तरुण आहे आशाताई अजुनी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

आशाताईंच्या गाण्यातलं अष्टपैलुत्व अजोड आहे. त्यांच्या गाण्यातून त्यांच्यामधली अभिनेत्री डोकावते. त्या गाणं फक्त गात नाहीत तर गाणं इनॅक्ट पण करतात. किती वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले. ‘रात अकेली है’ गाण्यात बर्मन दादांनी कानात कुजबुजण्यासारख्या शैलीत गायला सांगितले… जेमतेम गुंजनपासून ते हुंकारयुक्त उच्चार… अचानक ओरडणं या गोष्टींना तिथे संगीतरूप लाभलं. त्यांच्या आवाजात त्या गाण्याला लागणारी मादकता होती. ‘नजर लागी राजा तोरे बंगलेपे’मध्ये त्यांनी केलेल्या नजर, मटक, कुहूक शब्दाचं उच्चारण काय ग्रेट आहे.

आज 8 सप्टेंबर… आशाताईंचा वाढदिवस! आशाताई म्हटल्यावर मंगेशकर आडनाव लिहावं लागत नाही. एकच चेहेरा डोळ्यासमोर येतो – प्रसन्न, हसरा, मिश्किल भाव असलेला…

मी त्यांच्याबाबतीत वयाचा हिशोब लावत नाही. कारण चिरतरुण मनाला कुठलं वय? वार्धक्य हा शब्द त्यांच्याही शब्दकोशात नाही आणि त्यांच्या गाण्यातही. त्यांचे बंधुराज हृदयनाथ मंगेशकर गंमतीत म्हणतात, मी कधी म्हाताराच होत नाही. याचं कारण आशाताई कधी म्हाताऱया होत नाहीत, तर मी कसा म्हातारा होणार? मी तर आशाताईंपेक्षा चार वर्षांनी लहान आहे.

‘पिया तू अब तो आजा’ या गाण्यावर हेलेन थिरकली होती. आता माझा तीन वर्षांचा नातूही नाचतो. जगात काही गोष्टी कालातीत आहेत – आशाताईचं गाणं तसं आहे. त्यांनी पिढय़ा व्यापून टाकल्या. सरदार मलिक – अन्नू मलिक, बर्मन पितापुत्र, सुधीर फडके आणि श्रीधर फडकेसुद्धा. श्रीधरची मुलगी संगीत देत असती तर त्या तिच्याकडेही गायल्या असत्या. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर लतादीदींचा प्रभाव होता. पण साठीच्या दशकात त्यांनी स्वतःचं सार्वभौम राज्य स्थापन केलं. त्या राज्यावर चाल करून जायची ना कुणाची हिम्मत होती ना कुवत. हे राज्य त्यांनी स्वतःच्या हिंमतीच्या, कष्टाच्या आणि आवाजाच्या जोरावर उभे केले.

एक वेळ अशी होती की, लतादीदींना कॉफी पाजण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये एक रुपयाही नसायचा. आज लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरत आहे. किमान दोन शहरे मला माहितेयत जिथे आशाताईंची हॉटेल्स आहेत. एक दुबईत आणि दुसरे बार्ंमगहम. त्या हॉटेलांत गेल्यावर मला पहिल्यांदा जाणवलं असेल तर त्यांचे लहानपणीचे दारिद्रय़, त्यांना दिवसातून मिळणारा एखादा घास आणि त्यांच्या पाकिटात नसणारा एखादा रुपया. खूप बरं वाटलं… कुठून कुठे माणूस आपल्या प्रतिभेच्या जोरावर पोहचू शकतो. कुणालाही हेवा वाटावा असा चैतन्यपूर्ण, भावपूर्ण, खालच्या आणि वरच्या स्वरात आणि लयीत आरामात विहार करणारा त्यांचा आवाज आहे. त्यामुळे उंच स्वरावर गाणं त्या लीलया सुरू करत. उदा निगाहे मिलाने को किंवा तेरे खयालो में हम… त्यांच्या गाण्यातलं अष्टपैलूत्व अजोड आहे. त्यांच्या गाण्यातून त्यांच्यामधली अभिनेत्री डोकावते. त्या गाणं फक्त गात नाहीत तर गाणं इनॅक्ट पण करतात. किती वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले. ‘रात अकेली है’ गाण्यात बर्मन दादांनी त्याला कानात कुजबुजण्यासारख्या शैलीत गायला सांगितले… जेमतेम गुंजनपासून ते हुंकारयुक्त उच्चार… अचानक ओरडणं या गोष्टींना तिथे संगीतरूप लाभलं. ते भलतंच सेक्सी वाटलं. कारण त्यांच्या आवाजात त्या गाण्याला लागणारी मादकता होती. ‘नजर लागी राजा तोरे बंगलेपे’मध्ये त्यांनी केलेल्या नजर, मटक, कुहूक शब्दाचं उच्चारण काय ग्रेट आहे. खरंतर आशाताईंच्या गायनातली सौंदर्यस्थळं शोधता शोधता आपलं आयुष्य संपून जाईल, पण ती सौंदर्यस्थळं मात्र संपणार नाहीत. बालपणापासून त्यांच्याच गाण्यावर आपण वाढलो. त्यांच्याच अंगाई गीतावर गाई केली. त्यांच्याच नाचरे मोरावर लहानपणी बागडलो. प्रेयसीला अभी ना जावो छोडकर सांगताना, ती आशाताईंच्या आवाजात आर्जव करायची… प्रेयसीला पाहिल्यावर आमच्या मनात नेमकी भावना असायची ‘कोई आया धडकन केहेती है.’

‘अबके बरस भेज भैयाको बाबूल’ हे गाणं बहिणीला सासरी आणायला जाताना नेहमीच डोळ्यात पाणी आणायचं. आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आशाताईंच्या गाण्यांनी आम्हाला साथ दिली. आम्ही म्हातारे होत गेलो. गाणी तरुण राहिली. ती आमच्या मुलांच्या पिढीला साथ देतायत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया… पण आणखीन एक वर्ष तरुण झाल्याबद्दल!
तरुण आहे, आशाताई अजुनी!