
>> आनंद बेंद्रे
हिंदू धर्मात व कृषीप्रधान हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग त्याला धार्मिक अधिष्ठान लाभलेले असो वा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असो, शेतात राबराब राबणारा तो आपला अन्नदाता बळीराजा आणि गाय या मूक पशूचे एक अतूट प्रेमळ नाते जडलेले असते. त्याच अनुषंगाने हे मौल्यवान गोधन वाचविण्यासाठी गोरक्षक शिवशंकर स्वामी गेली कित्येक वर्षे आपले गुरू मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सहकाऱयांसह पोलिसांच्या मदतीने गोरक्षणाची मोठी चळवळ राबवीत आहेत. आजपर्यंत त्यांनी 30 हजार गाई, एक हजार म्हशींची सुटका करवून 600 पेक्षाही अधिक कसायांवर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळेच अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊन यंदाच्या 2023 ‘शिवभूषण’ पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले आहे.
भाजीपाल्याने, पोत्यांनी गच्च भरलेला एक ट्रक जात असताना तो मोठय़ा अंदाजाने पाठलाग करून मोठय़ा युक्तीने, धाडसाने अडवणे व त्यात चारही हातपाय दोरीने बांधून, किंचाळू नये म्हणून तोंडाला घट्ट चिकटपट्टी बांधलेल्या, एकमेकांवर दाटीने कोंबलेल्या निरागस गाईवासरांची पोलिसांच्या, गोरक्षकांच्या मदतीने सुटका करून सुखरूपपणे गोशाळेत रवानगी करणे हे मोठे जिकिरीचे व जिवावर बेतणारे, धाडसाचे काम आहे. महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा अमलात असतानादेखील त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळेच बेकायदेशीर कत्तलखाने वाढीस लागलेत. शेतामधील कत्तलखाने तर वेगळेच, हीच मोठी एक शोकांतिका आहे. प्राण्यांचे हाल होतात म्हणून बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानादेखील ती पुन्हा सुरू व्हावी असा काहीसा वेगळाच अट्टाहास धरणारे हेच ते स्वामी मालकाच्या आणि बैलाच्या नात्यातील जिव्हाळा – गुंफण सहजपणे उलगडतात. पारंपरिक सण रक्षाबंधनाला तर राख्यांनी भरलेला शिवशंकर स्वामींचा हात गोरक्षण चळवळीला असलेला भगिनींचा पाठिंबाच दर्शवितो.




























































