वेब न्युज : देशातील आहेत त्या नोकर्‍याही धोक्यात

वेगाने बदलत असलेले तंत्रज्ञान आणि देशातील सर्वच आघाडीच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा आणि मशीनचा वाढता वापर बघता येणार्‍या तीन वर्षांत आता उपलब्ध असलेल्या नोकर्‍यांपैकी 1/3 नोकर्‍या या तंत्रज्ञानाच्या अर्थात मशीनच्या ताब्यात जाणार असल्याचा धोका मानवसंसाधन क्षेत्रात कार्यरत तज्ञांनी व्यक्त केला आहे. Shine.com या जॉब पोर्टलने यासंदर्भात देशातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये आयटी, शिक्षण, वैद्यकीय, उत्पादन, ऑटोमोबाइल्स, बँकिंग आणि इतर फायनान्शियल व्यवसाय, विमा अशा अनेक क्षेत्रांतील कार्यरत तज्ञांची मते जाणून घेण्यात आली.

प्रामुख्याने HR विभागातील मधील अनेक तज्ञ यात सामील होते. यापैकी 45.5 टक्के लोकांनी मान्य केले की, येणार्‍या 12 महिन्यांत ते व्यवसायाच्या वाढीसाठी आणि फायद्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लार्निंग आणि व्हर्च्युअल रिऍलिटीशी संबंधित अनेक यंत्रे आणि तंत्रज्ञान यांचा वापर आपल्या व्यवसायात वाढवणार आहेत, तर उरलेल्या लोकांपैकी 36.75 टक्के लोकांनी येत्या तीन वर्षांत आपापल्या व्यवसायात अनेक बदल घडून येणार असल्याचे आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली. वाढत्या मशिनीकरणामुळे आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवातीमुळे फक्त आणि फक्त या क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी लोकांचीच मागणी काही प्रमाणात वाढू शकेल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर कामाचे तास वाढणे, कामाचे मोठ्या प्रमाणात डिजिटल होणे, एचआर क्षेत्रातील अनेक धोरणे अजून लवचिक होणे असे परिणामदेखील जाणवणार आहेत. नोकरीवर ठेवलेल्या कामगारांपेक्षा घरी बसून काम करणारे आणि फ्रीलान्सर यांना मोठ्या उद्योगाकडून जास्त प्रेफरन्स दिला जाण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहितीच्या सुरक्षेसाठी Data compliance आणि cyber security ही क्षेत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास वेगाने होत असला तरी इथेही फक्त अत्यंत अनुभवी लोकांचीच मागणी असणार आहे.