शिरीषायन – पुरुषांतली लता मंगेशकर

>> शिरीष कणेकर

महान संगीतकार अनिल विश्वास एकदा बोलून गेला, ‘महंमद रफीचा आवाज भेंडी बाजारातल्या कव्वालासारखा आहे.’

अजिबात स्तुतिपर नसलेल्या या विधानानं रान पेटवलं. एका झटक्यात त्यानं तमाम संगीतप्रेमी देशवासीयांच्या शेपटावर पाय दिला. साक्षात रफी भेंडी बाजारातला कव्वाल? रफीच्या अवघ्या कर्तृत्वाची या दोन शब्दांत वासलात?

अनिलदा कितीही मोठा संगीतकार असला तरी लोकप्रियतेत तो रफीच्या पासंगाला आला नसता. या विधानानंतर बहुसंख्य वाचकांच्या लेखी ‘तो रफीविषयी काहीबाही वेडंबिद्र बोलला होता तोच ना’ हीच अनिल विश्वासची ओळख राहिली. उपमा जरा अतिशयोक्तीची असेल, पण अनिलदाच वक्तव्य सूर्यावर थुंकण्यासारखं होतं.

अनिलदाला गुरू मानणारे सी. रामचंद्र प्रत्येक वेळेला माझ्या समोर रफीचा उल्लेख ‘बिनडोक गायक’ असा करीत. या हिणकस, अपमानास्पद व बदनामीकारक बिरुदाशिवाय अण्णा रामचंद्र रफीविषयी कधी बोलायचेच नाहीत.

काय प्रकार आहे हा? सी. रामचंद्रच्या ‘नौशारवाने आदिल’ (साल 1957) मध्ये ‘तारों की जुबांपर’ व ‘भूल जाये सारे गम’ या लताबरोबरच्या द्वंद्वगीतांत व ‘ये हसरत थी’ या ‘सोलो’ गाण्यात महंमद रफी कुठे तसूभर तरी कमी पडलाय का? मग सी. रामचंद्रना रफीच्या डोक्याचं माप कुठं काढता आलं? ते तडकाफडकी बोलून दाखवण्यापूर्वी थोडा सबुरीनं विचार करावा असं त्यांना का वाटलं नाही? अर्थात प्रत्यक्ष लता मंगेशकरला ‘केवळ चांगला टेप रेकार्डर’ म्हणण्यापूर्वी त्यांनी कुठं सबुरीनं विचार केला होता?

संगीतकाराचं मत पटलं नाही म्हणून तो संगीतकार छोटा ठरत नाही (पक्षी ः अनिल विश्वास व सी.रामचंद्र) व संगीतकाराचं मत पटलं तेवढय़ावरून तो संगीतकार महान होत नाही. समझे के नही?

नौशादपासून ओ.पी.नय्यरपर्यंत, एस.डी.बर्मनपासून चित्रगुप्तपर्यंत, गुलाम महंमदपासून शंकर-जयकिशनपर्यंत, एन.दत्तापासून रोशनपर्यंत, हुस्नलाल – भगतरामपासून दत्तारामपर्यंत, आर.डी.बर्मनपासून कल्याणजी – आनंदजीपर्यंत, एस.एन.त्रिपाठीपासून बुलो सी. राणीपर्यंत, नौशादपासून स्नेहल भाटकरपर्यंत, सलील चौधरीपासून वसंत देसाईंपर्यंत, जयदेवपासून ए.आर.कुरेशीपर्यंत, लच्छीरामपासून धनीरामपर्यंत, श्यामसुंदरपासून महंमद शफीपर्यंत, सरदार मलिकपासून एस. मोहिंदरपर्यंत, मदन मोहनपासून हंसराज बहेलपर्यंत, सर्वांच्या रेकॉर्डिंग रूममधून रफी अत्तरासारखा दरवळलाय. काही काळ मतभेदांमुळे लता रफीबरोबर गात नव्हती तेव्हा काही संगीतकारांनी साक्षात लताला बाजूला सारले व रफीच्या जोडीला अन्य गायिका आणली. रफीची लोकप्रियता व स्थान दाखविण्यासाठी यापेक्षा वेगळ्या व अधिक प्रभावी उदाहरणाची गरज नाही.

‘प्लेबॅक सिंगर्स असोसिएशन’मध्ये संगीतकारांप्रमाणेच गायक व गायिकांना त्यांच्या गाण्याची रॉयल्टी मिळावी या मुद्दय़ावरून रफी व लता यांच्यात जुंपली. रफीच्या मते त्यांना भरपूर पैसे मिळतात; आणखी वर रॉयल्टी कशाला? लताच्या मते त्यांचा प्रश्न नव्हताच; अन्य छोटय़ा मोठय़ा गाणाऱयांना व कोरसमध्ये असणाऱयांना रॉयल्टी मिळायला हवी. शब्दानं शब्द वाढत गेला. रफी छद्मीपणे मुकेशला म्हणाला, ‘जाहीर है के आप तो महारानी के साथ ही होंगे.’

यावर मुकेश काही बोलण्याआधीच लता विलक्षण फणकाऱयानं म्हणाली, ‘मै हूँ ही महारानी, लेकिन उससे आपको क्या फरक पडता है?’
सूरसम्राज्ञी व सूरसम्राट यांच्यातील हे बेसूर भांडण होतं. परिणामी काही काळासाठी ते दुरावले. लताबरोबर कोणी दुसरा गायक गायला. रफीबरोबर कोणी दुसरी गायिका गायली. त्या दोघांचं काय नुकसान झालं असेल ते असेल, पण रसिक श्रोत्यांची मात्र अपार हानी झाली.

अखेर हा तिढा सुटला. त्या दिवशी रफी रेकॉर्डिंगला आला तोच आनंदानं नाचत. त्यानं जाहीर केलं, ‘लता से सुलाह हो गयी. अब गाने मे मजा आएगा’…
मन्ना डे मला एकदा म्हणाला होता, ‘मी गायचो ते रफी व किशोर आरामात गायचे. मात्र ते गायचे तसे गाणे मला शक्य नव्हते. साहजिकच त्यांच्या स्पर्धेत मी मागे पडलो.’ बडे दिलवाला बंगाली!

महंमद रफी म्हणजे ‘पुरुषांतली लता मंगेशकर’ (लताला हे कितपत रुचलं असतं शंकाच आहे). नरडय़ाला ‘अवघड’ हा शब्द मान्य नाही. ‘अशक्य’ हा शब्द ऐकलेलाच नाही. भजनापासून कव्वालीपर्यंत, गझलेपासून गीतापर्यंत, लाईट क्लासिकलपासून शब्दविभ्रम करणाऱया चावट गाण्यापर्यंत काय वाट्टेल ते गायला सांगा ना. गळा म्हणजे अल्लातालाचा तोहफा. सर्वार्थानं कॉस्मोपॉलिटन. सर्व मांडीला मांडी लावून गुण्यागोविंदानं नांदतात. वानगीदाखल ही गाणी घ्या – ‘तेरे भरोसे नंदलाला’ (भक्तिपर) ‘नाचे मन मोरा’ (शास्त्र्ााsक्त), ‘सर जो तेरा चकराए’ (नटखट), ‘हम बेखुदी मे’ (गझल), ‘न तो कारवा की तलाश है’ (कव्वाली), ‘पुकारता चला हूँ मै’ (रोमँटिक), ‘ओ दूर के मुसाफिर’ (प्रेमविव्हल), ‘टकरा गया तुमसे’ (दुःखी), ‘सुनो सुनो मिस् चॅटर्जी’ (हास्यप्रधान)…

नौशाद, दिलीप कुमार व महंमद रफी यांना एकत्र आणणारं ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ हे ‘कोहिनूर’मधलं गाणं माझं सर्वात लाडकं आहे. तुमचं काय? व्हॉट अबाऊट यू?…

[email protected]