पर्यटकांच्या महसुलातून श्योपूर जिल्हा कुपोषणमुक्त कसा होईल यासाठी राज्य व केंद्र सरकारने नियोजन करावे अशी अपेक्षा आहे. कृत्रिम अधिवासावर चित्त्यांचे नैसर्गिक संवर्धन अशक्य आहे. कालबद्ध नियोजन यशस्वीपणे झाल्यास देशात चित्त्यांची संख्या निश्चितच पुढील काही दशकांत लक्षणीय ठरेल. कधी काळी हिंदुस्थानचा ईशान्य भाग सोडला तर देशभरात चित्त्यांची संख्या आणि वास्तव्य मोठय़ा प्रमाणात होते. शिकारीसाठी चित्त्यांचा वापर, चित्त्यांचा पाळीव प्राणी म्हणून केलेला वापर, चित्त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढते अतिक्रमण त्यामुळे कमी झालेला अधिवास यासारख्या कारणांमुळे चित्ते देशातून नामशेष झाले.
हिंदुस्थानात आणले गेलेले चित्ते हे आशियाई नाहीत ते नामिबियातून आणले गेले आहेत. त्यामुळे आशियाई वातावरणात आफ्रिकी चित्ते आणि त्यांचे संवर्धन निश्चितच आव्हानात्मक आहे. आशियाई चित्त्यांची 2022 सालापर्यंत असलेली संख्या ही केवळ 12 असून त्यापैकी 9 नर तर 3 मादा आहेत. तेसुद्धा इराणपुरते मर्यादित आहेत. 1970-80 च्या दशकात इराणकडून हिंदुस्थानातून सिंहांच्या मोबदल्यात आशियाई चित्ते ही अदलाबदल झाली असती तर आज दोन्ही वन्य जिवांची संख्या आशियात लक्षणीय असती. वास्तविक कुनो अभयारण्य आशियाई सिंहांसाठी आदर्श असा नैसर्गिक अधिवास आहे. गेली दोन-तीन दशके त्यावर प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील गीर अभयारण्यातून काही सिंहांचे कुनो अभयारण्यात पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते, परंतु सध्याचे गुजरात राज्याचे धोरण माझे ते माझे आणि तुझे ते पण माझे असे असल्याने अद्याप सिंहांना सिंहाचा वाटा मिळालेला नाही. मर्यादित वन क्षेत्रात सिंहांची कुचंबणा होत असल्याचे संवर्धकांचे मत आहे. चित्त्यांच्या पुनर्वसनाचा एक टप्पा पार पडला आहे. खरं तर या परिस्थितीत आता केंद्र आणि राज्य सरकारांनी सिंहांच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची गरज आणि अपेक्षा आहे. सिंहांचे कुनो अभयारण्यात पुनर्वसन खरे तर अगोदर अपेक्षित होते, परंतु चित्त्यांच्या पुनर्वसनाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंह आणि चित्ता यांचा एकत्रित अधिवास बघण्यासही नागरिक उत्सुक आहेत. केवळ सिंहाचे गुजरात बाहेर पुनर्वसन नको म्हणून चित्त्यांचा घाट घातला असेल तर ते राजकीय संवर्धन ठरेल. कुनो अभयारण्यात सिंहांचे पुनर्वसन व्हावे असे शास्त्र्ााrय दृष्टीने सिद्ध झालेच आहे. शिवाय कुनो हे मध्य प्रदेशातच आहे पाकिस्तानात नाही.
































































