जुन्या,नव्याचा संगम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिबानी जोशी

जयंत सावरकर ज्येष्ठ नाटय़कर्मी. स्वतःची भूमिका असलेले जुने नाटक ‘वाजे पाऊल आपुले’ पुन्हा नव्या रूपात दिग्दर्शित करीत आहेत.

विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले, 50 वर्षांपूर्वी खूप गाजलेले, ‘वाजे पाऊल आपुले’ हे नाटक साहित्य संघाकडून पुन्हा रंगभूमीवर अवतरत आहे. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ हे एकेकाळी नाटय़ चळवळीत केंद्र होते. नाटय़ शाखेत जयंत सावरकर यांची उपाध्यक्षपदी गेल्या महिन्यातच नियुक्ती झाली. याशिवाय प्रमोद पवार कार्यवाह म्हणून गंगाराम गवाणकर, माधव खाडिलकर, रजनी जोशी अशी नाटय़वेडी मंडळी नाटय़ शाखेत आली आहेत. जयंत सावरकर यांनी मूळ ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकात भूमिका केली होती. फक्त भूमिकाच नाही, तर नाटकाच्या निर्मितीच्या प्रसूतिकळांपासून ते नाटकाशी संबंधित होते. विश्राम बेडेकर यांच्या हाताखाली त्यांनी अडीच वर्षे काम केले. त्यावेळी हे नाटक कसे लिहिले, त्यानंतर रिहर्सल, बॅकस्टेजची कामं, सुवाच्य अक्षरांत हिशेब लिहिले व शिवाय अभिनय अशा सर्व गोष्टी सावरकरांनी या नाटकासाठी केल्या होत्या. त्यामुळे संघातर्फे हे नाटक पुनरुज्जीवित करण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती संघात मान्यही केली. 1967 साली हे नाटक आले तेव्हा तुफान चाललं. त्याचे 100 प्रयोग होऊन ते थांबले. दाजी, दामू केंकरे, मंगलाताई, सतीश दुभाषी, अरविंद देशपांडे व जयंत सावरकर अशी मल्टिस्टारकास्ट त्यावेळी या नाटकात होती.

नाटकाचा विषय साधासोपा, रसाळ भाषेत नाही. नाटकाचा बेस ‘इनोसन्स’ आहे. संशय घेण्यावरून झालेली गंमत यात हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. संशय घेण्याच्या जागा प्रेक्षकांना या काळातही भावणाऱया आहेत आणि संशय हा कालातीत असल्यामुळे सध्याच्या पिढीला तो चविष्ट वाटणारा आहे. हल्लीच्या रसिकांना हवे तसेच दोन अंकांत, सवा दोन तासांत हे नाटक बसविण्यात आले आहे. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर ते नक्की चालेल असं वाटल्यामुळे सावरकर यांनी हे नाटक पुन्हा करायचं ठरवलं व संघाने पण त्यांना होकार दिला. नाटकाचे दरही कमी ठेवायचे त्यांनी ठरवले आहे.

दीड-दोन महिने रिहर्सल केल्या. अभिजित चव्हाण, शर्मिला तळवलकर असे सध्या मालिकांत गाजत असलेले कलाकार यात काम करीत आहेत. नाटक चांगले चालले, अनेकांनी पाहिले तर हलकं फुलकं मनोरंजन तसेच उत्तम भाषा संस्कारही त्यांच्यावर होतील असे त्यांना वाटते. मूळ नाटकाची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया, तालमी प्रत्यक्ष पाहिलेले सावरकर स्वतः नाटकाचे दिग्दर्शनही करीत आहेत व पूर्वी केलेला रोलही करीत आहेत. जुन्या-नव्याचा संगम आवडला तर भविष्यातही साहित्य संघाच्या नाटय़ शाखेतर्फे अजूनही नाटक काढण्याचा संघाचा विचार आहे. पाहूया, नाटक व संघाची नाटय़ शाखा पुन्हा वाजते का? नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होतील.