
>> विवेक दिगंबर वैद्य
स्वर्गस्थ देवदेवतांचा पृथ्वीतलावरील विवाहसोहळा मार्लेश्वरातील गावकऱयांच्या दृष्टीने अपूर्व आनंदोत्सवाचा भाग असतो. मार्लेश्वर यात्रा आणि विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून भाविकगण मोठय़ा संख्येने उपस्थित राहून विवाह सोहळ्याचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवतात.
मकर संक्रांतीच्या पुण्यपर्वानिमित्त श्रीदेव मार्लेश्वराच्या शिखरावर मोठी लगबग पाहावयास मिळते. या उत्सवाचे औचित्य साधून श्रीदेव मार्लेश्वर आणि साखरपा गावातील गिरिजादेवीचा विवाह अर्थात ‘कल्याणविधी’ थाटामाटात संपन्न होतो. स्वर्गस्थ देवदेवतांचा पृथ्वीतलावरील विवाहसोहळा इथल्या गावकऱयांच्या दृष्टीने अपूर्व आनंदोत्सवाचा भाग असतो. आपल्या आराध्यदेवतांच्या या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणारे पृथ्वीतलावरचे भक्तगण स्वर्गस्थ देवदेवतांच्या विवाहाचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरतात ही प्रतिवर्षी नवलाईची गोष्ट ठरते.
हळद लावण्यापासून विवाहानंतरचे साक्षी विडे भरण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम या विवाहाच्या अनुषंगाने पार पाडताना भक्तगण वेगळ्याच विश्वात रमलेले असतात. यात्रा आणि विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून भाविकगण मोठय़ा संख्येने उपस्थित राहून विवाह सोहळ्याचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवतात. उत्सवाची सुरुवात आणि सांगता आंगवली येथील मंदिरात होते. आंगवलीचे अणेराव उत्सवाचे मुख्य मानकरी असून त्यांच्या पाठोपाठ जंगम, नाभिक, चांभार ज्ञातीतील मानकरी सोबतच मारळचे अब्दागिरीवाले, बोंडये गावाचे परीट, मुरादपूरचे भोई, कोळवणचे ताशेवाले, गोठणे गावच्या करवल्या, मारळचे सावंत-मोकाशी, आंबवचे माने, भुजबळराव, आंगवलीचे कदम, नारकर, लाखण, मुरादपूरचे चोगले, बांडागळे आदी सर्व मंडळी या उत्सवातील महत्त्वाचे मानकरी असतात.
जाणकारांकडून सांगितल्या जाणाऱया आख्यायिकेनुसार मार्लेश्वर रस्त्यालगतच्या मुरादपूर गावात शंभूमहादेवाचे मूळ वास्तव्य होते. तेथून देव आंगवलीस आला आणि येथे त्याने आपल्या न्हावी व चांभार ज्ञातीतील भक्तांना साद घातली. पुढे न्हावी ज्ञातीतील भक्ताने या देवाला वारा घातला तर चांभार ज्ञातीतील भक्ताने देवाला उजेड दाखविला म्हणून पुढे त्या प्रकाशात रात्रीच्या वेळी शंभू महादेव सह्याद्रीच्या कडेकपारीत जाऊन विसावला तो अगदी आजतागायत तिथेच स्थापित आहे. अठराव्या शतकात शिकारीकरिता गेलेले आंगवलीचे सरदार अणेराव (साळुंखे) पाण्याच्या शोधार्थ फिरताना त्यांना गुहेचा आणि शंभूमहादेवाच्या अस्तित्वाचा शोध लागला. तेव्हापासून हा उत्सव येथे अखंड सुरू आहे. या उत्सवात आंगवली मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण देवाचा मूळ टोप येथे असल्याने देवाच्या विवाहापूर्वीचे सर्व मंगलविधी येथेच पार पडतात. भोगीच्या रात्री देवाला हळद लागते, घाणा भरला जातो आणि नवरदेव शंभूमहादेवाला छान सजविण्यात येते. पारंपरिक प्रथेप्रमाणे 13 ते 15 जानेवारी या काळात देवाचा मंडप घालून पताका लावून सोहळ्यास विधिवत प्रारंभ होतो.
विवाहाच्या आदल्या रात्री ठीक 12 वाजता श्रीदेवमार्लेश्वर नटून थटून आंगवली गावातून वाजंत्रीच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने शिखराकडे धाव घेतो. त्याच्या आधी आंबव आणि लांजा येथील दिंडी, देवरूखचा यजमान श्रीदेव व्याडेश्वर, वांझोळेगावची कावड आणि साखरप्याची नवरीमुलगी श्रीगिरिजादेवी सोबत मानकरी शेटय़े आणि वऱहाडी मंडळी लव्याजम्यासह शिखराच्या दिशेने निघतात. कल्याण विधीच्या निमित्ताने पहाटे नवरीला मागणी घालणे, बोलणी करणे, पसंती करणे, मानपानाचे विडे देणे हे मंगलविधीचे सोपस्कार पार पडले की मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मानकऱयांच्या साक्षीने, तसेच मंगलवाद्यांच्या गजरात विधिवत मंत्रोपचार, मंगलाष्टके म्हणून उपस्थित भक्तांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह श्रीगिरिजादेवीसह संपन्न होतो. विवाहानंतर तिळगूळ वाटला जातो. हे विहंगम दृश्य पाहण्यास लांबलांबून आलेले भक्तगण वधुवरांना आहेर करतात. लग्नाप्रीत्यर्थ आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतात. शिखरावर रात्री वधूकडील मंडळी वरपक्षाच्या वऱहाडींना मानाचे भोजन देतात. सर्व मंगलविधी पार पडल्यावर भाविक आपापल्या गावी परत जातात.
दुसऱया दिवशी श्रीदेव मार्लेश्वर वाजतगाजत मारळ नगरीत येतो. मानपानाची घरे घेऊन तो पहाटे आंगवली गावात प्रवेश करतो व दीड दिवसात कुठेही न थांबता रात्रंदिवस सर्व घरातून पूजाअर्चा करून घेतो. पुढे घरभरणीचा कार्यक्रम झाल्यावर पालखी मार्लेश्वर मंदिरात आली की तिची चाके आंगवलीचे जंगम पुजारी काढतात आणि त्यानंतर देव देवळात प्रवेश करतो. पालखी सभामंडपात आली की भक्तगण देवासमोर साष्टांग दंडवत घालतात. त्यानंतर मानपानाचे विडे व नारळ दिले जातात. शेवटी पालखीतून सर्व देव बाहेर काढून आंगवलीचे कदम मानकरी देवाला नारळाचे दूध व हळद लावून आंघोळ घालतात. देवरूखचे मठपती (पाटगाव) जंगम देवाची विधिवत पूजा करतात. त्यानंतर आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते. श्रीदेव मार्लेश्वर व श्रीगिरीजादेवी यांचा लग्नसोहळा ज्या पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो त्याचा समग्र वृत्तांत ‘आंगवली’चे ग्रामस्थ व अभ्यासक गजानन अणेराव (9833869597) यांच्याकडून प्राप्त झाला.
पृथ्वीवरील प्राणिमात्रांच्या जगण्याचा प्रवास जन्म आणि मृत्यू या दोन घटकांनी सांधलेला आहे. प्राणीजातीतील सर्वात बुद्धिमान आणि प्रगत अशा मर्त्य मानवप्राण्याचे जगणे-मरणे हे देखील निसर्गनिर्मितच मात्र माणसाला अन्य प्राण्यांपेक्षा जगण्याची ओढ आणि मृत्यूचे भय अधिक खुणावत राहते व यातूनच, त्याची सलगी ‘देव’ या संकल्पनेकडे झुकल्याचे पाहावयास मिळते. पालनपोषण करणारा विष्णू आणि संहार करणारा शिव अर्थात शंकर हे माणसाला अधिक प्रिय असणारे देव आहेत. त्यांची उपासना करून जगणे सुसह्य व्हावे आणि मृत्यू चांगल्याप्रकारे यावा याची तजवीज प्रत्येकजण करीत असतो आणि त्यासाठी तो साधना, उपासना, पूजाअर्चा या मार्गातून हरिहरांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्नही करीत राहतो. यातूनच उपास-तापास, कर्मकांडे, नवस-सायास यांची उत्पत्ती होते. आणि हे सर्वकाही करण्यासाठी उपयुक्त महिना म्हणजे ‘श्रावण’मास. उद्यापासून, पुण्यपावन आणि सर्वश्रेष्ठ असा श्रावणमास सुरू होत आहे. त्या अनुषंगाने, पुढील काही लेखांमध्ये श्रीशंभूमहादेवाच्या या ‘महाराष्ट्र नगरी’तील काही निवडक स्थानांचे माहात्म्य जाणून घेऊ. तोवर, हर हर महादेव !!!





























































