अद्भुत सामर्थ्याचा प्रत्यय

>> चैतन्यस्वरूप

श्रीमहाराजांच्या एका भक्ताला अरब देशाविषयी विलक्षण कुतूहल होते. आयुष्यात एकदा तरी अरबस्तान येथे जाण्याचा योग प्राप्त व्हावा अशी त्याची मनोमन इच्छा होती. त्याची ही जगावेगळी इच्छा श्रीमहाराजांनी देखील जगावेगळ्या पद्धतीने पुरवली अन् त्याला अरबस्तानात नेले. तेथे गेल्यावर श्रीमहाराज स्थानिक वेषभूषेत उंटावर बसून सराईतासारखे फिरत होते आणि तेथील लोकांसोबत अरबी भाषेत बोलत होते. नवलाईचे म्हणजे, तेथील स्थानिक मंडळी श्रीमहाराजांना ओळखत होती. ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करत होती, त्यांना नमस्कार करीत होती. हे दृश्य पाहून चक्रावलेल्या त्या भक्ताने अरबस्तानात घडलेला वृत्तांत माघारी परतल्यावर अन्य भक्तांना कौतुकाने सांगितला.

प्रसिद्ध जादूगार रघुवीर रशियाच्या दौऱयावर असताना त्यांना मॉस्को येथे श्रीमहाराजांचे दर्शन घडले. त्यावेळी रशियामध्ये कडाक्याची थंडी होती, सर्वत्र बर्फ पडत होता. लोक ओव्हर कोट घालून, मफलर बांधून रस्त्यावर फिरत होते, तरीही श्रीमहाराज मात्र मॉस्कोच्या त्या जीवघेण्या थंडीत अगदी साध्या वेशात फिरताना पाहून रघुवीर आश्चर्यचकित झाले. ही गोष्ट त्यांनी हिंदुस्थानात परतल्यावर सर्वांना सांगितली.

एकदा श्रीमहाराजांना दाढी करावयाची होती. त्यांनी न्हाव्यास बोलावले. त्यावेळी न्हाव्याच्या दुकानात अन्य गिऱहाइके असल्याने ‘हो आलोच’ असे म्हणून तो समोरच्या गिऱहाइकाची दाढी करण्यात मग्न होत असे. हा प्रकार अनेकदा घडला, श्रीमहाराज मात्र त्यांची वेळ येईपर्यंत शांत बसून राहिले. अखेरीस सर्व गिऱहाइके आटोपल्यावर न्हावी श्रीमहाराजांकडे आला. त्याने साबण लावून श्रीमहाराजांची दाढी करण्यास सुरुवात केली. वस्तऱयाने एक बाजू साफ करून तो दुसऱया बाजूस वळला तो काय आश्चर्य! पहिल्या ठिकाणी पुन्हा केस उगवले होते. न्हावी गडबडला. पुन्हा पहिली बाजू साफ केली तोवर दुसऱया बाजूस पहिल्याइतकेच केस उगवले. असे सतत होऊ लागल्याने न्हाव्याला त्याची चूक कळून आली. त्याने श्रीमहाराजांची माफी मागितली तेव्हा त्यांनी हसत हसत न्हाव्याला माफ केले.

प्रख्यात वत्ते, साहित्यिक व संपादक आचार्य अत्रे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या ‘मराठा’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून त्यांनी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्यावर जहाल टिका केली, त्याविरुद्ध कन्नमवार यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली. या प्रकरणी अत्रे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ज्या दिवशी हा खटला निकालात निघणार होता त्याच्या आदल्या रात्री झोपेत असलेल्या अत्रे यांच्या पाठीत श्रीमहाराजांनी लाथ घातली आणि कन्नमवार प्रकरण बंद झाल्याचे स्वप्नदृष्टांताद्वारे सांगितले. दुसऱया दिवशी दुर्दैवाने कन्नमवार यांचे निधन झाले आणि खटला पुढे रद्दबातल झाला. तेव्हापासून आचार्य अत्रेंची श्रीमहाराजांवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. अत्रे यांच्या घरात, दैनिक ‘मराठा’ कार्यालयात आणि त्यांच्या नाटकांच्या सेटवरही श्रीमहाराजांचे छायाचित्र ठळकपणे दिसून येत असे.

श्रीमहाराजांचे परमभक्त सोलापूरचे सिद्राम महादप्पा सोरेगांवकर अर्थात ‘दादा फुलारी’ यांच्यावर श्रीमहाराजांचे अपार प्रेम होते. त्यांना श्रीमहाराज एकदा म्हणाले, ‘काय पाहिजे ते माग’ तेव्हा दादा फुलारी म्हणाले, ‘महाराज, मला आपले म्हणा.’ तेव्हापासून त्यांच्यामध्ये श्रीमहाराजांचा ‘साक्षात’ संचार होऊ लागला. श्रीमहाराजांच्या कृपेनेच हे सारे काही घडत आहे असे दादा विनम्रतापूर्वक सांगत असत.

सोलापूर येथील जक्कल मळ्यामध्ये श्रीमहाराजांच्या उपस्थितीत श्रीस्वामीसमर्थांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चालला होता. झाडाखाली कढईमध्ये खीर शिजत होती. तेवढय़ात उसळलेल्या धुराचे निमित्त होऊन झाडावर बसलेली एक चिमणी खिरीच्या पातेल्यात पडली. खीर बनविणाऱया माणसाला चिमणी मरून पडल्याचे दिसताच तो घाबरला. तोवर ही गोष्ट बाकीच्या मंडळींनाही समजली. ही प्रसादाची खीर श्रीस्वामीमहाराजांना नैवेद्य म्हणून कशी दाखवावी हा प्रश्न त्यांना पडला. तितक्यात श्रीमहाराज आले आणि त्यांनी मेलेली चिमणी हाती घेत तिला मायेने कुरवाळले, तशी ती जिवंत झाली आणि पंख फडफडवीत उडून गेली. हे दृश्य पाहून उपस्थित मंडळी अवाक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या