उजाड भाषा हवी कशाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. मिलिंद जोशी

काळाची पावले ओळखून या बदलत्या काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात आपली भाषा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी सशक्त होईल, अधिक लोकांपर्यंत जाईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असताना तसे प्रयत्न का होताना दिसत नाहीत याचेही चिंतन केले पाहिजे.

आपली भाषा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कार्य करीत असते. जीवनात नवी क्षेत्रे निर्माण होतात तेव्हा आपल्या भाषेतही परिवर्तन घडत असते. आजपर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलनांमध्ये मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी व्यक्त झालेली आहे. आजच्या तरुण पिढीला मराठीशी काहीही देणेघेणे नाही. ती मराठीत बोलत नाहीत, मराठी संस्कृती लयाला चालली आहे वगैरे वगैरे.. असे निराशेचे सूर आळवणारी मंडळी जागोजाग दिसतात. या प्रकारचे निष्कर्ष शहरातील मराठी भाषेची स्थिती पाहून काढले जातात, पण महाराष्ट्रातील तीन-चार मोठी शहरे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे हे निष्कर्ष काढणाऱ्यांना कुणीतरी सांगणे गरजेचे आहे. मी पुण्यात वास्तव्याला असलो तरी मूळचा ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात साहित्यिक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या निमित्ताने माझी भ्रमंती सुरू असते. ग्रामीण महाराष्ट्रात आपले ‘मराठीपण’ उत्साहाने जपणारी असंख्य माणसे पाहायला मिळतात. ती उत्तम मराठी बोलतात. त्यांना त्यांच्या बोलींचा अभिमान असतो. तिथे मराठी साहित्यविषयक कार्यक्रमांना, व्याख्यानांना मोठय़ा संख्येने रसिक येत असतात. हे सारे मला खूप आशादायी वाटते.

2020 साली हिंदुस्थान महासत्ता होणार हा जसा एक फुगा होता आणि महानगरातल्या महिन्याला लाख रुपये पगार मिळविणाऱया काही तरुणांकडे पाहून तो फुगविला जात होता, तर दुसरीकडे पदवीधर झालेल्या अनेक तरुणांना साधी नोकरीही द्यायली कुणी तयार नव्हते. हे स्वीकारायला कठीण असले तरी वास्तवच आहे! मराठी जगते आहे की मरते आहे यासंदर्भातले निष्कर्ष आणि अनुमान केवळ शहरांतील मराठीच्या अवस्थेवरून आपण काढणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. शहरातली मराठी भाषेची प्रकृती ठीक नाही हे मान्य केले तरी मराठीच्या दुरवस्थेविषयी गळे काढण्याची आवश्यकता नाही. जागतिकीकरणानंतर आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले आहेत त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरही झाले आहेत. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा पोत बदलत असला तरी त्या नष्ट होतील याची भीती बाळगण्याचे कारण नाही.

सुटाबुटात वावरणारी, इंग्रजीवर प्रभुत्व असणारी तरीही संवादाच्या वेळी शुद्ध आणि स्पष्ट मराठीत आवर्जून बोलणारी कितीतरी मुले भेटतात. मी ज्या ज्या वेळी अनेक छोटय़ा-मोठय़ा ग्रंथालयांना भेटी दिल्या, त्या त्या वेळी मराठी विषय घेऊन स्पर्धा परीक्षा देणारी कितीतरी मराठी आणि अमराठी मुले मला मोठ्या संख्येने दिसली. मराठी वाङ्मयाचा इतिहास आस्थेने अभ्यासताना मी त्यांना पाहिले हे चित्र आश्वासक नाही का?

आसपास एवढे सारे बदल घडत असताना मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारे काय करत असतात? काळाची पावले ओळखून या बदलत्या काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिक समृद्ध व्हावी यासाठी कोणते प्रयत्न करतात? आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात आपली भाषा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी सशक्त होईल, अधिक लोकांपर्यत जाईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असताना तसे प्रयत्न का होताना दिसत नाहीत याचेही चिंतन केले पाहिजे.

कोणतीही भाषा समृद्ध होण्यासाठी आणि व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर होण्यासाठी ती भाषा बोलणाऱया भाषकांच्या मनातला न्यूनगंड दूर होणे खूप गरजेचे असते. पुणे विद्यापीठात डॉ. मनोहर जाधव मराठी विभागप्रमुख असताना त्यांनी एक चांगला प्रयोग केला होता. विद्यापीठात इतर विद्याशाखांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सुटाबुटात, टापटीप यायचे. मराठी विषय घेऊन शिकणारी मुले साध्या वेशात यायची. राहणीमानातल्या फरकामुळे अनेकदा मराठीचे विद्यार्थी बुजलेले असायचे. त्यातून त्यांच्या मनात न्यूनगंड तयार व्हायचा. तो दूर करण्यासाठी मराठीच्या विद्यार्थ्यांनीही सुटाबुटात, टापटीप यावे असा आग्रह डॉ. जाधवांनी धरला. त्याला यश आले. कपडे बदलून काय फरक पडणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो; पण मानसिकता बदलण्यासाठी केलेला एक चांगला प्रयत्न म्हणून या प्रयोगाकडे पाहायला काय हरकत आहे?

आपल्याकडे भाषेचा संबंध ओठापुरता मर्यादित समजला जातो. भाषा ओठातून येण्यापेक्षा ती पोटातून येणे गरजेचे आहे. जेव्हा त्या भाषेत ती भाषा बोलणाऱया भाषकाचे पोट भरण्याचे सामर्थ्य असेल तेव्हाच ती पोटातून येईल. भाषेचा प्रश्न केवळ अस्मितेशी निगडित असतो असे नाही. तो ‘अस्तित्वाशीच’ जास्त निगडित असतो. त्यामुळे मराठी हा विषय घेऊन करीअर करू इच्छिणाऱया मुलांना, केवळ पदवी देणे एवढ्याच कामात विद्यापीठांनी धन्यता न मानता, त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा यासाठी नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी त्यांच्यासाठी कशा निर्माण होतील याकरिता थोडे चौकटीबाहेर जाऊन उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी समन्वय साधला पाहिजे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केले पाहिजेत. असे प्रयोग इतर सर्व ज्ञानशाखांमध्ये आज होत आहेत. भाषेचे शिक्षण म्हणजे केवळ ललित साहित्याचे शिक्षण नव्हे. व्यवहारात भाषा कशी वापरली जाते, शास्त्राrय लेखनात भाषेचे रूप कसे असते, विविध व्यवसायांत भाषा कशी वापरतात, साहित्यकृतींमध्ये भाषेची अभिव्यक्ती कशी होते याचे शिक्षण दिले गेले पाहिजे.

मायमराठीचा जयजयकार करताना आपल्यातली ‘मराठीपणाची’ ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊपणासाठी मराठीचे प्रेम नको. आंतरिक जाणिवेतून ते प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.

[email protected]
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत. )