
भौतिक सुखाच्या पाठी धावून दमछाक करण्यापेक्षा जे आपल्या ओंजळीत मिळाले आहे त्याचा योग्य विनियोग आणि उपभोग करा… सकारात्मक संदेश देत आहे अभिनेता हार्दिक जोशी.
एखादी घटना घडली ती वाईट आहे, दुःखद आहे मग ती मनाविरुद्ध झालेली घटना दुःखी होऊन ओंजारत गोंजारत बसण्यापेक्षा मनाला हे समजवायचं की, येणारा दिवस काहीतरी नवं, वेगळं आशादायी किंबहुना ऊर्जादायी घेऊन येणार आहे. इथल्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये अजून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे मिळेल त्या परिस्थितीमध्ये कसं आनंदी राहावं. आपल्या गरजा कशा वाढवून न देता आहेत. त्या वस्तूंमध्ये समाधान मानायला हवं. नामस्मरणाची अनुभूती प्रत्येकाने घ्यायला हवी.
ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी चंदिगडला ‘स्टाफ सिलेक्शन बोर्ड’ येथे शिक्षणासाठी ‘ऑलिव्ह ग्रीन अॅकडमी’मध्ये प्रवेश घेतला. अपॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता, पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना मी हे खात्रीने म्हणू शकेन की, तो प्रवेश केवळ अपॅडमीमधला नव्हता तर एका वेगळय़ा अर्थाने मला समृद्ध करणाऱ्या नव्या आयुष्याच्या वाटेवरचा होता. मी तिथे प्रवेश घेण्यापूर्वी हा विचारच केला नव्हता की, ‘माझ्यातला मी’ असा नखशिखांत बदलून जाईन. अर्थातच, सकारात्मक बदल होता तो. टीपकागदाप्रमाणे तिथली शिस्त माझ्यात झिरपत गेली. खूप आतपर्यंत… खोलवर. त्यावेळच्या त्या शिक्षणाने मला काय काय शिकवलं? असं म्हणण्यापेक्षा काय नाही शिकवलं असा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्यासारखं राहायला शिकवलं. नितळ…
शिस्त या दोन अक्षरांचा खरा अर्थ कोणाला जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी जरूर या ट्रेनिंगला जावं. सकाळी उठण्यापासून, ते न्याहारी, दुपारचे जेवण, लेक्चर्स आणि थेट रात्रीच्या झोपेपर्यंत सगळय़ा वेळा ठरलेल्या असायच्या आणि त्याचं काटेकोरपणे नियमित पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असायचं. इतकी पराकोटीची शिस्त तिथे पाहायला, अनुभवायला आणि अंगीकारायला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. तिथल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळय़ा चाचणी असायच्या. उदाहरण द्यायचं झालं तर ओआयटी म्हणजे ऑफिसर इंटेलिजन्स टेस्ट किंवा पीपीटी (पिक्चर पर्सेप्शन टेस्ट). म्हणजे कसं ना की, तुम्हाला एखादा चित्र दाखवलं जायचं आणि ते चित्र बघून तुम्ही मनातल्या मनात अंदाज, ठोकताळे बांधून त्याविषयी आपलं मत मांडायचं. त्याच चित्राकडे सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं याचा दृष्टिकोन तिथे पाहायला मिळाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावभावनांवरती आणि स्वतःच्या रागावरती कसं नियंत्रण ठेवावं याचे अफलातून धडे मिळाले. पुष्कळदा गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत, तर आपण चिडचिड करतो किंवा बाहेरच्या जगात काही मनाविरुद्ध घडलं तर बाहेरचा राग घरी आणून आपल्या माणसांवरती आगपाखड करतो. शेवटी त्यात निष्पन्न काहीच निघत नाही. राग आला तर शांत चित्तानं डोपं टाळय़ावरती ठेवून तो राग कसा नियंत्रणात आणता आला पाहिजे.
शब्दांकन: निनाद पाटील




























































