
>> राज चिंचणकर
रंगमंचावरचा पडदा उघडताच दृष्टीला प्रथम पडणारी गोष्ट म्हणजे रंगमंचावर उभारलेले नाटकाचे नेपथ्य! असे म्हणतात की, नाटकाच्या नेपथ्याला पहिली टाळी आली की, ते नाटक पुढे हमखास रंगत जाते. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या बाबतीत हे अचूक लागू होते. यात पारंपरिक दिवाणखान्याच्या ऐवजी समोर दिसणारी दोन टुमदार घरे, त्यांच्या मधोमध हिरवेगार लॉन अशी सगळी मांडणी असली की ते दृश्य आकर्षित करणारच. साहजिकच, या दृश्यातून मनावरही ताजेपणाचा कुंचला फिरत राहतो आणि नाटकाचे रंगलेपन प्रथमदर्शनीच सुखावह होत जाते.
नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवार याचे आहे म्हटल्यावर त्या नाटकात नक्की काय असणार याचा अंदाज रसिकांना असतोच. संतोष पवारचा मूळ बाज विनोदी शैलीचा असला तरी त्याच्या नाटकांतून विशिष्ट अशा संदेशाची पेरणी केलेली असतेच. पण या सगळय़ाच्या अधेमधे संतोष पवार त्या नाटय़ावकाशात जी काही करामत करतो, त्याने तिकिटाचे पैसे वसूल झाल्याचा खात्रीपूर्वक अनुभव रसिकांना येतो. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटकही त्याला अपवाद ठरलेले नाही. संतोष पवार म्हटले की, सर्वसाधारणतः लोकनाटय़ाचा फॉर्म डोळय़ांसमोर उभा राहतो, परंतु या नाटकात त्याने ते पूर्णतः टाळले आहे. केवळ दोन फॅमिलींची खेळकर कॉमेडी सादर करण्याचा यात त्याचा हेतू असल्याचे स्पष्ट होत जाते.
या नाटकातही संतोष पवार याने लेखन व दिग्दर्शनाच्या माध्यमातून धुमाकूळ घातला असून नाटकाचे दोन अंक म्हणजे मनोरंजनाची पुरेपूर गॅरंटी आहे. या नाटकातली पात्रे तर संवादांच्या माध्यमातून बोलतातच, पण यातल्या घरांच्या खिडक्यासुद्धा चक्क बोलतात. संतोष पवारने नाटकाची बांधणीच अशी केली आहे की, यातल्या खिडक्यासुद्धा या नाटकातल्या व्यक्तिरेखा बनून गेल्या आहेत. या खिडक्यांद्वारेच नाटकात अनेक गोष्टी घडत जातात आणि त्यांच्या साक्षीनेच नाटक रंगत जाते.
शारीरिक व्यंगातून होणारी विनोदनिर्मिती मराठी रंगभूमीला नवीन नाही. हाच धागा पकडत या नाटकातही एक कर्णबधिर व एक मूक अशी पात्र योजना करण्यात आली आहे. त्यांच्यासह अधूनमधून स्मरणशक्ती हरवणारे एक पात्रही यात आहे. हे कमी म्हणून की काय, या नाटकातल्या अजून एका पात्राला रात्री दिसत नाही, तर दुसऱया एका पात्राला रात्री दृष्टी प्राप्त होते. आता ही अशी सगळी भट्टी जमल्यावर नाटकात गंमत येणार नाही, असे होणे शक्यच नाही. त्यातच बोनस म्हणजे या नाटकात सागर कारंडे प्रमुख भूमिका रंगवत आहे. परिणामी, नाटकातला विनोदी प्रवाह सुसाट बनला आहे. साहजिकच, चौकार व षटकारांची विनोदी बरसात करत रंगणारे हे ‘खिडकी’नाटय़ रंगमंचावर पार धमाल उडवत राहते.
नाटकाचे कथासूत्र उलगडत जाते ते यात योजलेल्या लग्नाच्या घटनेमुळे, पण हे केवळ निमित्त आहे आणि खरे नाटक विविध प्रसंगांची गुंफण करत दृग्गोचर होत जाते. सागर कारंडे याच्यासारखा हुकमी एक्का या नाटकाला गवसल्यावर या नाटकाकडून जी काही अपेक्षा ठेवता येईल, ती अपेक्षा हे नाटक अर्थातच पूर्ण करते. सागर कारंडेने कर्णबधिर अशा गृहस्थाची म्हणजे नाटकातल्या दादांची भूमिका रंगवताना त्याच्या भात्यातले हुकमी बाण बाहेर काढत छोटय़ा-छोटय़ा जागांवर त्याने अचूक नेम साधलेला आहे. नाटकातल्या त्याच्या या भूमिकेविषयी शब्दांत काही सांगता येणे खरोखरच कठीण आहे. अजिंक्य दाते याने नाटकात बोलू न शकणारा असा मुकेश उभा करताना प्रसंगानुरूप त्याला वाटणारी हतबलता, चिडचिड आदी विभ्रम ताकदीने सादर केले आहेत. दिवसा दृष्टी प्राप्त होणाऱया नयनच्या भूमिकेत अमोघ चंदन याने लव्हेबल दिसण्यासोबतच भूमिका ठाशीव करण्याकडे लक्ष दिले आहे. या तिघांसोबत शलाका पवारने यातल्या दादांची पत्नी ठोस उभी केली आहे. घरातल्या तिघांना असलेल्या व्यंगांचा सामना करताना तिला करावी लागणारी कसरत तिने मोठय़ा नजाकतीने पेश केली आहे.
एका बाजूला ही अशी फॅमिली आहे, तर त्यांच्या समोरच्या घरामध्ये नारायण, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची मुलगी सुनयना ही मंडळी आहेत. यातल्या नारायणरावांचा विसरभोळेपणा त्यांना वारंवार दगा देतो, तर सुनयनाला फक्त रात्रीच दृष्टी प्राप्त होते. या दोघांच्या कोंडाळ्यात लक्ष्मी सापडलेली आहे. रमेश वाणी यांनी नारायणच्या भूमिकेत भरलेले आकर्षक रंग नाटकात धमाल उडवतात. सिद्धिरूपा करमरकर हिने यात लक्ष्मी रंगवताना तिची उडणारी त्रेधातिरपीट नीट साकारली आहे. सुनयनाच्या भूमिकेत सायली देशमुख शोभून दिसली असून तिच्याकडून भविष्यात मोठय़ा अपेक्षा ठेवता येण्याजोगी कामगिरी तिने यात केली आहे.
संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आकर्षक असून नाटकाची गरज अचूक भागवणारे आहे. किशोर इंगळे यांच्या प्रकाश योजनेने नाटकाला उत्तम खेळवले आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा पात्रांना चपखल बसली आहे. मिलिंद जोशी यांची गीतरचना लक्षवेधी आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी या नाटय़ाला संगीत साज चढवला असून या नाटकाचे शीर्षक गीत नाटक संपल्यानंतरही कानात रुंजी घालत राहते. या नाटकातल्या दोन फॅमिलींच्या निमित्ताने रंगभूमीवर अक्षरशः धिंगाणा घालणारी कॉमेडी अवतरली आहे. अर्थात याचे श्रेय जसे संतोष पवारला जाते तसेच ते या नाटकातल्या सर्व कलाकारांनाही जाते. प्रत्येकाच्या वाटय़ाला आलेल्या भूमिका या नटसंचाने उत्स्फूर्तपणे रंगवल्या असून या सगळय़ांचे टीमवर्क या नाटकासाठी मोलाचे ठरले आहे.
[email protected]
































































