रंगनाट्य- नाटय़ावकाशातली जंगल सफारी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

बालनाटय़ाच्या पलीकडे जात नाटय़ रसिकांना परिपूर्ण व्यावसायिक नाटकाचा आस्वाद देणारी कलाकृती. 

साहित्यविश्वात दिलीप प्रभावळकर यांनी ‘बोक्या सातबंडे’नामक करामती मानसपुत्राला जन्माला घातले आणि त्याच्या नाना उद्योगांनी बालवाचकांना मनसोक्त आनंद मिळवून दिला. वास्तविक, या बोक्या नामक मुलाचे खरे नाव चिन्मयानंद. मात्र त्याला ‘बोक्या सातबंडे’ हे नाव कसे पडले, याचे विवेचन दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या याच पुस्तक मालिकेत करून ठेवले आहे. असा हा करामती छोटा नायक आता ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाद्वारे थेट रंगभूमीवर अवतरला आहे.

बालनाटय़ांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला आघाडीचे अनेक कलाकार दिले आहेत. अनेक बालनाटय़े रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत आणि हा नाटय़रस त्यांच्या पुढच्या पिढय़ांतही पांमित झाला आहे. ‘बोक्या सातबंडे’ हे प्रथमदर्शनी बालनाटय़ वाटत असले तरी हे नाटक अनुभवताना त्याला केवळ ‘बालनाटय़’ असा टॅग लावता येईल का? असा प्रश्न पडतो. कारण या नाटकाची निर्मिती मूल्ये लक्षात घेता बालनाटय़ाच्याही पलीकडे जाऊन समस्त नाटय़ रसिकांना एका परिपूर्ण व्यावसायिक नाटकाचा आस्वाद देणारी ही कलाकृती असल्याचे स्पष्ट होते.

दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरून डॉ. नीलेश माने यांनी हा बोक्या सातबंडे नाटय़संहितेत उतरवला आहे. बोक्या सातबंडे नावाचा मुलगा, त्याचा मित्रपरिवार आणि नाटकातले त्यांचे प्राणीमित्र यांच्यातल्या गमतीजमतीची कथा यात आहे. लेखकाने ही गोष्ट सुरसपणे गुंफली आहेच. मात्र त्यासोबतच नाटकातून बालमनावर योग्य संस्कार होतील याचे व्यवधानही ठेवले आहे.

‘बोक्या सातबंडे’ या नाटकाची गोष्ट तशी साधी, सरळ आणि सोपी आहे. मात्र रंगमंचावरचा त्याचा दृश्य परिणाम या नाटकाच्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने हाताळला आहे, तो कमालीचा आहे. या नाटकाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत आणि त्यात नाटकाच्या नेपथ्याचा मोठा हातभार आहे. पहिल्या अंकात बोक्या सातबंडेच्या घराचा माहोल आहे आणि दुसऱया अंकात या नाटकाने रंगमंचावर जे काही उभारले आहे ते प्रत्यक्ष अनुभवणे ही मजेशीर व अचंबित करणारी गोष्ट आहे.

पाम पाटील व दीप्ती प्रणव जोशी यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू व्यवस्थित सांभाळली आहे. सर्वसामान्य पात्रांसह नाटकात येणाऱया प्राण्यांची पात्रे मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी दिग्दर्शक द्वयीने घेतलेले श्रम सत्कारणी लागले आहेत. नाटकाचे ािढएटिव्ह डिरेक्टर मिलिंद शिंत्रे आणि दृश्य संकल्पनाकार प्रणव जोशी यांची अचूक साथ नाटकाला लाभली आहे. ‘बोक्या सातबंडे’चे जनक दिलीप प्रभावळकर यांचा अधूनमधून कानांवर येणारा संदेशरूपी आवाज या नाटकाला वेगळे परिमाण प्राप्त करून देतो.

कलाकारांनी रंगमंचावर केलेली कमाल हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. विशेषत प्राण्यांच्या भूमिकेत कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्राण्यांच्या लयबद्ध हालचाली, त्यांचे स्वर आणि एकूणच त्या-त्या प्राण्यांचा औरा, या कलाकार मंडळींनी कुशलतेने सांभाळला आहे. बोक्याच्या मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार आरुष बेडेकर याने विविध करामती व उद्योग करत बच्चेमंडळींना नाटकात रमवण्याचे कार्य नीट पार पाडले आहे. यश शिंदे (यश), सौरभ भिसे (बाबा व पुष्पा), सिद्धा आंधळे (आई व मोर), अमृता कुलकर्णी (आजी व अस्वल आजी), सागर पवार (वाघमारे व सिंह), प्रथमेश अंभोरे (ससा), आकाश मांजरे (कुत्रा व माकड), शिवांश जोशी (हरणाचे पिल्लू) आदी नटसंचाने हे नाटय़ आश्वासकरीत्या रंगवले आहे.

उच्च तांत्रिक अंगे हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे.नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांना यात बरेच काही करण्यास वाव मिळाला असून अतिशय देखणे आणि रंगतदार नेपथ्य त्यांनी उभारले आहे. राहुल जोगळेकर यांची प्रकाशयोजना आणि निनाद म्हैसाळकर यांचे संगीत, यांचा एकजिनसीपणा या नाटकात दिसून येतो आणि नाटकाच्या आकर्षकतेत अधिकच भर घालतो. वेशभूषाकार महेश शेरला व रंगभूषाकार कमलेश बिचे यांना त्यांची कलात्मकता दाखवण्यासाठी या नाटकामुळे मोठाच प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे आणि त्यांनी त्याचा उत्तम उपयोग करून घेत हे नाटय़ बहारदार केले आहे. ‘मिलाप थिएटर टूगेदर’ निर्मित आणि ‘व्ही. आर. प्रॉडक्शन’ प्रकाशित हे नाटक बालदोस्तांना तर आकर्षित करणारे आहेच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्य रसिकांनाही नाटय़ावकाशातल्या या जंगल सफारीत गुंतवून ठेवण्याची किमया या नाटकाने साध्य केली आहे.

[email protected]