
>> सुरेश जाखडी
16 डिसेंबर ‘उत्सव पुरवणी’तील ‘साहित्य कट्टा’ सदरात प्रतीक पुरी यांचे ‘प्रकाशकाच्या शोधात लेखक या विषयावरील विचार वाचले. लेखकांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल ‘सामना’चे आभार. तथापि नवोदित लेखक आणि पुस्तक प्रकाशन यावर स्वतंत्रपणे विचार होऊन नवोदित लेखकांच्या व्यथा सर्वांना समजल्या पाहिजेत. प्रकाशकांच्या दृष्टिकोनातून विचार करता सुमार लेखन करणाऱया लेखकांना प्रकाशकांनी प्रमोट करण्याची आवश्यकता नाही. असे असले तरी आज जीवनानुभव असलेले अभ्यासू व प्रतिभावान नवोदित लेखक आपल्याला साहित्य क्षेत्रात संधी मिळेल म्हणून धडपडत आहेत हेही तितकेच खरे आहे.
16 डिसेंबर ‘उत्सव पुरवणी’तील ‘साहित्य कट्टा’ सदरात प्रतीक पुरी यांचे ‘प्रकाशकाच्या शोधात लेखक’ या विषयावरील विचार वाचले. लेखकांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल ‘सामना’चे आभार. तथापि नवोदित लेखक आणि पुस्तक प्रकाशन यावर स्वतंत्रपणे विचार होऊन नवोदित लेखकांच्या व्यथा सर्वांना समजल्या पाहिजेत. प्रकाशकांच्या दृष्टिकोनातून विचार करता सुमार लेखन करणाऱया लेखकांना प्रकाशकांनी प्रमोट करण्याची आवश्यकता नाही. असे असले तरी आज जीवनानुभव असलेले अभ्यासू व प्रतिभावान नवोदित लेखक आपल्याला साहित्य क्षेत्रात संधी मिळेल म्हणून धडपडत आहेत हेही तितकेच खरे आहे. याउलट सुमार लेखकांना आपण प्रगल्भ लेखक असल्याचा साक्षात्कार होत असेल तर प्रकाशकांनी हस्तलिखाणाची पत ओळखून त्याला दूर ठेवले तर ते आपण समजू शकतो. पण खरोखर प्रतिभेतून, जीवनानुभवांतून जे लेखक काही तरी चांगले देऊ पाहतात त्यांना प्रकाशकांनी प्रकाशात आणले पाहिजे.
या प्रतिभावान कल्पक नवोदित लेखकांनी पुस्तक तयार करण्यासाठी भरपूर श्रम घेतलेले असतात. पुस्तकाची हस्तलिखित प्रत तयार झाल्यावर या नवोदितांच्या अंगी अभिमन्यूचे बळ असावे लागते. कारण त्याला प्रकाशक, मुद्रक, वितरक, पुस्तक विक्रेते इत्यादींच्या चक्रव्यूहातून पार जावे लागते. नवोदित लेखकांच्या पुस्तकांना मागणी नसते, त्यांच्या पुस्तकांचा खप होत नाही या सबबी सांगून प्रकाशक नवोदित लेखकांना डीटीपी वा पुस्तक छपाईचा खर्च करायला सांगतात. पुस्तक बाजारात प्रकाशकाला चांगले नाव असेल तर ते नाव वापरण्यासाठी प्रकाशक शे-दोनशे प्रती फुकट मागतात. पुढे नवोदित लेखकाला मुद्रक, प्रकाशक, वितरक यांच्या तावडीतून सहीसलामत सुटावे लागते. अखेरीस आपले पुस्तक आपण छापून आपणच प्रकाशित करावे असे नवोदित लेखकाला वाटू लागते, परंतु या गोष्टींचा अनुभव नसल्याने त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मुद्रकांत स्पर्धा असते, पण त्याचा फायदा ग्राहकाला मिळत नाही. मुद्रक जरी अनेक असले तरी मुद्रकांची संघटना असते आणि लेखक त्यांच्यासमोर एकटा पडतो. मुद्रक संघाच्या दरमहा बैठका होतात. त्यात मुद्रण व्यवसायाचे फायदेशीर दर ठरतात. मुद्रक गाडीतून फिरतो, पण लेखकाला पायी फिरावे लागते. त्यामुळे छपाईचे दर कुठेही कमी नसतात. आता तर छपाईचे दर घासघीस करून ठरवले तरी त्यावर 18 टक्के ‘जीएसटी’ लेखकालाच भरावा लागतो. पुस्तकासाठी वापरावा लागणारा कागद, कव्हरपेज डिझाइन, त्याची जाडी, पुस्तकाची बायडिंग पद्धत, छपाईचे प्रकार इत्यादींची सामान्य माणसाला माहिती नसते. दोन पैसे वाचवायला गेलेला नवोदित लेखक त्यात फसतो आणि एकंदर पुस्तकाचा बाह्य दर्जा घालवून बसतो. त्याचप्रमाणे निर्दोष छपाई, शुद्धलेखनाचे छपाई दोष यांची जबाबदारी लेखकाला घ्यावी लागते.
हे सर्व सांभाळून निर्दोष छपाई गृहीत धरून नवोदित लेखक पुस्तकाच्या एकंदर पृष्ठसंख्येवरून पुस्तकाची किंमत ठरवतो. नवोदित असल्याने व पुस्तकाचा खप व्हावा या विचाराने लेखकाला पुस्तकाची किंमत कमी ठेवण्याकडे कल असतो. अशा वेळी पुस्तकाच्या प्रमोशनसाठी लेखक स्वतःच पुस्तक प्रकाशन समारंभ करायचे ठरवतो. काही मान्यवर समारंभाला येण्यासाठी व भाषण करण्यासाठी भरमसाट मानधन मागतात. एक नवोदित लेखक आपल्या समुदायात येऊ पाहत आहे. तेव्हा आपण मानधन कमी घेऊन त्याला प्रोत्साहन द्यावे, असा समंजस विचार हे मान्यवर करीत नाहीत. मानसन्मानासाठी व मानधनासाठी ते हटून बसतात. लेखकाने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी जरी 70-80 पुस्तके विकली गेली तरी या पैशातून पाहुण्यांचे मानधन, त्यांचा प्रवास खर्च, हारतुरे, शाल-श्रीफळ, खुर्च्यांचे भाडे, अल्पोपहार इत्यादींचा खर्चही त्यातून निघत नाही. हा कारभार तोटय़ाचा असतो.
पुस्तक बाजारात आणण्यासाठी वितरक 50 पासून ते 70 टक्क्यांपर्यंत कमीशन मागतात. पुस्तक विक्रेतेही 40 टक्के कमीशन मागतात आणि तेही सर्व पुस्तके विकली गेल्यावर केव्हा तरी वर्ष-सहा महिन्यांनी हिशेब करतात. वितरक व विक्रेत्यांना एवढे कमीशन दिल्यावर मिळणाऱया पैशांतून डीटीपी व छपाईचा खर्चही निघत नाही. त्यावर त्यांचे म्हणणे असे असते की, लेखकाने पुस्तकाची किंमत ठरवताना हे कमीशन गृहीत धरून ती ठरवावी.
नवीन पुस्तक बाजारात येण्याच्या वेळी त्याची परीक्षणे वृत्तपत्रांतून येणे आवश्यक असते, पण तसे होत नाही. त्यात पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवलेले असतेच असे नाही. परीक्षणात लेखकाचा, प्रकाशकाचा संपर्क नंबर देण्याची प्रथा नाही.
अशा रीतीने नवोदित लेखक सर्व बाजूंनी नाडला जातो. त्याच्या अंगच्या प्रतिभेच्या कळय़ा उमलण्याअगोदरच कोमेजून जातात. असे होऊ नये यासाठी प्रथितयश प्रकाशकांनी नवोदित लेखकांना खास मार्गदर्शन करावे.




























































