प्रासंगिक – व्यासगी आणि शिस्तप्रिय कलावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1921 रोजी झाला. त्यांचे संगीतातील गुरू रामकृष्ण बुवा वझे होते. भालचंद्र पेंढारकर यांनी 1942 साली ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकात भूमिका करून नाटय़सृष्टीत पदार्पण केले. 1948 साली त्यांचा विवाह मालती नाफडे यांच्याशी झाला आणि सहचारिणी व सहकलावंत या दोन्ही भूमिकांमधून मालती पेंढारकर बनून रंगभूमीवर त्या वावरू लागल्या. 1952 साली भालचंद्र पेंढारकरांनी व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटात लहान मुलाची यशस्वी भूमिका केली होती. त्यानंतर संन्यासाचा संसार, सोन्याचा कळस, स्वामिनी, दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ, बावनखणी आदी नाटकांतून भूमिका केल्या. दुरितांचे तिमिर जावो या नाटकातील दिनूच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले. त्यांचे ‘आई तुझी आठवण येते’ हे नाटय़पद कुणीही विसरू शकणार नाही. अतिशय उत्कृष्ट अभिनय रसिक श्रोत्यांना रडायला लावणारे हे पद एक वेगळाच उच्चांक गाठून गेलं. तसेच त्यांनी गायलेली घनश्याम मुरली, जय जय कुंजविहारी, जय जय रमारमण श्रीरंग, तू जपून टाक पाऊल जरा, नयन तुझे जादूगार, मदनाची मंजिरी साजिरी सप्तसूर झंकारित बोले ही गीते आजही लोकप्रिय आहेत. ‘ललित कलादर्श’ने 1966 ते 1983 या काळात जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, आनंदी गोपाळा, रक्त नको मज प्रेम हवे, बावनखणी, झाला अनंत हनुमान अशा अनेक वेगवेगळय़ा विषयांवरील सामाजिक, पौराणिक व संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केली.

मुंबई मराठी साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकार्ंडग रूम होती. त्यात त्यांनी 300 नाटकांचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे. त्यात प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडविले.  स्वामिनी, दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ, बावनखणी अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाटय़कृती त्यांनी रंगभूमीवर आणली. पंडितराज जगन्नाथ या नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला. 1 जानेवारी 1908 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ‘ललित कलादर्श’ या संस्थेची भालचंद्र पेंढारकरांनी वैभवशाली परंपरा जोपासली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ललित कलादर्श या संस्थेची मालकी व पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि त्यांनी ती लीलया पेलली. त्यांची 65 वर्षांची कारकीर्द अतिशय महत्त्वाची होती.

नाटय़ दिग्दर्शक, नाटय़ निर्माते, ध्वनिप्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका त्यांनी गाजविल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर (अण्णा) हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माते व अभिनेते होते. 25 नोव्हेंबर रोजी त्यांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करणे आवश्यक आहे.

  •  सुरेंद्र तेलंग