जागर – शिक्षण की ज्ञान?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सावित्री जगदाळे

अल्बर्ट आइनस्टाईन एकदा रेल्वेने प्रवास करत होते. तिकीट चेकर आल्यावर त्याने त्यांना तिकीट मागितले. आइनस्टाइन बराच वेळ तिकीट शोधत होते, पण सापडत नव्हते. चेकर म्हणाला, राहू देत. तुम्हाला कोण नाही मागणार तिकीट. तुम्हाला सगळे ओळखतात. तेव्हा आइनस्टाइन म्हणाले, मला कुठे उतरायचे आहे ते कसं कळणार? वास्तविक, काही तासांपूर्वी कुठे जायचं म्हणून तिकीट काढलेले, मात्र तिकीट तर जाऊ दे, पण कुठे जायचंय तेही त्यांना आठवत नव्हते.

एकदा एका माणसाने आइनस्टाइन यांना त्यांचा फोन नंबर मागितला तर ते डायरीत शोधू लागले. तो माणूस म्हणाला, तुम्हाला तुमचा नंबर माहीत नाही काय? आइनस्टाइन म्हणाले, डायरीत लिहिण्याची सोय असताना डोक्यात कशाला ठेवू? आइनस्टाइन शाळेतही फार हुशार नव्हते. ते परीक्षेत उत्तरे पाठ करून किंवा घोकून लिहीत असतील का? तोत्तोचान हे पुस्तक वाचून बरेच दिवस झाले. फार सविस्तर आठवत नाही. पण आशय आठवतो. एकाने रेल्वेच्या डब्यात शाळा सुरू केली. कसल्याही अटी, नियम नाहीत. वय, गणवेष, पुस्तके यांचीही नाही. वेळेची आणि वयाचीही नाही. ज्याला जे शिकायचे ते शिका. कधी येऊन बसा. एक मुलगी शाळेत न बसता शाळेभोवती सायकलवरून फक्त चकरा मारायची. शिक्षक कधीही म्हणाले नाहीत की, शाळेत बस, अभ्यास कर… काही महिन्यांनी स्वतःहून ती शाळेत येऊन अभ्यास करू लागली. पटापट शिकू लागली. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी असते की परीक्षेत भरपूर मार्कस् मिळवण्यासाठी यावर तज्ञांची बरीच चर्चा झाली आहे आणि होतही असते. मुलं नापास झाली की आत्महत्या करतात. म्हणून परीक्षा घेणं बंद करायचं, शिक्षकांनी शिकवणंच बंद करायचं? हा दोष कुणाचा?

शाळेत कमी मार्क्स मिळवणारी, नापास होणारी मुलं पुढील आयुष्यात यशस्वी झालेली पाहण्यात येतात. उलट बोर्डात येणाऱया अनेकांचे पुढं काय होतं ते त्यांच्या गावातल्यांनाही कळत नाही. कुठेतरी वाचलं की, आयटी इंजिनीयर मुलगा ट्रेकिंगला गेला होता. त्याला खिळा कसा ठोकायचा हे कळत नव्हते. शाळेत हे शिकवत नाहीत. घरातल्यांची मुलाने फक्त अभ्यासू असावं एवढीच अपेक्षा असते. त्याचे हे परिणाम! त्यामुळे अनेकांना व्यवहाराचे ज्ञान कमी असते. मोठय़ा शहरातील मुलं खूप यशस्वी झालेली दिसतात. पण तांदूळ कोठून येतो हे त्यांना माहीत असतं का? शेंगदाण्याचे झाड कसे असते हेही माहीत नसते. दूध तर पिशवीतच तयार होतं, हे त्यांचं नॉलेज. अर्थात त्यांचं काही अडत पण नाही. त्याची कारणे अनेक आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी लिहिता-वाचता येत नसले तरी उत्तम रीतीने शेती करतो. पावसाचे अंदाज अचूक सांगतो. त्याने कुठलीही परीक्षा दिली नसताना तो यशस्वी शेतकरी होतो.

पूर्वी गुरुकुलात कुठे परीक्षा होत्या? ज्ञान मिळवणे आणि पाठांतर करून भरपूर गुण मिळवून टॉपर होणं (काही महिन्यांत ते विसरून जाणे) यात फरक आहेच ना? संत ज्ञानदेव, संत तुकाराम कुठल्या विषयात पदवीधर होते? पूर्वीच्या लोकांनी लिहिण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाठांतराला महत्त्व होते. नव्वदी पार केलेले माझे आजोबा निमकी, औटकी, पाढे खाड खाड म्हणायचे. लक्षात ठेवणं तेव्हा गरजेचं होतं. परदेशात कॉलेजला गेल्यावर विद्यार्थी चौफेर वाचन, संशोधन करून, स्वयंअध्ययन करून डिग्री मिळवतात. आपल्याकडे वर्गाला दांडी मारण्यात फुशारकी असते. असो. सध्याच्या स्थितीत जीव जगवणे महत्त्वाचे की परीक्षा देणे? अर्थातच जीव जगवणे हेच उत्तर येईल.

आता तर गुगलवर हवं तेव्हा, हवी तेवढी माहिती मिळते. मग संशोधन करणे, नवनिर्मिती करणे याऐवजी घोकंपट्टी करण्यात आयुष्याची किती वर्षे घालवायची? डिग्री मिळाली की नोकरी लागतेच असं नाही, पण या पदवीधराला जगण्यासाठी आवश्यक छोटी छोटी कामे करण्याची लाज का वाटावी? हे शिक्षणाचे महत्त्व असे कसे असू शकते? वडिलोपार्जित शेती किंवा इतर धंदा करण्याचाही कमीपणा वाटतो. ग्रॅज्युएट मुलींना शेतकरी नवरा नको असतो किंवा शहरातील नोकरी करणाराच हवा असतो. हेच आपलं शिक्षण म्हणायचं का? हे माझं (कदाचित अडाणीपणाचं ) वैयक्तिक मत आहे. कारण मला माणसाचा जीव, त्याचं जगणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कुठल्या आईबापाला वाटेल आपल्या मुलाला संसर्ग व्हावा? कोविड-19 संकटामुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे पालकांची अस्वस्थता वाढली आहे. पण सद्यस्थितीत दुसरा पर्याय तरी कोणता आहे? या सगळय़ा पार्श्वभूमीवर जे काही सुचले ते येथे मांडले.

—