शिरीषायन – मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी : 13

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

आमच्या काळची गोष्ट (आता काळ ओढवलाय, भेडसावतोय व खायला उठलाय.) दर बुधवारी कुठल्या तरी रोटरी क्लबची ताज हॉटेलला ‘लंच मीटिंग’ असायची. कोणीतरी पाहुणा बोलावला जायचा. जेवण अंगावर येऊन पेंग येत असताना पाहुण्याचं भाषण ऐकायचं. इतरांनी ऐकलं नाही तरी चालून जात होतं. आम्हाला मात्र ऐकावंच लागे. कारण ते भाषण ‘कव्हर’ करण्यासाठीच आम्हाला मुळात पाठवलेलं असायचं. अन्य निमंत्रितांत व आमच्यात एकच प्रमुख फरक होता. जेवणानंतर एक बॉक्स फिरवला जायचा. निमंत्रित त्यात नोटा टाकत. हा बॉक्स आमच्या टेबलापाशी यायचाच नाही. (उगीच बॉक्स पुढे करून नाक मुरडून घेणं कशाला!) आम्ही त्या शाही जेवणाच्या बदल्यात एक रुपयाची नोट टाकू असं एकाही रोटरीवाल्याला वाटत नसे. अमूक एक ‘प्रेस’ची पाटी ठेवलेल्या टेबलावर बसलेल्यांना फुकट जेवू द्यायचं असा अलिखित संकेत होता. आम्ही निःसंकोचपणे चरायचो. आमचा चीफ रिपोर्टर बी.एस.व्ही. राव डायरीत आमचे कार्यक्रम लिहिताना तो चक्क ‘खाने को जाव’ अशी नोंद करायचा. आमच्या भूमिकेविषयी आमच्याप्रमाणेच त्याच्याही मनात संदेह नव्हता. जेवण झाल्यावर एका ट्रॉलीवरून आइसक्रीमची भलीमोठी शिळा फिरायची – वळूस्पर्धा जिंकलेला वळू गावातून फिरवतात त्याप्रमाणे. वायंगणकर नावाचे ज्येष्ठ पत्रकार तिथं असायचे. आइसक्रीमची शिळा येताना दिसली की शहारत ते म्हणत, ‘दॅट ड्रेडकुल थिंग हॅज कम.’ (ती भयावह गोष्ट आली!)

अशाच एका रोटरीच्या ‘लंच मीटिंग’ला ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंग प्रमुख पाहुणे होते. खुशवंत सिंग या नावाला विलक्षण ग्लॅमर होतं. ‘इलस्ट्रेटेड वीकली’च्या संपादकपदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यासाठी ते दिल्ली सोडून मुंबईला आले होते. खुशवंत सिंग ‘इलस्ट्रेटेड वीकली’चा पूर्णपणे कायापालट करतील, स्वरूप बदलून टाकतील, विनोदाची खमंग फोडणी देतील व एकूणच जागोजाग ‘खुशवंत टच’ दिसेल अशी अपेक्षा होती. खुशवंत सिंगमुळे असू शकेल, पण आज पत्रकारांची उपस्थिती थोडी जास्तच होती. (मग काय झालं? जेवण सगळय़ांनाच फुकट होतं.) वायंगणकरांना आइसक्रीम पुरलं असतं ना? त्यांचा सगळय़ात मोठा स्पर्धक मीच होतो म्हणा.

जमलेल्या उपस्थितांत पाचसात रुबाबदार, सुटाबुटातले सरदारजी होते. माझ्या मनात विचार आला की यातलेच कोणी खुशवंत सिंग असतील का? ओळखणार कसा? मी त्यांना त्यांच्या लेखणीनं ओळखत होतो. त्यांचा फोटो पाहिला नव्हता.

मी विचारात गढलो असताना एक ओंगळ दिसणारा, दाढी फिस्कारलेला, अंगात मळलेला मच्छरदाणीच्या कापडाचा वाटावा असा बनियनसमान काहीतरी घातलेला माणूस बावळटासारखा आमच्या टेबलापाशी उभा होता. तोही सरदार होता.

‘मी बसू का इथे?’ त्यानं नम्रपणे मला विचारले.
जनरली मी त्याला धुडकावून व पिटाळून लावलं असतं. कोणी लुंगासुंगा ‘प्रेस’च्या टेबलावर कसा बसू शकतो? फुकट जेवण मिळतं म्हणून येऊन बसाल की काय? शिवाय आइसक्रीमला आणखी एक वाटेकरी. मी काही न बोलता त्याच्याकडे निषेधाचा कटाक्ष टाकत होतो. येणारा प्रत्येक पत्रकार भुवया उंचावून मला खुणेनं ‘हा कोण?’ असा प्रश्न विचारीत होता. मीही ओठ काढून ‘काय माहीत’ असं उत्तर देत होतो. थोडय़ा वेळानं कोणतरी आमच्या टेबलापाशी आलं आणि त्या गबाळय़ा सरदारजीला म्हणालं, ‘तिकडे चला नं.’

‘आय ऍम हॅपी विथ माय फ्रॅटर्निटी…’ सरदारजी ऐकू येईल न येईल अशा आवाजात म्हणाला. पण मला बरोबर ऐकू आलं. माय फ्रॅटर्निटी? म्हणजे तो माणूस स्वतःला आमच्या बिरादरीतला म्हणवून घेत होता. मुंबईत कोणी सरदारजी रिपोर्टर असल्याचं मी ऐकलं नव्हतं. नाही म्हणायला ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये एक बलजीतसिंग परमार होता, पण त्यानं दाढी व फेटा यांना फाटा दिला होता. हे बेंगरूळ ध्यान ‘फ्रॉड’ वाटत होतं. आम्हा पत्रकारांत अस्वस्थता निर्माण झाली होती. संयम सोडून कोण प्रथम बोलतंय एवढाच प्रश्न होता. मी जीभ परजतच होतो तेवढय़ात रोटरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सगळा लवाजमा आला. अदबीनं त्यांनी त्या माणसाला स्टेजवर चलण्यास सांगितले. आमचे आभार मानून तो निघाला.

मी आ वासून बघत राहिलो. सहपत्रकारांच्या प्रतिक्रिया नोंदवण्याचं मला भान नव्हतं. रीवाइंड करून मी माझ्या मनातील त्याच्याविषयीचे विचार पुनःपुन्हा ऐकत होतो. शरमेनं माझी मान खाली गेली. दिसण्यावरून व अंगातील कपडय़ांवरून माणूस जोखणार…?

पुढे नंतर कधीतरी खुशवंत सिंग यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटण्याचा प्रसंग माझ्यावर ओढवला. मी मनाशी एकच प्रार्थना करीत होतो, ‘देवा खुशवंत सिंग मला ओळखू दे नको.’

पण त्यांनी बघता क्षणी ओळखलं. (देव गाढवांना क्षमा करीत नाही.) ‘वी हॅव मेट बिफोर द ऍट रोटरी मीटिंग.’ ते प्रसन्नपणे म्हणाले.

‘टाइम्स’च्या चौथ्या मजल्यानं दुभंगून मला पोटात घेतलं नाही.

– [email protected]