लेख : ठसा : अंबाती रायुडू

167

>> जयेंद्र लोंढे

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंचे नशीबवान आणि कमनशिबी असे दोन प्रकार आहेत. त्यातूनच एकामुळे दुसऱ्यावर ‘अन्याय’ होत आले आहेत. बिशनसिंग बेदी संघात असल्यामुळे पद्माकर शिवलकर यांना हिंदुस्थानी संघात खेळायला मिळाले नाही. मुंबई क्रिकेटसाठी मोलाचे योगदान देणारा अमोल मुजुमदारही हिंदुस्थानी संघापासून कायम दूरच राहिला. याचप्रसंगी राहुल द्रविड संघात आला आणि त्याचा पत्ता कायमसाठी कट झाला. याला म्हणतात दुर्दैव. दुर्दैवाच्या फेऱ्यात आणखी एका गुणवान क्रिकेटपटूचे करियर संपुष्टात आले आहे. फरक एवढा की तो हिंदुस्थानी संघासाठी 55 वन डे व सहा ट्वेण्टी-20 खेळला, पण नशीबाच्या बाबतीत मात्र तो शिवलकर व अमोल मुजुमदार यांच्यापेक्षा तसूभरही कमी नाही. त्याचे नाव अंबाती रायुडू.

वर्ल्ड कपसाठीच्या हिंदुस्थानी संघात संधी देण्यात येत नसल्याने त्याने तडकाफडकी निवृत्ती घेत आपल्यावर अन्याय झाल्याचे साऱ्या क्रिकेटविश्वाला दाखवून दिले. आंध्रप्रदेशमध्ये गुंटुर येथे जन्मलेल्या अंबाती रायुडू याने तिसरीत असताना क्रिकेट ऍकॅडमीत प्रवेश केला. वडील सांबासिवा राव यांच्या पुढाकारामुळेच मी क्रिकेटपटू होऊ शकलो हे अंबाती रायुडूने याने एका मुलाखतीदरम्यान आवर्जून सांगितले. अंबाती हा मुळात आक्रमक स्वभावाचा. रणजी स्पर्धेत अर्जुन यादवसोबतचे भांडण, आयपीएलमध्ये हर्षल पटेलला केलेली शिवीगाळ, हरभजनसिंगसोबतचा वाद या सर्व घटनांवरून त्याचा आक्रमकपणा प्रकर्षाने दिसून येतो. मात्र या वर्तनाचा फटका त्याला बसला. अंबाती रायुडूची क्रिकेटमधील सुरुवात छान झाली. एसीसी 15 वर्षांखालील स्पर्धेत त्याने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला.

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने सामनावीराचा मानही संपादन केला. यानंतर त्याच्यासाठी हिंदुस्थानच्या 17 व 19 वर्षांखालील संघाचे दरवाजे उघडे झाले. रणजी स्पर्धेत त्याने हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. 2003 मध्ये हिंदुस्थान अ संघाकडून खेळताना इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकांमधून धावांचा पाऊस पाडल्यानंतर क्रिकेट समीक्षकांनी त्याच्या फलंदाजीचे कौतुक करताना हिंदुस्थानचे भविष्य संबोधले. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपर्यंत मजल मारली. मात्र इंडियन सुपर लीग (आयएसएल) या बंडखोर लीगचा श्रीगणेशा झाला आणि अंबाती रायुडूने यामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र बीसीसीआयने आयएसएलमध्ये सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंना बंदीची शिक्षा सुनावली. पुढे बीसीसीआयने ‘त्या’ खेळाडूंना पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळायला परवानगी दिली.  आयएसएलशी जोडले गेलेले संदीप पाटील यांची निवड समितीवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी अंबाती रायुडूलाही संघात स्थान दिले. 2013 साली तो पहिला वन डे सामना खेळला. 2013 ते 2019 या काळात त्याने 55 वन डे सामन्यांत 47.06च्या सरासरीने तीन शतके व दहा अर्धशतकांसह 1694 धावा फटकावल्या. त्याला ट्वेण्टी-20त मात्र घवघवीत यश संपादन करता आले नाही. वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियात चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, लोकेश राहुल यांच्यामध्ये चुरस लागली असतानाच अंबाती रायुडूच्या फलंदाजीवर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr, कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहीत शर्मा हे बेहद खूश  होते. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील एका खेळीत त्याने केलेल्या 90 धावांचे कौतुकही झाले. मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची एण्ट्री झाली आणि क्षणार्धात अंबाती रायुडूवर ‘गदा’ आली. निवड समितीनेही दक्षिणेतील लोकेश राहुलला चौध्या स्थानासाठी वर्ल्ड कपच्या संघात प्रवेश दिला. तसेच विजय शंकरला अंबाती रायुडूऐवजी संधी देण्यात आली. निवड समिती प्रमुख एम एस के प्रसाद यांनी यावेळी ‘थ्री डायमेन्शन प्लेयर’ (फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात माहीर) म्हणून विजय शंकरला ‘थम्प अप’ दाखवत अंबाती रायुडूला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे दुखावलेल्या अंबाती रायुडूने ‘वर्ल्ड कप बघण्यासाठी थ्री डी ग्लासेसची ऑर्डर दिलीय’ असे मत सोशल साईटद्वारे व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली. मात्र निवड समितीचा अन्याय यानंतरही सुरूच राहिला. अंबाती रायुडूचे नाव पर्यायी खेळाडूंमध्ये असतानाही शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर रिषभ पंतच्या आणि विजय शंकर जखमी झाल्यानंतर मयांक अग्रवालच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंबाती रायुडूसाठी ही क्लेशदायक बाब ठरली. अखेर रायुडूने सर्व प्रकारच्याच क्रिकेटला ‘अलविदा’ केले आणि हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका गुणवान  पण कमनशिबी’ क्रिकेटपटूची नोंद झाली.

 

आपली प्रतिक्रिया द्या