नाद-मराठी – असे स्वर अशी गाणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

कधी कधी असं वाटतं की, आपले मराठी संगीतकार आणि चित्रपट निर्माते सिनेसृष्टीत भक्कमपणे उभे होते आणि ‘प्रभात’सारख्या सिने कंपन्या मराठीबरोबरच त्याच कथानकावर हिंदी चित्रपटही काढत होत्या, त्यावेळी नूरजहां आणि सैगलसारख्या तत्कालीन दिग्गज कलाकारांचं मराठी गीत आलं नाही का? हे दोन स्वर त्या काळात देशभर गाजत होते. नूरजहां तर फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेली. ज्येष्ठ गायक बडे गुलामअली खाँ तिथे गेले आणि परतही आले. त्याच काळात तिकडे गेलेली आणखी एक गायिका म्हणजे रोशनआरा बेगम.

1917 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या रोशनआरा बेगमची ख्याल, गजल, ठुमरी यावर हुकमत होती. ‘मलिका-ए-मौसिकी’ असं म्हटल्या गेलेल्या (संगीतसम्राज्ञी) या गायिकेच्या दूरचं नातं ज्या किराणा घराण्याच्या अब्दुल करीमा खाँसाहेबांशी होतं ते तर महाराष्ट्रात घेऊन मराठीच झाले! गाणं सोडणार नाही या अटीवरच लग्नाला होकार देणारी रोशनआरा ही मनस्वी गायिका-बालपणापासून संगीताची, गाण्याची आवड असल्याने नवव्या वर्षापासून रीतसर संगीत शिक्षण घेऊ लागली. पुढे दिलीप कुमारच्या ‘जुगनू’ चित्रपटातलं ‘दिल में तू, आंखों में तू, सांसो में तू’ हे त्यांचं गाणं गाजलं. त्यांनी अल्लादिया खाँ यांच्याकडेही संगीताचं शिक्षण घेतल्याने गंगुबाई, मोगुबाई, हिराबाई (बडोदेकर) या त्यांच्या मैत्रिणी होत्या. या रोशनआरा बेगम यांचं एकच मराठी गाणं मिळालं ते म्हणजे

‘आली तुझ्या दारी राधा मुरारी,

सोडूनि लाज रे सारी।’

‘हासती बोलती किती मजलागी,

नाही मानली खंत परि’

रोशनआरा तशा सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातल्या गायिका. त्यांचं मराठी गाणंही नाटय़गीताच्या धर्तीवर असलेल्या भावगीतासारखं. मराठीमध्ये गाणाऱ्या आणखी एक गायिका म्हणजे दिलराज कौर. 1960 मध्ये मुंबईतच जन्मलेल्या दिलराज कौर यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आरंभ झाला तो तबला वादनाने. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांचं तालासुरांचं ज्ञान पक्कं होतं. 1975 मध्ये आलेल्या ‘जान हाजीर है’ या चित्रपटात दिलराज कौर यांना पार्श्वगायनाची संधी मिळाली. 1980मध्ये ‘गड्डी जाती बा’ या गाण्यात रफी, शैलेंद्र, हेमलता यांच्यासह दिलराज कौर यांचाही स्वर होता. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटासाठी त्यांनी आशाताईंबरोबर ‘मौसम मस्ताना’ हे गाणं गायिलं. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन, भप्पी लहरी, कल्याणजी-आनंदजी यांच्याकडेही त्यांनी गाणी गायिली.

हिंदीत गाजलेल्या अनेक गायक-गायिकांना मराठीत आणण्याचं श्रेय जातं संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांच्याकडे. महंमद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायकाकडून त्यांनी गाऊन घेतलेली गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली. श्रीकांतजी यांनीच दिलराज कौर यांच्याकडूनही काही गाणी गाऊन घेतली. यातली काही गाणी अशी…‘नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू, माझ्या अंतरीचे नको सूर छेडू’ या गीताचे गीतकार काणेकर आणि संगीतकार श्रीकांतजी तसंच गायिका दिलराज कौर. उमाकांत काणेकरांनी लिहिलेली आणखी दोन गाणी श्रीकांतजी यांनी दिलराज कौर यांच्या आवाजात स्वरबद्ध केली. त्यातलं ‘भेट ती झाली तुझी अन् गंधता आली जीवा; फुल मी झाले कळीचे, धुंदली सारी हवा’ या गाण्याचा गोडवा सुंदर, श्रवणीय आहे. तिसरं गीत काणेकरांचंच. ‘सांग ना कुठे जाऊ, वेदना कुणा दावू?’ या गाण्यातील आर्ततेला साजेशा श्रीकांतजींच्या संगीतातील सतार आणि बासरी यांचा मिलाफ झाल्याने दिलराज कौर यांचे स्वर अधिक प्रभावी होतात.