रंगभूमी – मधुघट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

मधुसूदन कालेलकर म्हटल्यावर त्यांची बहुतांशी कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटकं आठवतील. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांची नाटकावर असलेली लेखनाची हुकमत आठवेलच. नाटक, चित्रपट जसे गाजले तशीच त्यांची गीतंसुद्धा लोकप्रिय झाली. अशा या प्रतिभासंपन्न लेखकाची जन्मशताब्दी या वर्षी सुरू झाली.

हल्लीच्या तरुण पिढीला नाटककार मधुसूदन कालेलकर हे नाव परिचित नसेल, पण जी ज्येष्ठ मंडळी आहेत, नाटय़ निर्माते आहेत आणि जुने जाणते प्रेक्षक आहेत, त्यांना मधुसूदन कालेलकर म्हटल्यावर त्यांची बहुतांशी कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटकं आठवतील. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांची नाटकावर असलेली लेखनाची हुकमत आठवेलच. या नाटककारांनी 1962 ते 1980 या कालावधीत नाटय़सृष्टीला समृद्धीचे दिवस दिले. त्यांच्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर कौटुंबिक जिव्हाळा असलेल्या नाटकांचा उगम झाला. अनेक लेखक अशी नाटकं लिहिते झाले. प्रेक्षकांना त्यांच्या नाटकांनी अक्षरश रडवले. त्यातून समाजाला त्यांनी एक संदेश दिला हे कुणीही नाकारणार नाही. तसेच त्यांनी विनोदी नाटकंसुद्धा लिहिली, प्रेक्षकांना हसवलंसुद्धा. तर मधुसूदन कालेलकर या नाटककाराचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. महाराष्ट्र शासनाला ते माहीत आहे की नाही, माहीत नाही. सरकार जागं होईल तेव्हा बहुधा त्यांची जन्मशताब्दीही संपलेली असेल. सरकारला जागृत करणं हे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचं काम आहे. नवीन कार्यकारिणी निवडून आलेली आहे, ती मंडळी मधुसूदन कालेलकरांची जन्मशताब्दी साजरी निश्चितच करतील अशी अशा धरू या.

‘उद्याचे जग’ हे कालेलकरांचे पहिलं नाटक. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कौटुंबिक, गंभीर, सामाजिक आणि विनोदी नाटकांची रांगच लागली. विषयातील नावीन्यता आणि विनोदाची झालर असलेली सर्वच नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर हिट आणि लोकप्रिय झाली. नाटय़वैभव ही नाटय़ संस्था त्यांनी स्थापन करून व्यावसायिक रंगभूमीवर त्याचे प्रयोग सादर केले. ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘ही वाट दूर जाते’, ‘अबोल झालीस का’, ‘आसावरी’ , ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘नाथ हा माझा’, ‘हे फूल चंदनाचे’, ‘अमृतवेल’, ‘शिकार’, ‘सागरा प्राण तळमळला’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘पेइंग गेस्ट’ या नाटकांबरोबर माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ‘ही श्रींची इच्छा’ इत्यादी लोकप्रिय नाटकांचा उल्लेख हा करावा लागेल. 30 नाटकांचे लेखन त्यांनी केले. या नाटकांना प्रेक्षकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. भाषेतील सहजता आणि कथानकाची सुरेख बांधणी यामुळे त्यांची नाटकं ही पकड घेत असत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे पाच नाटकांची निर्मितीसुद्धा केली. ‘सागरा प्राण तळमळला’, ‘अपराध मीच केला’ आणि ‘शिकार’ या नाटकांसाठीं सर्वोत्कृष्ट साहित्यिक म्हणून पारितोषिकं मिळाली. 1974 साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने यशस्वी नाटककार म्हणून त्यांना सन्मानित केले. नाटकांची आवड त्यांना शाळेपासून लागली. शाळेत असताना गावात आलेली आणि जत्रेत सादर होणारी नाटकं ते आवर्जून पाहायचे. नाटय़सृष्टीत त्यांना यश मिळाले.

मधुसूदन कालेलकरांच्या मराठी – हिंदी सिनेसृष्टीतील मुशाफिरीचे अनेकांनी कौतुक केले. त्यांना सिनेसृष्टीचे जेव्हा आकर्षण वाटू लागले तेव्हा मात्र त्यांचे पाय हळूहळू तिथे वळू लागले. दत्ता धर्माधिकारी त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत घेऊन गेले. जर आपलं नाणं खणखणीत असेल तर कसलीच भीती नसते. कालांतराने त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत कथा-पटकथाकार आणि गीतकार म्हणून नाव खूप गाजले. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या सिनेमातल्या ‘लिंबोणीच्या झाडामागे’ या अंगाई गीताला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला. नऊवेळा महाराष्ट्र शासनाचे कथा, पटकथाकार, गीतकार आणि संवाद लेखन यासाठीचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. मन्ना डे आणि महेंद्र कपूर यांची गाजलेली अनेक मराठी गाणी त्यांनी लिहिली. अभंग, अंगाई, प्रेमगीतं, विरह गीतं आणि लावणी हे सर्व प्रकार त्यांनी त्यांच्या गीतात वापरले .

मराठी चित्रपटसृष्टीत नाव असताना त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान सर्वांना ठाऊक असेलच याची खात्री देता येत नाही. किशोर कुमारच्या ‘झुमरू’ या सिनेमाची पटकथा, शम्मी कपूरच्या ‘ब्लफ मास्टर’ची कथा कालेलकरांची होती हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र त्यांना सॅल्यूट केला. शम्मी कपूरचा कालेलकरांवर विश्वास होता. संजीव कुमार आणि त्यांची मैत्री ही जगजाहीर आहे. शक्ती सामंत आणि त्यांचीसुद्धा मैत्री होतीच. ‘आराधना’ या चित्रपटाची पटकथा त्यांची होती. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतील ‘आराधना’ हा माईलस्टोन सिनेमा तसेच राजश्री पिक्चर्ससाठी ‘गीत गाता चल’, ‘अखियों के झरोके से’ आणि ‘दुल्हन वोही जो पिया मन भाये’ हे सलग तीन सिल्व्हर ज्युबिली सिनेमे त्यांनी लिहिले. देव आनंद ते अमिताभ बच्चन, नूतन, नलिनी जयवंत ते माधुरी दीक्षित या आघाडीच्या नायक-नायिकांसाठी कालेलकरांनी पटकथा लिहिल्या. आपल्या कारकीर्दीत 110 हिंदी-मराठी चित्रपटांचे लेखन त्यांनी केले. 70 पेक्षा जास्त चित्रपट गीते त्यांनी लिहिली. ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमाला 1961 सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

असा हा प्रतिभावंत साहित्यिक. त्यांच्या चित्रपटात ज्या ज्या कलाकारांनी भूमिका केल्या, त्या सर्वांनी कालेलकरांच्या प्रतिभेला सलाम केलेला दिसला. चित्रपटाचा प्रवेश कुठे सुरू करायचा आणि संपवायचा याचं कसब त्यांना असल्यामुळे त्यांचे सर्व चित्रपट रसिकांना अंतर्मुख करीत असं जेव्हा कलाकार म्हणतात तेव्हा त्यांच्या लेखणीला दाद ही द्यावी लागते. नाटक, चित्रपट जसे गाजले तशीच त्यांची गीतंसुद्धा लोकप्रिय झाली. अशा या प्रतिभासंपन्न लेखकाची जन्मशताब्दी या वर्षी सुरू झाली. त्याचे औचित्य साधून त्यांच्या गाजलेल्या नाटकांचा – चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यासाठी पुढाकार कुणीतरी घेणं उचित ठरेल. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्याची दखल ही घ्यायला हवी. नाटय़ परिषदसुद्धा त्याबाबतीत गप्प का? हे न उलगडणारं कोडं आहे. ‘मधुघट’ हा महोत्सवांनी भरला गेला पाहिजे.
– [email protected]