अनुभूती – माझे माहेर पंढरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

माऊलीच्या दुधासारख्या ज्येष्ठ आषाढात पावसाच्या सरी चिंब करून टाकतात. काळी आई सुखावते. वारकरी म्हणजेच शेतकरी शेतात पेरणी सुरू करतात. पेरणीचा आनंद पेऱयापेऱयाने वाढत जातो आणि सर्वांना वेध लागतात पंढरीच्या वारीचे. ‘भेटी लागी जिवा लागलीसे आस ‘अशी आंतरिक ऊर्मी वारकऱयांमध्ये निर्माण होते.  ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ , ‘विठ्ठल विठ्ठल’ अशा नामघोषासाठी वाणी अधीर होते. देहू–आळंदीपासून थेट पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग वैष्णवांच्या मांदियाळीने गजबजून निघतो. टाळ–मृदंगाचा आवाज जणू गगनाला भिडतो. पंढरीची वारी हे महाराष्ट्रातल्या भाविकांचे सुखनिधान आहे.

सध्या कोरोनामुळे याही वर्षी पंढरपूरची पायी वारी होणार नसली तरी आषाढी एकादशी आली की, ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी’ अशी सार्वत्रिक भावना भाविकांची असते. ‘संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत’, ‘तेथे असे देव उभा, जैसी सम चरणाची शोभा’ असे वातावरण भूवैकुंठ पंढरीत आषाढी वारीच्या वेळी असते. आता कोरोनामुळे वारी केवळ प्रतीकात्मक करावी लागत आहे. कोरोनाचे महासंकट दूर कर, अशी विनवणी लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला करीत आहेत.

देहूहून संत तुकोबाराय यांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघते, तर आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघते. पालखी निघते यासाठी वारकरी ‘प्रस्थान’ ही संकल्पना वापरतात. हे प्रस्थान आता प्रतीकात्मक झाले आहे. भागवत मंदिराचा कळस ठरलेले तुकोबा पंढरीच्या वारीला सोहळय़ासह जात असत.

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार

जनार्दन एकनाथ। खांब दिला  भागवत

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश

तुकाराम भागवत मंदिराचा कळस ठरले.   

‘तुकी  तुकीला तुका। विश्वि भरोनि उरीला लोका’ अशा या तुकाराम महाराजांचे वंशज विश्वंभर महाराज  हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन. त्यांच्या काळात पंढरीच्या वारीची परंपरा सुरू होती. संत तुकाराम महाराजांपूर्वी त्यांच्या आठ पिढय़ा पंढरीची वारी सुरू होती. महिपती वृत्तचरित्रात तसे संदर्भ सापडतात. वर्षातील 24 एकादशींची परंपरा देहूच्या मोरे घराण्याने कायम ठेवली आहे. संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीला सर्वसमावेशक स्वरूप दिले. 1685 ला देहूहून वारीचं रूपांतर पालखीत झालं. तुकारामांचे बंधू कान्होबा, त्यांचे चिरंजीव महादेव बाबा, पुढे नारायण महाराज यांनी पंढरीच्या वारीला वैभव प्राप्त करून दिले. छत्रपतीला संभाजी महाराज नारायण महाराजांना गुरू मानायचे. 1685 साली दाभाडे, इंगळे, शिंदे या सरदारांनी पालखीला सुरक्षा प्राप्त करून द्यावी, असे आदेश देत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराजांनी अब्दागिऱया, घोडे आदी वैभव प्राप्त करून दिल्याची माहिती संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. माणिकबाबा मोरे यांनी दिली.

देहूत ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या आधी सात दिवस कीर्तन सप्ताह असतो. ज्येष्ठ वद्य सप्तमीला काल्याचे कीर्तन होते आणि दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पादुका पूजनानंतर होते. देहूहून पालखी पंढरीच्या दिशेने निघते तेव्हा देहूजवळ अंगडशहा बाबांचा दर्गा आहे. या दर्ग्याजवळ आरती होते. अंगडशहा फकीर हे सूफी संत होते. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेतला होता. आजही अंगडशहाच्या दर्ग्याजवळ वारकरी संतपर अभंग म्हणतात. अंगडशहा फकीर म्हणत-

तुका तुकाराम दो नाम एक अंग

उनका सेतू बिगड गया

इनका सेतू अभंग

तुका तुकाराम से एक नाम अंग

संत तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय. माघ शुद्ध दशमी गुरुवार शके 1554, सन 1633 या दिवशी बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात येऊन संत तुकाराम महाराजांना गुरुमंत्र दिला. ‘बाबाजी आपुले सांगितले नाव । मंत्र दिला राम कृष्ण हरी।। हा गुरुमंत्र.  गुरुमंत्र म्हणजेच ‘राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी’ हा गजर. लाखो वारकरी हा नामघोष करीत पंढरीच्या वाटेकडे निघतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला इंद्रायणी काठी भक्तांचा मेळा जमलेला असतो. कारण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान अलंकापुराहून पंढरीसाठी होत असते. भागवत मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी रचला. ‘माऊली, माऊली’च्या जयघोषात अलंकापूर वैष्णवांच्या मांदियाळीने एरव्ही दुमदुमलेले असते. कोरोनाने पालखी सोहळय़ावर बंधने आलीत. आता पालखी सोहळा होणार नाही. आळंदीपासून पंढरपुरापर्यंत सर्व भाविक एकमेकांचा उल्लेख ‘माऊली’ असा करतात. एक विठू माऊली अन्  दुसरी ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेली आळंदी हे शिवपीठ.  84 सिद्धांचा मेळा आळंदीच्या सिद्धबेटात जमत असे. 1275 ते 1296 या अल्पकाळात अवतार घेतलेल्या ज्ञानेश्वर माऊलीने ‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे।  तोषोनि मज द्यावे पसायदान हे। ’ अशी विश्वप्रार्थना जगाला दिली.

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा एकत्र पालखी सोहळा 1685 मध्ये नारायण महाराजांनी सुरू केला. वारकरी संप्रदायाला ‘राम कृष्ण हरी । हा मंत्र लाभलेला असला तरी 1685 पासून ‘ज्ञानोबा तुकाराम’ असा नामघोष वारकरी संप्रदायाचा ‘प्राणस्वर’ बनला. 1832 साली ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतंत्र पालखी सोहळय़ाला हैबतबाबा आरफळकर यांनी वैभव प्राप्त करून दिले. ज्येष्ठ वद्य अष्टमीला दुपारी चार वाजता माऊलीचे प्रस्थान होते. माऊलीच्या पादुका समाधीवरून पालखीत ठेवल्या जातात. सिद्धेश्वराचा कळस हलतो, पिंपळपानांची सळसळ होते आणि ‘माऊली माऊली’ असा नामघोष होतो. अबीर गुलालाची पंढरीची वाट  दोन वर्षांपासून सुनी सुनी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपत नाही तोपर्यंत हेच सुरू राहणार!

(लेखक ज्येष्ठ लोककला अभ्यासक आहेत)

[email protected]