लेख : आभाळमाया : अंतराळानुभव चांगला, पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

एलॉन मस्कसारख्या उत्साही मंडळींना अंतराळी सैर घडवण्याची घाई झालीय आणि संभाव्य उत्सुक प्रवासीही काही कमी नाहीत. लाखो डॉलर्स खर्चून अंतराळानुभव घेण्यासाठी रांग लागली. तरुणच नव्हे तर वृद्धांनाही वाटतं की, एकदा पृथ्वीबाहेरच्या विश्वात डोकावून यावं. गेल्या शतकभरात काय जग बदललं! त्या काळात आपल्याकडे कोकणातून मुंबईत येणं हीच मोठी अचिव्हमेंट होती. मग दिल्ली तर बहुत दूर. काशीयात्रेला गेलेले सुखरूप परतल्याचा सोहळा साजरा व्हायचा.

काळ बदलला. दळणवळणाची साधनं विकसित झाली. मोटारी, रेल्वे, प्रचंड आकाराच्या बोटींनी लोकांना चकित केलंच, पण आकाशात विमाने उडू लागली तेव्हा ‘किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी’ अशा कविता क्रमिक पुस्तकात आल्या. पुढे विमान प्रवास नित्याचा झाला. माणसाच्या भ्रमंतीला पृथ्वीचा 12800 किलोमीटर व्यासाचा गोलक कमी पडू लागला. मग लक्ष गेलं अंतराळाकडे. युरी गागारिनने अवकाश इतिहास निर्माण केला आणि 1958 पासून माणूस पृथ्वीच्या पल्याड जाऊन पोहोचला. 1969 मध्ये चंद्र पादाक्रांत झाल्यावर तर अंतराळ विजयाने कमाल केली.

आता मंगळाकडे डोळे लागलेत. तिथे जाऊन राहता येईल का याची चाचपणी सुरू आहे, पण मधला टप्पा म्हणजे एकदा स्पेसमधला निर्वात पोकळीत वजनरहित अवस्थेत सैर घडवून अंतराळ पर्यटकांना खूश करण्याच्या मोहिमा आखल्या जातायत. वजनरहित अवस्था आणि पृथ्वीचं निळंशार रूप अंतराळातून पाहण्यासारखा अद्वितीय आनंद नाही हे कोणीही मान्य करील. त्यामुळे त्याचंच तर नवयुगाच्या रीतीनुसार मार्केटिंग चाललंय. अनेक हवशे-नवशे अंतराळी जाण्यास सजलेत.

अर्थात, हा प्रवास पृथ्वीवरच्या प्रवासासारखा सोपा नाही. इथल्या प्रवासातसुद्धा अनेकांना गाडी, बोट, विमान लागतं. त्यासाठी औषधं घ्यावी लागतात. पृथ्वीवरच्या एका खंडातून दुसऱ्या खंडात गेल्यावर दिवसरात्रीचं बदललेलं गणित पचवायला शरीराला वेळ लागतो, ‘जेट लॅग’ येतो. ही सगळी इथली अवस्था तर अंतराळाचं काय? त्याचा अभ्यास करूनच या ट्रिप आयोजित केल्या जातील, पण बरीच पथ्यही पाळावी लागतील.

आतापर्यंत अवकाशात जाऊन आणि ‘स्पेस स्टेशन’सारख्या जागी बराच काळ राहून आलेल्या अनेक अंतराळयात्रींच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी होते. त्यांना एखादा ‘स्पेस आजार’ जडलेला नाही ना याची शहानिशा केली जाते. तसंकाही आढळलं तर ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने या प्रवासात आणखी नेमकी कोणती काळजी घ्यायची यावर शास्त्र्ाज्ञ विचार करतात. असा अभ्यास अव्याहत सुरू असतो. अंतराळातले काही सूक्ष्म जीव तर अंतराळवीरांबरोबर आले नाहीत ना ते पाहण्यासाठी त्यांना पृथ्वीवर आल्यानंतर ‘क्वारेन्टाइन’मध्ये काही काळ राहावं लागतं.

पुढच्या काळात माणसांचा ओघ अंतराळाकडे लागला आणि हा प्रवास नित्याचा झाला तर संभाव्य सावधगिरीची सूचना देणाऱ्या काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. महिनाभरापूर्वीच अंतराळयात्री स्कॉट केली यांच्या तब्येतीविषयी चर्चा झाली. केली यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर तब्बल 340 दिवसांचा मुक्काम केला. म्हणजे जवळपास वर्षभर ते अंतराळातच राहिले. या काळात त्यांच्या आणि त्यांच्या जुळय़ा भावाच्या ‘जीन्स’मध्ये फरक पडल्याचं आणि त्यांची ‘इम्यून सिस्टीम हायपरऑक्टिव्ह’ झाल्याचे आढळलं. शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीमधला बदल बराच काळ अंतराळात राहिल्याने झाला असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

इतका वेळ अंतराळात राहणाऱ्यांना नंतर अंतराळ प्रवासाचा आभास होणं किंवा हाडं कमकुवत होणं असे काही मानसिक, शारीरिक विकार होऊ शकतात. केली म्हणतात की, अंतराळात स्पेस स्टेशनवर असताना मला कधीही कम्फर्टेबल किंवा आपण पूर्णपणे नॉर्मल आहोत असं वाटलं नाही. आता परतल्यावरही अधूनमधून डोकेदुखीचा त्रास होतो. हे असं होणं म्हणजे त्यांच्या डीएनएत बदल झालाय असं नव्हे, पण ‘जीन’ची अभिव्यक्ती (एक्प्रेशन) बदललेय असं म्हटलं जातं.

ही झाली तांत्रिक भाषा, पण मथितार्थ असा की, अंतराळ प्रवासाची अनिवार ओढ असली आणि तसा योग आला तरी नंतरचे तब्येतीचे ताणतणाव त्या व्यक्तींनाच भोगावे लागणार. असं असलं तरी सुसाट कल्पना आणि त्यानुसार बनवली जाणारी यानं उत्सुक मनांना आकर्षित करणारच. अंतराळ प्रवास करून आलेल्यांच्या प्रकृतीचा अभ्यास करणारे संशोधक या सर्वांना फक्त सबुरीचा सल्ला देतायत. या अद्भुत प्रवासामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अंदाज वर्तवतायत, पण समस्या आली की, उत्तर शोधणं हेच तर विज्ञानाचं काम. कदाचित अंतराळ प्रवास रोजचाच झाला की, मानवी शरीरं त्याला अनुकूल ‘ऍडॅप्टिव्ह’ होतील.

[email protected]