
नमिता वारणकर, [email protected]
धावपटू अवंतिका नराळे. नुकत्याच हाँगकाँग येथे झालेल्या युवा आशियाई स्पर्धेत 12 सेकंदात 200 मिटरचा पल्ला सहज पार करून तिने पुणेरी ठसा उमटवला आहे.
मेहनत करण्याची जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुण्याच्या अवंतिका नराळेने हाँगकाँग येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा आशियाई अजिंक्य स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत 200 मीटर अंतर अवघ्या 12 सेकंदांच्या आत पार केले. याचे यशाचे श्रेय ती आपले आईवडील आणि प्रशिक्षकांना देते. तिच्या या आव्हानात्मक कामगिरीमुऴे पुण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
आपल्या या यशाविषयी ती सांगते, माझा पहिला आवडता खेळ ऍथलेटिक्स नव्हताच. पूर्वी मी कबड्डी खेळायचे,पण माझ्या प्रशिक्षकांनी मला ऍथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे कबड्डी खेळातील गती आणि चपळता या गुणांचा येथेही योग्य पद्धतीने वापर झाला.
16 वर्षांची अवंतिका ऍथलेटिक्सचा सराव इयत्ता 8वीत असल्यापासून करत आहे. गेल्या वर्षी भोपाळ येथे झालेल्या शालेय मैदानी स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. ती पुण्यातल्या वडगाव शेरी येथील लोणकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य असूनही तिचे आई-वडील मुलीचे स्वप्न पूर्ण करायला प्राधान्य देत आहेत. वडील संतोष नराळे प्लंबिंगची कामे करतात, त्यावरच त्यांचे घर चालते. आपल्या कुटुंबाची ही परिस्थिती बदलण्याती इच्छा ती व्यक्त करते. त्यांना हातभार लावण्यासाठी ऍथलेटिक्समध्ये समृद्ध करियर करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे.
आपल्या यशाचं श्रेय ती तिच्या मागदर्शक, प्रशिक्षकांना देते. प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्याचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी झाला. त्यांच्याविषयी बोलायचे झाल्यास शब्दच अपुरे पडतील. त्यांच्या थेट आणि अचूक मार्गदर्शनामुळे खूप लवकर शिकत गेले. त्वरित माझ्या चुकांवर मात करता आली. त्यामुळे सुवर्णपदकाची प्राप्त करण्यासारखे मोठे यश मिळवू शकले, असं तिला वाटतं.
सतत चांगली कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करण्यावर भर द्यायचा, मात्र यासाठी रोज सराव करणे आवश्यक आहे. तोही न कंटाळता करायचा. मार्गदर्शक जे सांगतील त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे. निरंतर सराव करून ऑलिम्पिक खेळासाठी प्रयत्न करायचे, असे तिचे तिच्या भविष्यातील योजना आणि त्या पूर्ण करण्यासाठी ठरवलेल्या प्रयत्नांविषयी म्हणणे आहे.
पहिल्या स्पर्धेचा अनुभव
शाळेतील क्रीडा शिक्षक शिवाजी म्हेत्रे यांनी धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी पहिल्याच स्पर्धेत धावताना तिच्या पायात बूटही नव्हते. बुटाशिवाय धावूनही तिने सुवर्णपदक मिळवले. तेव्हापासून शाळेकडून सतत सहकार्य मिळाले. स्पर्धा आणि सरावामुळे शाळेच्या उपस्थितीवर परिणाम व्हायचा, मात्र शाळेने खेळ, स्पर्धा तसेच सराव करण्याबाबत स्वातंत्र्य दिले. त्यामुळे खेळाबरोबर शिक्षणही घेऊ शकते, असे ती कृतज्ञतापूर्वक सांगते.
ऍथलेटिक्समध्ये कारकीर्द
कबड्डीवर प्रेम करणाऱ्या अवंतिकाने आता ऍथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवायचे ठरवले आहे. त्या बळावर तिने सातत्याने सराव करून यश संपादन करायला सुरुवात केली आहे. तिच्यातील चपळता आणि वेग पाहून तिला ऍथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला तिच्या प्रशिक्षकांनी दिला. विशेष म्हणजे तिने 12 सेकंदांच्या धावण्याची कामगिरी केली. त्यामुळे आनंद द्विगुणित झाला. घरची परिस्थिती नाजूक असूनही तिचे वडील प्रशिक्षकांच्या साथीने यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तिला अजून बराच पल्ला गाठायचा असला तरीही तिने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे हिंदुस्थानी ऍथलेटिक्समधील नवीन तारका म्हणून उदयास आली आहे, असे अवंतिकाचे प्रशिक्षक संजय पाटणकर सांगतात.
सरावाला सुट्टी नाही
200 मीटर धावण्याच्या शर्यतीत यश मिळवण्यासाठी काय विशेष मेहनत घेतलीस असे विचारता ती सांगते, सर्वप्रथम 100 मीटर शर्यतीत यश संपादन केले. या शर्यतीत पहिली आले तेव्हा खूप आनंद झाला होता. त्यानंतर त्यापेक्षा जास्त धावण्याचा सराव सुरू केला. याकरिता माझ्यातील खेळाच्या आड येणाऱ्या कमकुवत गोष्टी दूर सारण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी रोज 2 वेळा असे आठवडय़ातून 5 दिवस असे एकही दिवस सरावाला सुट्टी न घेता दररोज सराव करायचे. महत्त्वाचं म्हणजे माझ्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या सामन्यात ती मजबूत करण्याकडे लक्ष दिले.























































