
>> जयेंद्र लोंढे
आसाम येथील ‘धिंग’ येथे जन्मलेल्या हिमा दास हिने अवघ्या 19 व्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. या वर्षी जुलै महिन्यात पाच गोल्ड मेडल जिंकत तिने आणखी एक दमदार पाऊल टाकलेय. पी.टी. उषा यांच्यानंतर हिंदुस्थानला रेसिंग ट्रकवर सुसाट धावणारी खेळाडू मिळाली नाही. आता ‘धिंग एक्सप्रेस’ अर्थातच हिमा दास ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानसाठी ‘सोनेरी’ इतिहास लिहील अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगू लागली आहे.
हिंदुस्थानात क्रीडा संस्कृती ही गेल्या काही वर्षांमध्ये रूजू लागली आहे. लिएंडर पेस, करनम मल्लेश्वरी, राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग, सुशीलकुमार, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांनी आंतरराष्ट्रीय मैदान गाजवल्यामुळे हिंदुस्थानात क्रिकेटतेर खेळांना गती मिळू लागलीय. पुलेला गोपीचंद यांनी जग जिंकून देणारे खेळाडू घडवले आणि बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानने चीन, जपानची मक्तेदारी मोडून काढली. आता ऍथलेटिक्समध्येही ‘सुवर्ण’ भविष्याची चाहूल मिळू लागलीय. आसाम येथील ‘धिंग’ येथे जन्मलेल्या हिमा दास हिने अवघ्या 19 व्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियनशिप (20 वर्षांखालील), आशियाई गेम्स व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. या वर्षी जुलै महिन्यात पाच गोल्ड मेडल जिंकत तिने आणखी एक दमदार पाऊल टाकलेय. पी.टी. उषा यांच्यानंतर हिंदुस्थानला रेसिंग ट्रकवर सुसाट धावणारी खेळाडू मिळाली नाही. आता ‘धिंग एक्सप्रेस’ अर्थातच हिमा दास ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानसाठी ‘सोनेरी’ इतिहास लिहील अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगू लागली आहे.
रोनजीत व जोनाली दास यांना पाच अपत्य. त्यापैकी एक हिमा. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच. धिंग पब्लिक हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या हिमा दासची पावले सुरुवातीला फुटबॉल या खेळाकडे वळली. ती मुलांसोबत फुटबॉल खेळत असे. मात्र फुटबॉलमध्ये करीअर करता येणार नाही हे तिला उमगले. त्यानंतर शमसूल हक या त्यांच्या शारीरिक शिक्षकांनी हिमा दासला ऍथलेटिक्समध्ये आणले.
2018 सालामध्ये एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने 400 मीटर व 4 बाय 200 मीटर रिलेमध्ये सहभाग घेतला. मात्र या दोन्ही शर्यतींमध्ये तिला अपयशाचा सामना करावा लागला. या पराभवाने ती डगमगून गेली नाही. पुन्हा जोमाने उभी राहिली. 12 जुलै 2018 हा दिवस तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या दिवशी तिने जागतिक चॅम्पियनशिपमधील (20 वर्षांखालील) 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकत नवा इतिहास रचला. या चॅम्पियनशिपमधील अखेरच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तीन खेळाडूंना मागे टाकत हिमा दासने हे मेडल जिंकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरली.
2018 सालातील ऑगस्ट महिन्यात जकार्ता येथे झालेल्या आशियाई गेम्समध्ये हिमा दासने दोन गोल्ड मेडल व एक कास्य पदकावर मोहोर उमटवत हिंदुस्थानला देदीप्यमान यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिने महिलांच्या 4 बाय 400 मीटर व मिश्रमध्ये 4 बाय 400 मीटर शर्यतीत सुवर्ण व 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिने नवे विक्रम नोंदवले. या कामगिरीवर खूश होऊन ‘अदिदास’ या क्रीडाशी निगडीत असलेल्या प्रतिष्ठत ब्रॅण्डने हिमा दाससोबत करार करण्याचा निर्णय घेतला.
हिमा दास ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करणार हे निश्चित झाले असतानाच 2019 सालात तिने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये एका महिन्याच्या आत पाच सुवर्ण पदके जिंकत ही प्रचीती दिली. दोन जुलै ते 19 जुलै या कालावधीत तिने पोलंड व झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चार 200 मीटर तर एक 400 मीटर शर्यतीत बाजी मारली. आसाम येथील हायर सेंकडरी एज्युकेन काऊंसिल येथून बारावी ग्रेडची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या सुवर्ण कन्येची ऍथलेटिक्समधील कामगिरी ‘काबिल-ए- तारीफ’ ठरलीय. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहान वयात अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी… युनिसेफची पहिली युवा ऍम्बेसेडर म्हणून ओळखली जाणारी… अन् आसामची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त झालेली… असा हिमा दासचा यशाचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरनंतर लहान वयात क्रीडाक्षेत्र गाजवणारी हिमा दास भविष्यात मोठी झेप घेईल यात शंका नाही. याप्रसंगी हिंदुस्थानातील असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणा ठरणारी हिमा दासची ऍथलेटिक्समधील गाडी ‘सुस्साट’ पुढे जावी हीच अपेक्षा.



























































