
>> राजेश शृंगारपुरे, [email protected]
ओडिसी नृत्यगुरू झेलम परांजपे. नृत्यसाधना अव्याहत सुरू राहण्यासाठी पोहणे, योगासने या सर्व गोष्टीही तितक्याच आवडीच्या…
आपल्या या व्यायामशाळेतील आजच्या अतिथी आहेत… शास्त्रीय नर्तिका… झेलम परांजपे!
झेलमताई… ओडिसी नृत्यांगना, शिक्षिका आणि नृत्य दिग्दर्शक आहेत. सूर्य आणि तेज जसे संमिश्र आहे तसेच झेलमताई आणि नृत्य! लहानपणापासूनच नृत्य त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.
राष्ट्रसेवा दल कलापथकाने आयोजित केलेल्या नृत्यशैलीत त्यांनी अनेक वर्षे काम केले. 1977 पासून त्यांनी ओडिसी नृत्यनाटिकेचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे. त्यांनी गुरु शंकर बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिसी प्रशिक्षण सुरू केले. तेव्हा अभिनेत्री स्मिता पाटील या त्यांच्या सक्रीय सहकारी होत्या. पुढे त्या सिनेक्षेत्राकडे वळल्या, मात्र स्मिता पाटील यांची नृत्यकलेशी नाळ जुळून होती. त्या झेलमताई यांच्या एक चांगली मैत्रीण आणि मार्गदर्शकही होत्या. 1986 मध्ये स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्या वेळेस झेलमताई छोटय़ा स्वरूपात नृत्यकलेची शिकवणी घेत होत्या. त्यांना हा डोलारा वाढवून नृत्याचे गुरुकुल उभारायचे होते. अत्यंत जवळची मैत्रीण स्मिता, तिच्या आठवणीप्रित्यर्थ झेलमताईंचे गुरुकुल ‘स्मितालय’ झाले. यांच्या मते काहीही चांगले करण्यासाठी आपण त्याबद्दल भावनिक असणे आवश्यक आहे. आजही वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्यातील उमेद, कार्यक्षमता आणि भावनिकता टिकून आहे हे प्रामुख्याने जाणवले. त्यांच्याशी संवाद साधला असता…
मी आणि माझा व्यायाम
लहानपणापासूनच झेलमताईंंना खेळांची आवड होती. घरच्या अंगणात पकडापकडी, आंधळी कोशिंबीर असे खेळ त्या खेळत. त्यातून आपसूकच शारीरिक हालचाल होई. शाळेतही शारीरिक हालचाल किंवा खेळ प्रकार असा सहभाग होताच. त्यानंतर वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी राष्ट्रसेवा दल कला पथकात सामील झाल्या. त्यामध्ये लोकनृत्य तसेच सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे. लहानपणापासूनच नृत्य आणि संगीत अंगी बाणवल्याचा छान उपयोग झाला. चालणे हा व्यायाम प्रकार खास आवडीचा होता. अशा प्रकारे खेळ, नृत्य, चालणे याद्वारे त्यांची शारीरिक हालचाल वाढली. पुढे तरुणपणात पाठीचे दुखणे सुरू झाले. पाठीचा कणा आतल्या बाजूस खूप वाकलेला आहे असे डॉक्टरांना जाणवले. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार योगासने सुरू केली ती पुढे कायमचीच.
योगसाधनेमुळे जपली नृत्यसाधना
लग्नानंतरही नृत्याविष्कार निरंतर होता. स्मितालय, संसार, संगोपन या सर्व जबाबदाऱया पार पडत होत्या. अशातच वयाच्या 33व्या वर्षी झेलमताई यांना स्लिप डिस्क या विकाराने ग्रासले. चालणे, नृत्य… सगळं बंद. महिनाभर बिछान्याला खिळल्या. एका नृत्यांगनेस नृत्य बंद होणे म्हणजे श्वास कोंडल्याचाच आभास. थोडे बरे वाटल्यावर हळूहळू योगासने सुरू केली. झेलमताई पुन्हा नाचू शकतील की नाही याबाबत डॉक्टर जरी साशंक असले, तरी झेलमताई यांचा आत्मविश्वास प्रबळ होता. मी नाचू शकेन असे ठामपणे त्यांना वाटायचे. वर्षभर योग्य विश्रांती, नियमित योगासने आणि औषधे घेऊन झेलमताई पूर्ववत झाल्या. त्यांनी एक मोठी नृत्यनाटिका सादर केली. त्यात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका वठवली हे विशेष.
लाभदायक योगासने
पाठीचा कणा मजबूत राहण्यासाठी काही विशिष्ट योगासने आहेत. त्यांचा खास वापर करणे उपयुक्त ठरते. जसे सुखासन, पद्मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन, वज्रासन, सुप्त वज्रासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंखासन, नौकासन ही सर्व आसने कंबरदुखीवरही गुणकारी आहेत.
पोहणे हा उत्तम व्यायाम प्रकार
झेलमताईंना मुळातच फिजिकल ऑक्टिव्हिटीज फार आवडतात. त्यात चालणे हा प्रकार म्हणजे एका अर्थी व्यसनच, पण पुढे वय वाढल्यावर त्यांना गुडघेदुखीचा त्रास उद्भवला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, ‘‘यापुढे नाचायचे असेल तर चालणे बंद!’’ मात्र डॉक्टरांनी एक पर्यायी उपाय सुचविला तो म्हणजे पोहणे आणि पाण्यात चालणे. वॉटर थेरेपी इज द बेस्ट थेरेपी… झेलमताईंनी पोहणे, पाण्यात चालणे हा व्यायाम प्रकार सुरू केला. त्याचा त्यांना उत्तम फायदाही झाला. सद्यःस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जो स्विमिंग पूल आहे, तिथे पोहायला जाणे खूपच सोयिस्कर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कधी नृत्यसरावामुळे पाय दुखतात. अशा वेळी पोहणे किंवा पाण्यात चालल्याने पाय नॉर्मल झाल्याचे त्या हसत म्हणाल्या. आता आठवडय़ातून 4 ते 5 दिवस योगासने आणि 3 ते 4 दिवस पोहणे असा नियमच केला आहे.
साधी राहणी… साधा आहार
झेलमताईंनी आहार नियोजनाबाबत काही विशेष ठोकताळे मांडलेले नाहीत. भाजी-पोळी, आमटी, कोशिंबीर असा साधा आहार त्या घेतात. भात तसा नावडता. याला बिर्याणी, पुलाव, खिचडी हा अपवाद. लग्नापूर्वी त्या मांसाहारी होत्या. आठवडय़ातून तीन वेळा मासे आणि रविवारी मटणाचा बेत असे. मात्र परांजपे घराण्याचा उंबरठा ओलांडला आणि शुद्ध शाकाहारी झाल्या. एकत्रित कुटुंब पद्धतीत कुणाचीही जेवणाविषयी नापसंती नसायची. मग कोणतीही भाजी असो वा कोणतीही उसळ, पुरेसा सकस आहार असायचा. मग स्वतंत्र राहायला गेल्यावर थोडय़ा प्रमाणात मांसाहार सुरू केला. गोड पदार्थांवर तशी विशेष मर्जी नसली तरी आईस्क्रीम मात्र आवडीचे.
झेलमताईंचा फिटनेस मंत्र
खेळ प्रकार, चालणे, पोहणे, पाण्यात चालणे, योगासने आणि नृत्य सराव यामुळे आजही वयाच्या 65व्या वर्षी झेलमताई फिट आहेत. त्यांचा फिटनेस मंत्र एकच- शारीरिक हालचाल हाच खरा व्यायाम. समवयस्क मंडळींसाठी झेलमताईंचे खास सांगणे आहे ते म्हणजे नियमित चाला. घरापासून मार्केट किंवा सभोवताली कुठे जाणे झाले तर शक्य होईल तितकी पायपीट करावी. म्हणजे आपोआपच शारीरिक हालचाल होईल आणि तुम्ही नेहमी फिट राहाल.
नव्या पिढीच्या, तरुणाईच्या जीवनशैलीवर कोपरखळी मारत झेलमताई म्हणाल्या की, ‘‘आताच्या स्पर्धेच्या युगात आपली नोकरी किंवा व्यवसाय टिकवण्यासाठी तरुण पिढी अहोरात्र झटते. नव्या कॉर्पोरेट युगात 9 ते 5 ही चाकोरी मोडीत निघाली आणि मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 तास काम करण्यास ही पिढी सज्ज झाली. परिणामी अवेळी जडलेले विकार आणि वार्धक्य. ही परिस्थिती बदलण्यासाठी फिजिकल ऑक्टिव्हिटी वाढवावी. सतत एका जागी बसून काम करायचे असेल तर बसल्या जागीच पायांची हालचाल करा. गुडघे मोडून पायात वाकणे, पुन्हा पाय सरळ करणे, हात कोपरात वाकवून खांद्यापर्यंत घेणे, पुन्हा सरळ करणे, थोडा वेळ केबिनबाहेर चालणे, हातापायांची बोटे आवळणे अशा हालचाली कराव्यात. सुरुवातीस सहकारी हसतील तर हसू द्या! उपयुक्तता लक्षात आली की, तेही तुमचे अनुकरण करतील. शिवाय अर्धा तास चालणे, योगासन किंवा पोहणे हाही उत्तम पर्याय आहे.
पुरस्कारांचे इंद्रधनुष्य
कुमार गंधर्व अॅवॉर्ड – 1999
रोटरी अॅवॉर्ड – 2001
महारी अॅवॉर्ड – 2005
संजुक्ता पाणिग्रही नॅशनल अॅवॉर्ड – 2005
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार – 2007-08
विद्याविभूषण अॅवॉर्ड – 2009
वुमन अचिव्हर अॅवॉर्ड – 2008-2009

























































