
>>>प्रोफेसर डाॅ शशिकांत लोखंडे
एकेकाळी मराठीतील नवकथेने मानवी जीवनातील विधायक मूल्यांचा वेध घेतला होता. जीवनातील “अनास्तित्वावस्था आणि अतिवास्तवता यांचे प्रखरपणे चित्रण केले होते. आजच्या विज्ञान युगातही मानवी समाजाची सर्वस्तरीय आणि मानसिकस्तरीय ससेहोलपट, अभावग्रस्तता, परंपरापूजन हे सारं आहे. या नव्या काळातील माणूस आता नव्या दुःखाने लिप्त आहे. त्याच्या अंतर्मनात प्रचंड अस्वस्थता आणि कमालीची अशांतता आहे. मूल्य ऱ्हासात त्याच्या मनाचा कोंडमारा, असहायता, नव्या-जुन्या संकेतांमधील संघर्ष, विलक्षण एकाकीपण, भावोर्मीची विसंगतता अद्याप आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा तळ ढवळून निघाला आहे आणि या साऱ्यांचं उत्कट दर्शन नीरजा यांच्या कथेत आहे.
नीरजा हे मराठी साहित्य विश्वातील एक लक्षणीय नाव आहे. त्यांचे आतापर्यंत चार कवितासंग्रह (1987-2010), तीन कथा संग्रह (2001-2012), दोन ललित लेखसंग्रह (2007-2010), दोन संपादने (2011) प्रकाशित असून 2018 साली ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ हा पाचवा कथासंग्रह ‘पॉप्युलर प्रकाशन’ने प्रकाशित केला आहे. ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ या शीर्षकाच्या संग्रहात याच शीर्षकाची एकही कथा नसली तरी बारा कथांमधील अनुभव विश्वाचे केंद्रवर्ती मर्म सांगणारे हे शीर्षक आहे. बारा कथांमधील अनुभव विश्व सामान्यपणे मध्यमवर्गीयांचे आहे. त्यातील स्त्री आणि पुरुष हे विविध समस्यांनी त्रस्त, अस्वस्थ आहेत. एकूण आजच्या समाजाचेच प्रतिनिधित्व करणारी या कथेतील माणसे आहेत.
‘श्रीकांत विनायकची गोष्ट’मधील विवाहित श्रीकांत विनायक भोवतालच्या अमानुष, अंदाधुंद, अतर्क्य, आकस्मिक, विसंगत व अपमानकारक घटना यांनी अवस्थ आहे. एक सामान्य माणूस म्हणून जगताना त्यांना अनेक बाबतीत प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे त्याला सापडत नाहीत. त्याला सर्वत्र बोथट, बेचव, दिसतं. सर्वत्र उपेक्षा वा निराधारत्व दिसते. पोटतिडकीने काही झणझणीत प्रतिक्रिया द्यावी अशी अस्वस्थता आहे. कुटुंब व्यवस्थेपासून राजकीय क्षेत्रापर्यंत त्याच्या मनात काही मतं आहेत, पण त्याला कुठेही व्यक्त होता येत नाही. सर्वत्र अश्रद्धेय वातावरण आहे म्हणून त्याला वाटतं, देवश्रद्धेने देवळात तरी ही मानसिक अशांता मिटवता येईल. माझी अडचण जाणून घेऊन सगळे देव या देवळात आलेत माझ्या सोबत असे त्याला वाटणं त्यामुळेच स्वाभाविक आहे. याच अस्वस्थतेचे सूत्र ‘पाच महिने तेवीस दिवस’ हा कथेत आहे.
दीनानाथ बावीसकराच्या आयुष्यात पत्नी म्हणून आलेली वंदना ही नव्या आधुनिक अपारंपरिक विचाराची मुळात आहे. तडफदार, डॅशिंग आहे, पण सामाजिक संकेतानुसार तिला विचारात न घेता तिचे लग्न घडविले जाते. पती निवडीची तिला संधीच दिली जात नाही आणि एक संस्कारी मुलगी म्हणून ती पदरी पडणाऱ्या नवऱ्याला स्वीकारू पाहते. तो पती तसा तिला अजोड-विजोड आहे. व्यवहारात जास्त रमणारा आहे. पत्नीच्या भावभावनांची कदर त्याला करता येत नाही. कायदेशीररित्या तिला हवं असणारं अपेक्षित शरीरसुखही तो तिला मिळू देत नाही. दोघांमध्ये हे संघर्षाचं कारण आहे. पुढे ती आक्रमकपणे पुरुषी वर्चस्वाला शह देऊ पाहते. सरळ घटस्फोटाचा निर्णय अमलात आणते. समाजाला मान्य होणारे नसले तरी जवळच्या मित्राकडून शरीरसौख्याची अपेक्षा पूर्ण करते, पण तेथीलही पुरुषी वर्चस्व तिला अस्वस्थ, असहाय्य बनवते. जी लग्ने टिकल्यासारखी होतात, त्याबाबतीत रुची ही पुरुषी वर्चस्वाखाली दडपली गेलेली असते म्हणून… याचेही चित्रण या कथेच्या उपकथानकात आहे आणि स्वगत माध्यमातून ही कथा आकाराला येते.
‘पार्टी’ या कथेत कंपनीशी एकनिष्ठ असणाऱ्या, पण सहकाऱ्यामध्ये मिसफिट असणाऱ्या एका अधिकारी माणसाची मानसिक व्यथा चित्रित झाली आहे. तो ‘पार्टी’त रमत नाही, एन्जॉय करत नाही. तो आत्मपरीक्षण करीत राहतो. पण शेवटी प्रमोशनसाठी हे काऊंट नाही ना होत. असे त्याचे कन्फेशन आहे. वैर, स्पर्धा, दमन अशा वातावरणात मानसिक शांतता कशी मिळणार? पण तो आता यातून राजीनामा देऊन सुटू पाहतो… ‘मग मिळेल की, आपल्याला मनःशांती’ किंवा आफ्टर ऑल इट इज माय लाइफ. आजपर्यंत नाही जगले माझ्या मनाप्रमाणे. आता तरी जगू दे ना मला हवं तसं. विदाऊट रिमोट ऍण्ड विदाऊट पॉवर’ अशा निर्वाणीवर तो आता पोहोचतो. लेखिकेने त्याची ही अशांतता अचूक शब्दात टिपली आहे.
‘चेहरा’सारख्या कथेत पती राजीवच्या शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थिनीच्या जगातील वामाचाराने स्वअस्तित्व मलीन झालेल्या एका पत्नीची रंजणारी व्यथा व अस्वस्थता चित्रित झाली आहे. चेहरा या प्रतिमेतून लेखिकेने हे अनुभव विश्व साकार केले आहे. नवऱ्याच्या दुष्कृत्यामुळे संसारावर व उमद्या मुलावर विपरीत होणारे परिणाम संपवण्यासाठी, स्वच्छ चेहऱ्यासाठी शेवटी रंजना राजीवला घराबाहेर हाकलते. हा निर्णय तिला जगण्याची उभारी देतो. पारंपरिक मूल्यांना हादरा देणारी वंदना या कथेत आहे.
मूल न होणारी अनुजा ‘नियोग’ पद्धतीने गर्भधारणा करू पाहते, स्पर्म बँकेतून स्पर्म घेण्यास उत्सुक होते. ‘आई होण्याचे सुख महत्त्वाचं नाही का?’ ही विज्ञान युगातील स्त्री विश्वातील समस्या आहे. गर्भरहित जगण्यापेक्षा ‘ते स्वर्ग घ्यायचे व रुजू द्यायचे आपल्या गर्भात’ हाच त्यावर तोडगा अनुजाला सुचविला जातो. तिला सांगितलं जातं की, ‘बायकांसाठी लागू असणाऱया पावित्र्याच्या कल्पना लाव तू धुडकावून’. कारण बाईनं स्वतःचा विचार करायला शिकलं पाहिजे.’ हे या कथेचं सार आहे.
‘सत्तेची काठी’ ही अतिशय बोल्ड अशी कथा आहे. वशा आणि त्याच्या बायकोची नव्हे, स्त्री-पुरुष लैंगिक जाणिवेची आहे. पुरुष लिंग हे वर्चस्वाचं प्रतीक मानले जाते. या वर्चस्वामुळे वंशाला ‘मुलगा’च होणं सार्थकी लागल्यासारखं ठरतं असं आजही मानलं जातं. या कथेत समाजाच्या चुकीच्या विचारधारणेचा सुप्तपणे उपरोध खचून भरला आहे. या कथेत स्त्रीलाही गंड जोपासावा लागतो याचं सूचन आहे. वस्तुतः लेखिकेच्या कथांची भाषा व शैली अकृत्रिम, निरलंकृत, आकलनीय, ओघवती व ऊर्जामय आहे हे वारंवार जाणवतं.
‘मनात माझ्या’ कल्पनेच्या पातळीवर आपल्या दुःखाचा निरस करणारी स्त्री आहे. व्रतवैकल्यांचा वचक, पतीआधी पत्नीने जेवायचे नाही ही सांकेतिकता आणि शिक्षण करूनही नोकरी नाही करायची अशा काही स्थितीत असणारी ‘ही’ स्त्री पुरेपूर संभोगसुख न देणाऱ्या नवऱ्याबाबत आक्रमक होते. प्रसंगी त्याच्यावर शस्त्रास्त्राचा वार करते. नवऱ्याच्या पश्चात केलेल्या स्व व्यभिचाराबद्दल तिला चूक नाही वाटत. ‘प्राप्त परिस्थितीत स्वतःला थोडाफार आनंद देण्याच्या’ प्रयत्नाचा एक भाग म्हणून ती साऱयांचं स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी व सर्वांवर कुरघोडी करण्यासाठी ‘अंगात देवी’ येत असल्याचा बनाव करते आणि त्यातही यशस्वी होते. वास्तव आणि कल्पना या द्वंद्वातील ताण या कथेत आहे. ही स्त्रीमुखी कथा अतिशय अंतर्मुख करणारी आहे.
स्त्री वर्चस्वासाठी व्याज शिस्तीत त्रस्त झालेल्या एका ऍडव्होकेटची मानसिक ब्ल्यू प्रिंट ‘कामन, क्लायंट आणि केमिकल इम्बॅलन्स’ या कथेत आहे. आर्त भावविवश मनाच्या स्त्रीची कथा ‘भास-आभास’ आहे. संशयी पतीच्या बंधनात गुंतलेल्या शरीराची ओळख न जागलेल्या स्त्रीचा हा आक्रोश स्वगतमय आहे. पूर्वीचे प्रेमाचे सुख आठवून मरणात होणारी ती आहे. कथा अतिशय दमदार आहे. कथांची भाषा व शैली हा एक स्वतंत्र विषय आहे. ‘नवी कथा’ वा ‘हॅपी मॅन’ या दोन कथाही विलक्षण आहे. अंतर्मनाची स्पंदने त्यात आहेत. मराठी साहित्यात या नव्या काळात अतिशय ‘पोटॅन्शियल’ म्हणून हा कथांचं मोल अव्वल आहे. वाचकांना एका नव्या वास्तव जीवनमुक्तीची प्रतिती येऊ शकेल…
अस्वस्थ मी अशांत मी : नीरजा
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठ : 208, मूल्य 350/-




























































