
>> साधना गोरे, [email protected]
समाजातील एखादी परंपरा, जीवनशैली किंवा एखादी वस्तू वापरातून नाहीशी झाली की, तिच्याशी संबंधित असलेले शब्दही मागे पडणं हे ओघानं आलंच. खरं तर अशा शब्दांसाठी हळहळ व्यक्त करून उपयोग नसतो. कारण त्यांचं असं मागे पडणं हे आपण स्वीकारलेल्या राहणीमानाचा अपरिहार्य भाग असतं. अशा वेळी आपण एक करू शकतो, या शब्दापासून तयार झालेले लक्ष्यार्थ अधिकाधिक वापरून पुढील पिढय़ांपर्यंत नेऊ शकतो. लक्ष्यार्थ वापरायचे म्हणजे त्या शब्दांशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर करायचा. या लेखात आपण अशाच एका शब्दाविषयी जाणून घेणार आहोत तो शब्द म्हणजे ‘वळचण’.
‘वळचण’ शब्दाचे मूळ संस्पृतमधील ‘वलभिस्थान’ या शब्दात आहे. पुढे त्याची रूपं ‘वलहिचाण – वलइचाण – वळीचाण’ अशी बदलत त्याला आजचं रूप प्राप्त झाल्याचं ‘व्युत्पत्ती कोशा’तील संदर्भावरून म्हणता येईल. ‘वळचण’ या शब्दाचे विविध शब्दकोशांत देण्यात आलेले अर्थ काहीसे असे आहेत – छपराच्या कोपऱ्याकडील खालील भाग किंवा पागोळीच्या (छपरावरून एक प्रकारे पाघळून खाली येणारी पाण्याची ओळ किंवा धार) खालची जागा म्हणजे वळचण. पूर्वीची गवताने शाकारलेली किंवा काwलारू घरं ही दोन किंवा चार पाख्यांची म्हणजे बाजूची असत. अशा घरांना वळचण असतेच. धाब्याच्या, सिमेंट-काँक्रीटच्या घरांना पावसाचं पाणी छतावरून निघून जाण्यासाठी पन्हळ्या असतात. गवताच्या, काwलाच्या छतावरून पावसाचं पाणी निघून जाण्यासाठी पन्हळीची आवश्यकता नसते. कारण ही घरं उताराची असल्यानं पावसाचं पाणी पन्हळीशिवायच एका सरळ रेघेत म्हणजे ओळीत खाली पडत असतं. घर कोणत्याही प्रकारचं असू दे, त्याचं छत भिंतींच्या काहीसं बाहेरच असतं. त्यामुळे भिंतींचं पावसाच्या पाण्यापासून संरक्षण तर होतंच, पण घराच्या बळकटीसाठी समतोलही साधला जातो. तर भिंत आणि छतावरून पडणाऱ्या पावसाच्या धारांच्या आतील जागा म्हणजे वळचण.
अजूनही तुमच्या डोळ्यांसमोर निसर्गाच्या पुशीतलं एखादं काडाचं किंवा काwलारू घर वळचणीसह साकारलं नाही का? ‘वळचण’ शब्दाशी संबंधित काही शब्दप्रयोग पाहिल्यावर ते खात्रीने दिसेल. अगदी सुरुवातीच्या काळात माणसाने जे घर किंवा निवाऱ्याची जागा तयार केली असेल ती गवत, माती अशाच साधनांपासून तयार केली असणार याचा प्रत्यय ‘भुकेलू गुरू वळचणी उपसते’ या शब्दप्रयोगातून येतो. म्हणजे भुकेल्या गुरांना खायला दिले नाही, तर ते घराच्या छपराचं गवतही ओढून खायला लागतं. आपल्या घराला खेटून असणारा, ज्याच्याशी सतत उसनंपासनं केलं जातं, अशा शेजाऱ्याला उद्देशून ‘वळचणीचा वासा’ हा वाक्प्रचार वापरला जातो. वासा म्हणजे आढय़ापासून वळचणीपर्यंत जोडलेला दांडा किंवा सोटा. शेतकऱ्याला घाईगडबडीत ज्या गोष्टी लगोलग हाताशी असाव्यात असं वाटतं, त्या तो वळचणीत खोचून ठेवतो. विळा, कोयता, खुरपं, पुऱहाड अशी धारदार हत्यारं या वळचणीत सुरक्षित राहण्याची आणि हवी तेव्हा लगेच सापडण्याची हमी असते. शिवाय अंगाऱ्याधुपाऱ्याच्या पुडय़ा, चैत्र-वैशाखात येणारी लग्नाची आमंत्रणं अशा एकदा काम झाल्यावर बिनमहत्त्वाच्या झालेल्या वस्तूही या वळचणीत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या असतात.
वळचण म्हणजे घर आणि अंगण यांना जोडणारा दुवा. अगदी भर दुपारचा प्रहर सोडला तर भिंतीपेक्षा हातभर बाहेर असलेल्या छताची सावली वळचणीशी सतत असते. भिक्षा मागताना भिक्षेकरी किंवा मदतीच्या अपेक्षेने आलेला एखादा वाटसरू वळचणीच्या या सावलीच्या गारव्यात उभा असतो, तर कधी कडाक्याच्या उन्हात पाखरंही वळचणीला विसावा घेत असतात. यावरूनच एखाद्याकडून मदत मिळविण्याच्या किंवा आश्रयाला जाण्याच्या संदर्भात ‘वळचणीला जाणे/गेला’ हा वाक्प्रयोग वापरला जात असावा. उदा.ः ‘अमुक नेता तमुक पक्षाच्या वळचणीला गेला’ असं म्हटलं जातं.
दाराशी उभं राहून चोरून ऐकण्याच्या सवयीला ‘वळचणीची पाल’ म्हटलं जातं. एखादी व्यक्ती तिच्या मूळ स्वभावधर्माप्रमाणेच वागणार, त्यात बदल होणं कदापि शक्य नाही हे सुचवण्यासाठी ‘वळचणीचं पाणी वळचणीलाच जाणार’ किंवा ‘वळचणीचं पाणी आढय़ाला जात नाही’ असं म्हटलं जातं. दोन पाखी घराच्या मध्यभागी जे लांब लापूड असतं त्याला आढे म्हणतात. अशा एका आढय़ावर चार-पाच वासे असतात. म्हणजे आढं हे छताच्या वरच्या बाजूला असतं, तर वळचण असते छताच्या खालच्या टोकाकडे ! म्हणजे पावसाचे पाणी हे नैसर्गिक नियमाने वरून खालीच वाहणार. ते वळचणीकडून आढय़ाकडे म्हणजे खालून वर वाहणं कधीच शक्य नसतं, पण याउलट संत एकनाथ कोडे स्वरूपातील एका अभंगात म्हणतात, ‘नाथांच्या घरची उलटी खूण। पाण्याला मोठी लागली तहान।। आत घागर बाहेर पाणी। पाण्याला पाणी आले मिळोनी।। आज मी एक नवल देखिले। वळचणीचे पाणी आढय़ाला लागले।।’ आध्यात्मिक अर्थाच्या या अभंगात जीव व देव यांच्यातले अद्वैत सांगितले आहे.


























































