रावसाहेब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

देही असूनही विदेही असे श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातल ‘सिद्धसत्पुरुष’ श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे यांच्याविषयीचा हा लेख.

‘देही असून विदेही’, ‘आमचा उपदेश वेड लावून घेण्याचा आहे; पण आज वेडा होण्यास कुणीही तयार नाही’ असे श्रीबीडकर महाराज म्हणत असत. मात्र त्यांचा हा उपदेश रावसाहेबांनी भविष्यात खरा करून दाखवला. रावसाहेबांच्या अलौकिक साधनेला या संसारी जगताने कधी ओळखलेच नाही. भोवतालची मंडळी त्यांना भ्रमिष्ट समजत असत. ज्या कुणाला रावसाहेबांच्या या वेडामागचे रहस्य कळले त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत होती. रावसाहेबांची वृत्तीदेखील त्यांचे गुरू, श्रीबीडकर महाराज यांच्याप्रमाणेच प्रसिद्धीपराङ्मुख होती.

‘प्रपंच साधून परमार्थ करावा’ या गुरू-उपदेशाचे पालन करण्यासाठी, संसाराविषयी उदासीन आणि अध्यात्माकडे आकृष्ट झालेल्या रावसाहेबांनी गुरुआज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. सन 1910मध्ये त्यांचा विवाह ‘जुन्नर’कर विष्णुपंत बोडस यांची कन्या दुर्गाबाईंसोबत झाला. नोकरीच्या निमित्ताने रावसाहेबांना अनेकदा बाहेरगावी जावे लागत असे. रत्नागिरी, महाड, पनवेल, अलिबाग आणि मुंबई येथे त्यांचे काही काळ वास्तव्य झाले आणि दरम्यान ओव्हरसीअर, डे. इंजिनीअर, सुपरवायझर, पी.ए. टू चीफ आर्किटेक्ट टू गव्हर्नमेंट या विविध हुद्दय़ांवर त्यांनी काम केले. नोकरीत असताना वेळेवर जाणे आणि चोख काम करणे याकरिता जरी त्यांची ख्याती असली तरीही पुढे मात्र रावसाहेबांची वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागली. अधूनमधून ते देहभान विसरून आत्मानुसंधानाच्या अभ्यासात रंगून जात असत. कामावरील मंडळी रावसाहेबांची अवस्था समजून घेत असत. मात्र काही काळाने त्यांच्या सहकार्यालाही मर्यादा येत्या झाल्या.

श्रीबीडकर महाराजांचे रावसाहेबांवर निरतिशय प्रेम होते. श्रीमहाराज त्यांचा उल्लेख ‘रावसाहेब माझा मोतीदाणा’ असा करीत असत. अन्य शिष्यांना क्षुल्लकशा चुकीसाठी धारेवर धरणारे श्रीमहाराज रावसाहेबांवर मात्र क्वचित रागावत असत. श्रीमहाराजांचे कुटुंब अर्थात सौ. जानकीबाई (आईसाहेब) यांचे सन 1911मध्ये निधन झाले, तेव्हा भावनावश रावसाहेबांनी ‘आईसाहेब दाखवा’ असा श्रीमहाराजांकडे असामान्य हट्ट केला आणि श्रीमहाराजांनी त्यांना आईसाहेबांचे मरणोत्तर प्रत्यक्ष दर्शन घडवून त्यांची बालवृत्ती शांत केली. स्वतः रावसाहेब लहान मुलांवर अतिशय प्रेम करत असत. विवाहानंतर पाचेक वर्षांनी रावसाहेबांना मुलगा झाला. मात्र तो अपूर्ण दिवसांचा जन्मला अन् जन्मतःच गेला. त्यानंतर आप्तेष्टांच्या आग्रहामुळे त्यांनी नाग-नारायण बळी विधी केला. त्याचे फलित म्हणून त्यांना 1926 साली मुलगी झाली. या चिमाताईने रावसाहेबांच्या संसारात ‘आनंद’रंग भरला असला तरीही त्यांच्या आयुष्याला मात्र वेगळीच कलाटणी मिळाली.

नाग-नारायणबळी विधीनंतर रावसाहेबांमध्ये मोठे मानसिक स्थित्यंतर झाले. आत्मानुसंधानाचा अभ्यास पूर्णत्वाला जाऊन रावसाहेबांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. देहभान नाहीसे झाल्यामुळे त्यांचे वागणे इतरांना चमत्कारिक भासू लागले. कुणाला घरात येऊ न देणे, जाळ पेटविणे, त्यात रुपयांच्या कागदी नोटा टाकून जाळणे, कित्येक दिवस अन्नपाणी न घेता बसून राहणे या व अशा लोकविलक्षण वर्तनामुळे अखेर रावसाहेबांना मनोरुग्णालयात ठेवण्याची वेळ आली. तब्बल नऊ महिने ते मनोरुग्णालयात होते. त्यांच्या बोलण्यात असंबद्धता येती झाली. रावसाहेबांना आध्यात्मिकदृष्टय़ा उच्चतम अवस्था प्राप्त झाली असली तरी जगाच्या दृष्टीने ही वेडाची परमावस्था होती.

सौ. दुर्गाबाई बाळंतपणासाठी माहेरी जुन्नरला होत्या. मनोरुग्णालयातून बाहेर आल्यावर काही दिवस रावसाहेबही जुन्नरला राहिले आणि पुन्हा मुंबईस येऊन नोकरीवर रुजू झाले. पुढे वृत्ती अधिकाधिकच अंतर्मुख होऊ लागल्यामुळे रावसाहेबांना ऑक्टोबर 1928मध्ये इनव्हॅलिड पेन्शन देण्यात येऊन सेवामुक्त करण्यात आले. त्यानंतर रावसाहेब मुंबई सोडून पुणे येथे राहावयास आले. सन 1931पासून समाधिस्थ होईपर्यंत रावसाहेबांचा मुक्काम श्रीबीडकर महाराजांच्या मठाजवळ, धुमाळ बिल्डिंगमध्ये झाला. येथे आल्यानंतर रावसाहेबांचे अवघे जगणेच बदलले. सदैव डोळे मिटून स्वरुपानुसंधानात मग्न राहणारे रावसाहेब त्यांच्या खोलीच्या बाहेरही पडत नसत. स्नानादी कार्ये आणि भोजनासाठी त्यांना बळेबळे उठवावे लागे. पेन्शन घेण्याच्या अन् श्रीबीडकर मठातील उत्सवाच्या दिवशीच त्यांना बाहेर नेण्यात येत असे. त्यांचे हे लौकिकदृष्टय़ा विचित्र वागणे वाडय़ातील मंडळींना वेडसरपणाचे वाटत असे. मात्र जाणकार व्यक्ती त्यांचे अलौकिक महत्त्व ओळखून होत्या. रावसाहेबांनी त्यांचे खरे स्वरूप कधीही प्रकट केले नाही. त्यामुळे आपल्याकडे कुणी येऊच नये असे त्यांचे वर्तन असे.

रावसाहेबांच्या चमत्कारिक वागण्याने नातेवाईक दुरावले. पगाराऐवजी पेन्शन येत असल्याने नियमित उत्पन्नही घटले. अशा परिस्थितीत सौ. दुर्गाबाई यांनी नव्या घरातील रावसाहेबांच्या संसाराची जबाबदारी 11 वर्षे निगुतीने पार पाडली. शिवाय उपवर झालेल्या कन्येचा विवाह ठरविला. चिमाताईंचा विवाह वर्ध्याच्या खरे वकिलांशी 1942 साली संपन्न झाला. वर्षानुवर्षे शांतपणे संसाराचे कष्ट उसपणाऱया आणि विदेही पतीची एकनिष्ठतेने सर्वतोपरी सेवा करणाऱया सौ. दुर्गाबाईंची प्रकृती पुढे मात्र बिघडली आणि सन 1945मध्ये त्यांनी मृत्यू जवळ केला. रावसाहेबांचा गृहस्थाश्रम संपुष्टात आला. रावसाहेबांच्या संसारात पाऊल टाकल्यापासून सौ. दुर्गाबाईंना हवे तसे संसारसुख लाभले नाही. व्यावहारिक अपेक्षा न बाळगता संसारात येणाऱया बऱयावाईट प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन आत्मानुसंधानात मग्न पतीची मनोभावे सेवा करीत, वेळप्रसंगी त्यास एखाद्या बालकाप्रमाणे सांभाळीत, सर्व सांसारिक जबाबदाऱया दक्षतेने पार पाडीत त्यांनी रावसाहेबांचा गृहस्थाश्रम नीटनेटका अर्थात ‘धन्य’ केला. सिद्धसत्पुरुषाचे ‘पत्नी’पद भूषविणे हे सामान्य काम नाही आणि सौ. दुर्गाबाई निव्वळ असामान्य होत्या.

रावसाहेबांची विदेही स्थिती सौ. दुर्गाबाईंच्या मृत्यूनंतरही तशीच होती. मात्र त्यांच्यातील सिद्धपुरुषाचे वेगळेपण लोकांना जाणवू लागले. गौरवर्ण, उंचीपुरी देहयष्टी, विस्तीर्ण भालप्रदेश व भेदक दृष्टी लाभलेल्या रावसाहेबांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्यांचे बोलणे खणखणीत आणि स्पष्ट असले तरीही अनेकांना ते असंबद्ध वाटत असे. मात्र ते ज्याच्या संदर्भात असेल त्याला पटत असे. येणाऱया भक्तांना त्यांच्या व्यावहारिक वा पारमार्थिक प्रश्नांची, समस्यांची उत्तरे आपोआप मिळत असत. रावसाहेबांचे, विरक्ती अन् विशुद्ध चारित्र्याने नटलेले जीवन त्यांच्या भक्तांसाठी चिरंतन स्फूर्तिस्थान होते. त्यांच्या अवतारकार्याचे महत्त्व लोकांना समजून येण्याची स्थिती आता जवळ आली होती. (मध्यांतर)

– [email protected]