
>> शैलेश माळोदे, [email protected]
ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ सुनिता नारायण. दिल्लीच्या राष्ट्रीय पर्यावरण केंद्राच्या महासंचालक असलेल्या सुनिता पर्यावरण, वाघ, वन्यप्राणी वाचविण्यासाठी अथक कार्यरत आहेत.
राजस्थानातील अलवर जिह्यातील अरवली पर्वत रांगांच्या हिरवाई कमी झालेल्या, हरयाणाच्या सीमेपासून अवघ्या 300 मीटर आत असलेल्या बेचक्यात हरित इमारती कशा असाव्यात याचं एक रोल मॉडेल अनिल आगरवाल एन्व्हायर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट उभं आहे. या संस्थेच्या सध्या महासंचालकपदी कार्यरत असलेल्या सुनिता नारायण या पर्यावरणतज्ञ, योद्धय़ा महिलेशी एक प्रदीर्घकाळ चर्चा करण्याची संधी लाभली. गेली दहा-अकरा वर्षांची प्रत्यक्ष ओळख असूनही वैज्ञानिक, व्यक्ती, पर्यावरणवादी अशा विविध पैलूंचं व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि 2005 साली पद्मश्री प्राप्त झालेल्या सुनिता नारायण यांचं व्यक्तिमत्त्व मात्र आता पूर्णपणे उलगडता आलं.
पर्यावरणतज्ञ आणि लेखक म्हणून आपल्या संशोधन आणि लेखनाचा फायदा लोकांना करून देण्यासाठी त्यांनी अगदी अविरत प्रयत्न केले आहेत. 2005 साली पद्मश्रीबरोबरच त्यांना जगातील अत्यंत मानाचं असलेलं ‘वर्ल्ड वॉटर पारितोषिक’ जे स्टॉकहोम प्राईझ म्हणूनही ओळखलं जातं. देश-परदेशातील अनेक विद्यापीठांशी मानद डी. एससी. पदवी प्रदान केलेल्या सुनिताताईचं करीअर 1982 साली सीएसईत संस्थापक पर्यावरणतज्ञ कै. अनिल अग्रवाल यांच्याबरोबर संशोधन सहाय्यक म्हणून सुरू झालं. अनिल अग्रवाल हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि कमिटेड पर्यावरणतज्ञ होते. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा मला माझ्या संपूर्ण करीअरमध्ये झालाय. आम्ही सर्वप्रथम देशातील पर्यावरणाचा आढावा घेणारा अहवाल 1985 साली प्रकाशित केला. त्यामधून देशातील गरिबांच्या दृष्टीने पर्यावरण किती महत्त्वाचं असतं ते आम्ही दाखवू शकलो असे सांगत सुनिता नारायण म्हणाल्या की, संशोधनातून लोकजागृतीचं काम व्हायला हवंच, पण अनेक ‘वर्केबल मॉडेल्स’ही लोकांपुढे यावेत या दृष्टीनेच आम्ही जे बोलतो ते प्रत्यक्ष दर्शविण्यासाठी अनिल अग्रवाल एन्व्हायर्नमेंट इन्स्टिटय़ूट आम्ही स्थापन केलं.
‘शाश्वत विकासाचा मुद्दा असो वा हवामान बदलाचा. परिसरातील वाघ नाहीसे होण्याचं रहस्य असो वा देशातील स्वच्छतेचे प्रश्न. अन्न सुरक्षेची बाब असो वा दिल्ली आणि इतर मोठय़ा शहरातील प्रदूषणाचा मुद्दा सर्वच बाबतीत मला खूपच प्रकर्षानं वाटतं की आपण उत्तर शोधताना गरिबांच्या दृष्टीनं विचार करून प्रत्यक्ष कृतीचं रोल मॉडेल ठेवायला हवं. त्यासाठी आपली लोकशाही जागतिक स्तरापासून अगदी ग्रामस्तरापर्यंत एकाच पातळीवर असायला हवी, असं त्या अगदी आवर्जून म्हणाल्या.
सुनिता नारायण या केवळ ऍकॅडमिक पर्यावरणतज्ञ नाहीत. त्यांना 2005 साली केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या विशेष व्याघ्र फोर्सच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलं होतं. त्याबाबत त्या म्हणाल्या, ‘मी प्रथम बैठकीस गेले तेव्हा तिथे उपस्थित वन्यजीव तज्ञांना वाटलं की, हिचा वाघांशी काय संबंध. हिने तर वाघ बघितलाही नाही, परंतु हेच माझं बलस्थान होतं. त्या अनुषंगाने मी लोकांना आणि वाघांना एकमेकांच्या बरोबर जगणे शक्य व्हावं यासाठीचे अध्ययन करून शिफारशी करू शकले. प्रत्येक प्राण्याला आणि मनुष्यालाही चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. म्हणूनच त्यांनी 2002 साली हिंदुस्थानच्या पर्यावरणविषयक अहवालाचा खास विषय ‘एक्सक्रिटा मॅटर्स’ असा घेतला. त्यात हिंदुस्थानमधील मलविसर्जन आणि निःस्सारणविषयक विविध प्रश्नांचा सामाजिक, वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टीने विश्लेषण करण्यात आलंय.
शीतपेयांतील कीटकनाशकांच्या प्रमाणामुळे आरोग्याची समस्या प्रथमच मोठय़ा प्रमाणात चर्चेत आली. त्यासाठी सुनिताजींचा करारीपणा आणि प्रचंड बौद्धिक श्रम आणि शास्त्र्ााrय संशोधनाचा वाटा आहे. वायुप्रदूषण हा एक अत्यंत गंभीर मुद्दा असून त्यामुळे श्वसन प्रणालीचं मोठं नुकसान होऊन मृत्यूला आमंत्रण दिलं जातं. सुनिता नारायण यांनी सीएसईतील त्यांच्या सहकाऱयांसह वायुप्रदूषणाला अटकाव करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मते प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांवर उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेतून पाश्चिमात्य जगातील प्रगतीचं प्रारूप बदलतेय. आज आपल्याकडे बेडूकउडी मारत (लीप फ्रॉगिंग) विकसित तंत्रज्ञानांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातूनच आम्ही दिल्लीतील बसेससाठी सीएनजी वापराचा पर्याय सुचविला तो खूपच यशस्वी ठरलाय. त्यांना सध्या सर्वोच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पर्यावरण संरक्षण कायद्याची नीट अंमलबजावणी करण्यासाठी गठीत प्राधिकरणाच्या सदस्यपदी नेमण्यात आलेय. त्याबरोबरच अनेक शहर आणि नद्यांच्या प्रदूषणावरही त्या लक्ष ठेवून आहेत.






























































